मानवजातीला विळखा घालणाऱ्या कर्करोगावरील उपचारांच्या परवडणाऱ्या दरातील सोयी भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच ठिकाणी आहेत. त्यासाठी दक्षिण भारतात तर काही ठिकाणी धर्मांतरेही होत असत. हे थांबविण्याचा दृढनिर्धार देवेंद्र फडणवीस यांनी तरुण वयातच केला आणि आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सहकारी-ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या साह्याने त्यांनी तो पूर्णही करून दाखवला. सरकारची फारशी मदत न घेता, फडणवीस यांनी केवळ आपल्या व संघ सहकाऱ्यांच्या हिमतीवर आणि दानशुरांच्या देणग्यांवर आधारित धर्मादाय तत्त्वावरील पण जगातील अत्याधुनिक अशा या नागपूरच्या एनसीआय कर्करोग उपचार केंद्राची उभारणी आदर्शवत आहे.
आपल्या वडिलांना कर्करोगापासून वाचविण्याची धडपड करतानाच हे रुग्णालय उभारण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला. दक्षिणेकडील काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये कर्करुग्णांवर कमी दरात उपचार करताना त्या बदल्यात त्यांचे धर्मांतर करण्याचेही प्रकार होत असत. हे पाहून तर त्यांचा निर्धार आणखीनच पक्का झाला. नागपूरच्या एनसीआय रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच झाले अन् बोले तैसा चाले… ही उक्ती फडणवीस यांनी सार्थ करून दाखवली, अशी प्रतिक्रिया नागपूरकरांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस म्हणजे कसलेले राजकारणी एवढीच ओळख आपल्याला आहे. मात्र जी गोष्ट स्वतःच्या वडिलांना न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तीच गोष्ट म्हणजे, कॅन्सरवरील उपचार, आपल्या समाज बांधवांना मिळावेत यासाठी त्यांनी दाखविलेली सहृदयता अन् जिद्दीने केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला विळखा घालणाऱ्या कर्करोगावर मात करण्याचे स्वप्न २००१ मध्ये पाहिले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेप्रमाणे मुंबई ते नागपूर महामार्ग उभारून विदर्भ-मराठवाड्याला विकासाची फळे देण्याचे स्वप्न पाहिले. ही सारी स्वप्ने त्यांनी पूर्णही करून दाखविली. केवळ आश्वासने देण्यापेक्षा ठाम कृती करण्याचा फडणवीस यांचा हा स्वभावच सर्वकाही सांगून जातो.
आपल्या वडिलांचे, गंगाधरपंतांचे घशाच्या कर्करोगाने निधन झाल्याचे पाहून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या टाटा रुग्णालयाच्या तोडीसतोड किंबहुना त्याहीपेक्षाही मोठे असे रुग्णालय मी नागपूरला उभारीन आणि मग नागपूरच्या पंचक्रोशीतील कोणालाही कर्करोगावर उपचार करण्यासाठी धडपडत मुंबईला जावे लागणार नाही, अशी प्रतिज्ञा सन २००१ मध्ये केली. त्यानंतर त्यांनी त्यासाठी अखंड प्रयत्न केले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नपूर्ती करूनच दाखवली. नागपूरला देवेंद्र फडणवीस यांनी उभारलेल्या एनआयसीचा पुढचा टप्पा पूर्ण झाला की ते टाटा रुग्णालयापेक्षाही मोठे असे ते देशातील सर्वात मोठे कर्करोग रुग्णालय होईल. केवळ मराठवाडा-विदर्भ-नागपूरच नव्हे तर उत्तर पूर्व भारतातील कर्करोग्यांसाठी हे रुग्णालय वरदान ठरेल. तसेच टाटा रुग्णालयात येणारा किमान अर्धा रुग्णांचा भार नागपूरच्या या रुग्णालयाकडे वळेल. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांना रुग्णांना फार चांगली सेवा देता येईल. स्वतःसाठी स्वप्न तर सगळेच पाहतात. पण सामान्य लोकांकरिता एखादे विशाल स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींमुळे कोट्यवधी लोकांची स्वप्नपूर्ती होते. मुंबईच्या टाटा रुग्णालयाच्या तोडीस तोड कर्करोग रुग्णालय नागपुरात उभारून देवेंद्र फडणवीस यांनी अशी स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी आदर्श उभा केला आहे, असे नागपूरकर बोलून दाखवीत आहेत.
सर्वसामान्यांना कर्करोगावर चॅरिटेबल रुग्णालयात रास्त दरात मात्र खासगी रुग्णालयासारखी दर्जेदार सेवा देण्याचे शिवधनुष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भागीरथ प्रयत्नांनी पेलले आहे. नागपुरात सुरू झालेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या सर्वंकष कॅन्सर केअर सेंटरच्या उभारणीतून हीच गोष्ट दिसून आली आहे. आपले वडील गंगाधरपंत यांना घशाचा कर्करोग झाल्यानंतर त्यांना मुंबईला उपचारांसाठी नेताना स्वतःला, वडिलांना आणि घरच्यांना होणारा त्रास त्यांनी पाहिला. कर्करोगाची भीषणता आणि सर्वांवरच त्याचा होणारा परिणाम पाहिला व त्याचा फार मोठा परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्यातच वडिलांचे निधन झाल्यावर इतर लोकांवर ही वेळ येऊ नये यासाठी आपणच काहीतरी करायचे हे देवेंद्र फडणवीस यांनी तरुण वयातच ठरवून टाकले. त्यांचे लहानपणापासूनचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मित्र शैलेश जोगळेकर यांनीही त्यांच्या या स्वप्नात साथ दिली. दुर्दैवाने जोगळेकर यांच्या पत्नीलाही १९९५ मध्ये कर्करोग झाल्यावर त्यांनाही सहा वर्षे उपचारांसाठी धडपड करावी लागली. त्यांची ही धडपड अपयशी ठरल्याने त्यांनीही समाजासाठी सर्वस्व वाहून देण्याचे ठरवले. या दोघांच्या धडपडीला नागपुरातील अनेक समविचारी मित्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी-स्वयंसेवक, तज्ज्ञ डॉक्टर अशा सर्वांनी साथ दिली आणि संघभावनेनेच हे शिवधनुष्य सहज उचलले गेले. देशात अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयात कर्करोगांवर उपचार होतात. मात्र त्यापैकी कित्येक ठिकाणी व्यापारी तत्त्वावर रुग्णालयांकडून अवाच्या सव्वा पैसे घेतले जातात. राज्यात मुंबई-पुण्याबाहेर कर्करोगाची फारच कमी रुग्णालये आहेत. ती सेवाही सर्वसामान्यांना परवडत नाही. जुन्या काळात दक्षिण भारतात कर्करुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार होत असत. कॅन्सर उपचारांची ही अवस्था पाहिल्यावर रुग्णालय काढण्याचा देवेंद्र फणडवीसांचा निर्धार आणखीनच पक्का झाला. मात्र सार्वजनिक चॅरिटेबल हॉस्पिटल म्हटले की तेथे गोंधळात धड सेवा मिळत नाहीत अशीही एक धारणा असते. त्यामुळे तसे हॉस्पिटल न उभारता जागतिक दर्जाचे, जागतिक दर्जाच्या सोयी देणारे रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांताचे कार्यवाह विलास फडणवीस यांचेही यासाठी मार्गदर्शन मिळाले. दक्षिण भारतात कॅन्सर रुग्णांच्या आणि त्यांच्या नातलगांच्या होणाऱ्या धर्मांतराबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पोटतिडकीने टीका केल्यावर त्यांनी हा मार्ग दाखवला. धर्मांतर करणाऱ्यांना दोष देऊ नका, तुम्ही तुमची रेषा, तुमचे प्रयत्न त्यांच्यापेक्षा मोठे करा, असे सांगून त्यांनी हे रुग्णालय सुरू करण्यास देवेंद्र फडणवीसांना प्रेरित केले. २००७ नंतर संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक सुनील देशपांडे यांनी या कामात रस घेतला. नागपुरातील डॉ. आबाजी थत्ते सेवा और अनुसंधान संस्थेमार्फत हे रुग्णालय उभारावे व चालवावे अशी कल्पना विलास फडणवीस यांनी मांडली होती. सुनील देशपांडे यांनी ही कल्पना पुढे नेली, यात आणखी समविचारी, ध्येयवादी व्यक्ती जोडल्या आणि एकत्र काम सुरू केले. या कामात स्वतःची आणि धर्मादाय रुग्णालयाच्या मॉडेलची परीक्षा घेण्यासाठी धरमपेठला २५ खाटांचे छोटे रुग्णालय सुरू करण्याचे ठरले. ज्या गंभीर कर्करुग्णांची खूप काळजी घ्यावी लागते, अशांच्या सेवेसाठी २०१२ मध्ये हे हॉस्पिटल सुरू केले आणि त्याचवेळी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची घोषणा झाली.
या रुग्णालयासाठी सर्वप्रथम जागेचा शोध सुरू झाला आणि जामठा विभागात साडेचौदा एकरांवर तसे नियोजन सुरू केले. कारण नंतर काही दशकांनंतर रुग्णालयाच्या विस्तारासाठी नवी जागा मिळवणे अत्यंत जिकिरीचे ठरणार असल्याचा अंदाज तेव्हाच आला होता. साडेतीनशे खटांचे रुग्णालय उभारण्यासाठी पैसा उभारण्याची धडपड सुरू केली २०१२ पासून सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी, एनटीपीसी, कोल इंडिया आदी मोठ्या कंपन्यांकडे सीएसआर निधीसाठी प्रेझेंटेशन दिले. दीड वर्षं प्रयत्न केल्यावर ओएनजीसीने मोठी देणगी दिली आणि २०१५ मध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. त्याआधीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी ट्रस्टचे अध्यक्षपद सोडले होते. तरीही सर्व आराखडा, निधी आणि मनुष्यबळ तयार असल्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले. महत्त्वाचे म्हणजे या रुग्णालयाच्या काटेकोर नियोजनासाठी दोन वर्षे खर्च करण्यात आल्याने सारे व्यवस्थित झाले. २०१२ पासून २०१४ पर्यंत वैद्यक व्यवसायिक, अन्य व्यावसायिक, तज्ज्ञ, कायदेपंडित, जाणकार यांच्याशी रुग्णालयाच्या पुढील सत्तर वर्षांच्या वाटचालीबाबत चर्चा करून ठेवली होती. त्यानुसार या ठिकाणी सर्वंकष कर्करोग केंद्र ज्यात उपचार, रोगनिदान, संशोधन आदी सर्व बाबी होऊ शकतील, असे केंद्र उभारण्याचे नियोजन झाले होते.
२०१५ ला बांधकाम सुरू झाल्यानंतर रुग्णालयाचा काही भाग आधी सुरू करावा व उरलेले रुग्णालय नंतर पूर्ण करावे असे आधीच ठरले होते. त्यानुसार ऑगस्ट २०१७ मध्ये या रुग्णालयाचा पहिला टप्पा कार्यरत करण्यात आला. यात केमोथेरपी, रेडिएशन, डायग्नोसिस, न्यूक्लियर मेडिसिन या बाबी सुरू करण्यात आल्या होत्या. संपूर्ण रुग्णालयाला लागणारे मनुष्यबळही तयार केले आणि त्यानंतर उर्वरित बांधकाम आणि उपचार सुरू झाले. आता येथे गेली पाच-सहा वर्षे झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, हैदराबाद येथूनही रोगी येत आहेत.
देशातील अन्य खासगी कर्करोग रुग्णालयांच्या तुलनेत येथे एक तृतीयांश दर आकारला जातो. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आदी सर्व सरकारी योजना येथे लागू आहेत. सरकारच्या नियमानुसार काही टक्के गरिबांना निशुल्क रुग्णसेवा दिली जाते. तर गरीब या वर्गात न बसणाऱ्या पण मध्यमवर्गीय रुग्णांसाठी ट्रस्टच्या कॅन्सर केअर फंडमधून मदत केली जाते. या फंडासाठी अनेक संस्था तसेच दानशूर व्यक्तीही मदत करतात. बारा वर्षांपर्यंतच्या ज्या मुलांना ब्लड कॅन्सर होतो त्यांना दीड ते अडीच वर्ष योग्य उपचार मिळाले, तर त्यांचे आयुष्य पन्नास-साठ वर्षांनी वाढते. त्यासाठी या मुलांचे उपचार नि:शुल्क करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला, त्यासाठीही दानशूर व्यक्तींकडून निधी घेतला जातो. आतापर्यंत एक हजार मुलांना या योजनेतून मदत देण्यात आली आहे व त्या उपचारांना यश मिळण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे.
आवश्यकता भासल्यास हे रुग्णालय साडेसातशे खाटांपर्यंत वाढू शकते. तसे केल्यास हे देशातील धर्मादाय क्षेत्रातील सगळ्यात मोठे रुग्णालय होईल. यापुढे जगातील सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान या रुग्णालयात आणण्याचे नियोजन आहे. त्यानुसार प्रोटॉन बिन थेरेपी, कार्बन आर्यन थेरेपी आदी सगळ्या उपचारपद्धती येथे येतील. यातील कार्बन आयर्न थेरेपी तर आशियातील कोणत्याही रुग्णालयात अजून वापरली जात नाही, हे तंत्रज्ञान जगात केवळ १५ ठिकाणीच वापरले जाते. इतर रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनसाठी जेथे चार ते पाच हजार रुपयांचा खर्च येतो, त्याला येथे केवळ बाराशे रुपये आकारले जातात. ज्या रुग्णांना खासगी खोल्या हव्या असतात त्यांना जास्त पैसे आकारून ते पैसे गरीब रुग्णांवर खर्च केले जातात. मोठ्या कंपन्यांचे तसेच व्यक्तींचीही आर्थिक मदत मिळतेच पण तरीही येथे नफ्यासाठी काम होत नाही. रुग्ण व त्यांचा एक नातलग यांना इथे निःशुल्क पण सात्त्विक अन्न दिले जाते.
या कामात सन २००२ पासून कॅन्सरतज्ज्ञ डॉ. आनंद पाठक हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर होते. ते आता रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक असून जोगळेकर हे रुग्णालयाचे सीईओ म्हणून काम पाहतात. रुग्णालय उभारताना निधीसह अडचणीही भरपूर आल्या. कोविड काळात रुग्णालयाचे बांधकाम थांबले. कोविडचे वर्ष खूप कठीण गेले, त्या काळात देणग्याही थांबल्या. मात्र तरीही तेथे शंभर खाटांचा कोविड वॉर्डही सुरू करण्यात आला. या रुग्णालयातील डॉक्टरांच्या पहिल्या फळीला टाटा रुग्णालयात प्रशिक्षण मिळाले. मात्र आता नंतरच्या डॉक्टरांना रुग्णालयातच केंद्र सरकारच्या मान्यतेने प्रशिक्षण मिळणार असून त्यासाठी फेलोशिप प्रोग्राम सुरू झाले आहे. रुग्णांच्या शंभर नातलगांसाठी यात्रीकेंद्र सुरू करण्यात आले आहे. साडेतीनशे खोल्यांचे मोठे सुसज्ज यात्री निवास सुरू करण्याचे कामही तीन-चार महिन्यांत सुरू होणार असून ते दोन वर्षांत पूर्ण होईल.
आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर निदान ती दुसऱ्याला तरी मिळावी आणि त्याच्या आयुष्याचे कल्याण व्हावे असा विचार करणारे आणि त्यासाठी झपाटून काम करणारे फारच थोडे लोक समाजात असतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अशा झपाटलेल्या माणसांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या धडपडीचा आदर्श सर्वांनीच घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत अनेक रुग्ण त्यांची प्रशंसा करत आहेत.
खासगी रुग्णालयांच्या तुलनेत एक तृतियांश दर सर्व सरकारी सवलत, आरोग्य योजना येथे लागू, काही टक्के खाटांवर गरिबांना निःशुल्क उपचार, निकषांनुसार गरीब नसलेल्यांवर कॅन्सर केअर फंडातून उपचार, रुग्ण व एका नातलगाला निःशुल्क भोजन, ब्लडकॅन्सरग्रस्त एक हजार बालकांवर निःशुल्क उपचार, यात यश मिळण्याचा दर ९३ टक्के.
जेव्हा गरज भासेल तेव्हा या रुग्णालयाची क्षमता ७५० खाटांपर्यंतही नेली जाईल, तेव्हा ते भारतातील सर्वात मोठे कर्करोग रुग्णालय होईल. धर्मदाय रुग्णालय असूनही जागतिक दर्जाचे व सर्व आधुनिक उपचारपद्धती व वैद्यकीय यंत्रसामग्री असलेले हे रुग्णालय आहे. भविष्यातही उपचारांकरिता लागणारी अद्ययावत उपचारपद्धती येथे वापरली जाईल.
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…