Monday, April 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यफक्त विचार पॉझिटिव्ह नकोत, वागणूकपण तशीच हवी...

फक्त विचार पॉझिटिव्ह नकोत, वागणूकपण तशीच हवी…

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

आपण खूपदा ऐकतो की, पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक विचार करावा, नेहमीच सकारात्मक बोलावे, निगेटिव्ह बोलू नये, निगेटिव्ह विचार करू नयेत, सकारात्मक विचार केला तर सगळं चांगलेच होते. सकारात्मक ऊर्जा, इच्छाशक्ती आपली हिम्मत, धैर्य वाढवते आणि दुःखाशी, संकटाशी दोन हात करण्याचं बळ आपल्याला मिळते. आपले विचारच प्रत्यक्षात उतरत असतात. त्यामुळे सकारात्मक विचारशैलीमुळे सगळं मनाप्रमाणे घडतं, अपेक्षित तेच घडतं. सकारात्मक वक्तव्य आपल्या समस्या, त्रास, प्रश्न, अडचणी दूर करण्यात खूप प्रभावी ठरतात.

ही विचारधारा जरी काही प्रमाणात बरोबर असेल, योग्य असेल तरीही फक्त एक प्रेरणादायी संकल्पना आहे. आपल्या विचारप्रणालीचा तो फक्त एक भाग आहे. विचारांना अंमलबजावणीची सुयोग्य जोड असणंदेखील तितकचं महत्त्वाचे असते. आपली वागणूक, वर्तवणूक, आपले निर्णय, आपली कामकाजाची पद्धत, आपले व्यवहार, सवयी, स्वभाव, आयुष्य जगताना जे काही आपण करतोय, ती कृती सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे असते. एकीकडे विचार फक्त सकारात्मक करायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या हातून घडणाऱ्या गोष्टी, आपली कामं, आपलं बोलणं, वागणं जर चुकीचं असेल, आर्थिक व्यवहार नीतिमत्तेला धरून नसेल, बोलायचे एक, करायचे एक, अशी तफावत जर आपल्या दैनंदिन जीवनात असेल, आपल्या कामात, व्यवसायात, विचारात जर भामटेपणा, धोका, खोटं अथवा फसवणूक असेल, तर आपण नुसताच पॉझिटिव्ह विचार करून त्याचे चांगले रिजल्ट कधीच मिळणार नाहीत. अशावेळी पॉझिटिव्ह विचारसरणी फक्त आपल्या मनाचे समाधान करायला कामी येईल.

कृत्य चुकीचं, कर्म चुकीचं असल्यास सकारात्मक विचारशैली फक्त पेन किलरचे काम करू शकते. आपण चुकतोय, अथवा चुकलोय हे सत्य स्वीकारण्यापासून पळवाट काढायला पण अनेकजण फक्त सकारात्मक बोलून त्यावर पांघरून घालत असतात. सत्य कटू असतं म्हणून ते आपल्या मनाला, बुद्धीला नको असते. ज्या चुकांचं उत्तर किंवा सोल्युशन आपल्याकडे नसतं किंवा ते चूक आहे, अयोग्य आहे हेच आपल्याला मान्य करायचं नसतं तेव्हा आपण सकारात्मक बोलून वेळ मारून नेत असतो. अनेकजण सकारात्मक बोलणं आपला बचाव करण्यासाठी वापरताना दिसतात. सभ्यतेचा, संस्कारी पणाचा आणि सुसंस्कृत पणाचा फक्त देखावा करण्यासाठी सकारात्मक बोलत राहणे म्हणजेच अंघोळ नं करता फक्त अत्तर लावत राहण्यासारखं असतं.

विचार सकारात्मक आहेत पण आपल्या हातून अनैतिक, अप्रामाणिक, इतरांना त्रास देणाऱ्या, इतरांशी प्रतारणा करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, धोका देणाऱ्या घटना घडत असतील, तर अशावेळी फक्त सकारात्मक विचार आपल्याला कोणतेही पॉझिटिव्ह रिजल्ट देणार नाहीत. आपण जर नीतिमत्ता, मूल्य, माणुसकीचे नियम धाब्यावर बसवून स्वैराचार करत असाल, आपल्या वागणुकीमुळे, निर्णयामुळे, स्वभावामुळे कोणीही दुखावलं जात असेल, कोणावर अन्याय-अत्याचार होत असेल, कोणाचा हक्क, अधिकार हिरावून घेतला जात असेल, तर त्या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह विचार नाही तर प्रत्यक्षात पॉझिटिव्ह कृती अपेक्षित आहे. आपल्यामुळे कोणाला मानसिक यातना, दुःख, मनस्ताप होत असेल, कोणाचा हक्क, अधिकार हिरावून घेतला जात असेल, तर ती व्यक्ती आपल्या सकारात्मक बोलण्याला कवडीचीही किंमत देऊ शकत नसते. एखाद्याने कोणताही गुन्हा करायचा आणि मग याची मला काहीच शिक्षा होणार नाही, व्हायला नको असा सकारात्मक विचार सातत्याने करत बसायचं तर तसं होणं कदापि शक्य नाही. कोणाकडून आपण पैसे उधार घेतले तर ते परत द्यायचे नाहीत, पण त्या व्यक्तीने आपल्याकडे पैसे परत मागूच नये, आपल्यावर काही कारवाईच करू नये असा विचार करायचा आणि त्याला सकारात्मक विचार म्हणायचे म्हणजेच स्वतःची आपण केलेली खूप मोठी फसवणूक आहे. आपण स्वतःला अंधारात ठेवण्यासाठी, स्वतःची मनस्थिती सांभाळण्यासाठी अनेकदा सकारात्मक बोलून, तसं दाखवून आजचं मरण उद्यावर ढकलत असतो, हे गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. आपण एखाद्याला त्रास द्यायचा, त्याला त्यातून खूप मानसिक यातना द्यायच्या, त्याला हवं तसं बोलून घ्यायचं, त्याच्यावर आरोप करायचे आणि मग त्यालाच समजावून सांगायचं सगळं व्यवस्थित होईल, माझ्याबद्दल तू पण सकारात्मक विचार कर, म्हणजेच त्याला किती मूर्खात काढायचं? आपलं कर्म, आपली कृत्य आपल्या हातून घडणारी, आपल्यामुळे घडणारी प्रत्येक गोष्ट जेव्हा चांगली, शुद्ध हेतूने, प्रामाणिक उद्धेश समोर ठेवून केलेली असेल तेव्हाच त्याला आपण सकारात्मक विचारांची जोड देऊन अधिक चांगलं फळ मिळेल असं अपेक्षित करू शकतो. चांगल्या गोष्टीला अधिक चांगलं बनवण्यासाठी, चांगल्या परिस्थितीला अधिक उत्तम बनवण्यासाठी सकारात्मक मानसिकता नक्कीच उपयोगी ठरेल. पूर्णपणे चुकीच्या, बिघडलेल्या, खोट्यावर आधारित असलेल्या गोष्टीला फक्त सकारात्मक विचार अथवा पॉझिटिव्ह मानसिकता बदलू शकणार नाही. प्रत्यक्षात जर कृती फोल असेल, कृतीचा पायाच पक्का नसेल, तर त्यावर उभारलेली इमारत कधीही कोसळू शकते.

आपल्या चुका, आपली दुष्कर्म, आपल्याकडून घडलेली पापं, इतरांच नुकसान यावर सभ्यतेचा बुरखा घालण्यासाठी सकारात्मक विचारशैलीचा आधार घेणे अत्यंत धोकेदायक ठरू शकते. जगाला आपण फसवू शकतो, पण स्वतःच्या मनाला आपण कधीच फसवू शकत नाही. समाजाचा, लोकांचा सामना करण्यासाठी सकारात्मक विचारांची ढाल वापरणं सोपं आहे; पण आपल्या मनाशी प्रतारणा करून जगणं प्रचंड अवघड आहे हे लक्षात घ्यायला हवे. स्वतःचा बचाव करण्यासाठी फक्त चांगल्या विचारांचा वापर होऊ शकत नाही, तर त्यासाठी तशी ठोस कृती असावी लागते. अनेकदा जो खरं बोलतोय, खरं सांगतोय, जो समस्येच्या मुळाशी जावून बोलतोय, जो भविष्यातील धोका ओळखून बोलतोय, आपल्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतोय, आपल्याला सावध करतोय त्याला लोकं नकारात्मक बोलणारा किंवा निगेटिव्ह मानसिकतेचा म्हणून दाबतात, झिडकारतात, त्याला दोष देतात, त्याची निंदा करतात. हा माणूस नकारात्मक बोलतो म्हणून त्याची खिल्ली उडवली जाते. पण तो आपल्याला जागृत करतोय, आपल्याला वाचवतोय हे आपण विसरून जातो. अशा व्यक्तीचं ऐकून घ्यायला पण कोणी तयार होत नाही. कारण तो पुढील विचार करून बोलत असतो. असा माणूस आपल्या सोईनुसार फक्त तात्पुरता मलमपट्टी केल्यासारखं पॉझिटिव्ह बोलणारा नसतो, तर प्रॅक्टिकली जे होऊ शकतं, जे होणार आहे, जे संभाव्य आहे त्यावर भाष्य करतो म्हणून आपल्यासाठी तो माणूस नकारात्मक असतो.

जी व्यक्ती आपलं मन खूष करणारे बोलेल, आपल्याला आनंद देणारे बोलेल, आपल्याला पटेल, रुचेल, झेपेल, पचेल इतपत बोलेल तो पॉझिटिव्ह असतो. उलटपक्षी जो आपले डोळे उघडणारा आपल्याला सत्याची जाणीव करून देणारा असेल तो सपशेल निगेटिव्ह असतो, अशी लोकांची मानसिकता पाहायला मिळते. नुसताच सकारात्मक विचार हा भ्रमाचा भोपळा असू शकताे. आयुष्यातील कोणत्याही सकारात्मक विचारांना कृतीची जोड तसेच त्यासोबत सद्सद्विवेकबुद्धीचा वापर असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याबद्दल किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल आपल्याला चुकीचं, वाईट किंवा नकारात्मक ऐकायला अजिबात आवडतं नाही. आपल्या जवळील व्यक्तीच्या चुका, खोटेपणा, भामटेपणा जर कोणी लक्षात आणून दिला, तर आपला संताप होतो, आपल्याला अपमान वाटतो आणि मग आपलं सकारात्मक विचारांचं अस्त्र काढून आपण त्याचं समर्थन करतो. खरं तर आपण असे आहोत किंवा आपल्या जवळची व्यक्ती खोटी आहे, चुकीची आहे, बिघडलेली आहे हे आपलं मन स्वीकारू शकत नाही. अशावेळी समोरील खरं बोलणाऱ्या व्यक्तीचं तोंड बंद करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या माणसाबद्दलच्या जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी, त्यात काही तथ्य असो वा नसो, पॉझिटिव्ह वाक्य त्याच्या तोंडावर फेकतो आणि तो कसा चांगला आहे हे पटवून द्यायचा फुटकळ प्रयत्न करतो. या प्रवृत्तीमुळे एकवेळ समोरील व्यक्ती गप्प बसेल, तुम्हाला परत काहीही बोलायला सांगायला सुचवायला जाणार नाही, पण त्यामुळे आपण स्वतः आपल्याला फसवलेलं असेल हे त्रिवार सत्य आहे. सकारात्मक विचारांचा उपयोग तिथेच होतो जिथे नितीमत्ता, शुद्ध आणि उद्देश स्पष्ट असतो. जिथे आपल्या भावना, हेतू, जबाबदाऱ्या, कर्तव्य आपण सचोटीने पार पाडत असू तिथेच सकारात्मक विचार आपल्या कृतीला, कार्याला योग्य दिशा देतात. त्यामुळे प्रत्येकाने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, विचारांना कृतीची जोड अत्यावश्यक आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -