
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीवेळी भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने सर्वोतोपरी काळजी घेतली होती; परंतु भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा अनुभव निवड झालेल्या १५ महिला उमेदवारांना आला असून, कोव्हिड प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस नसल्याने अंतिम निवड यादीतून अपात्र होण्याची धमकी दाखवून जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने या १५ जणींकडून २१ हजार ५००० रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे याबाबत अलिबाग पोलिसात खंडणी स्वरुपात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय जाधव करीत आहेत.
कोव्हीड प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस नसल्याने अंतिम प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे या महिला उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र होतील अशी भीती या १५ जणींना दाखवून रोख स्वरुपात जिल्हा रुग्णालय कार्यालयातील कर्मचारी प्रदीप ढोबाळ याने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.