आतापर्यंत घेतला ८१ जणांचा बळी, शेकडो बेपत्ता
सितवे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने आता तीव्र स्वरूप धारण केले आहे. रविवारी हे वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारी भागात धडकले असून मोचा चक्रीवादळाने म्यानमारमध्ये कहर झाला आहे. या चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारपर्यंत म्यानमारमध्ये चक्रीवादळामुळे सुमारे ८१ जणांचा मृत्यू झाला आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मोचा चक्रीवादळ रविवारी बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले, त्यामुळे मुसळधार पाऊस आणि ताशी १९५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे राखीन प्रांताची राजधानी असलेल्या सितवेच्या काही भागातही पूर आला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्याकांची वस्ती असलेल्या बु मा आणि जवळील खाउंग डोके कार या रखाइन राज्यातील गावांमध्ये किमान ४६ लोकांचा मृत्यू झाला. म्यानमारच्या राज्य प्रसारक एमआरटीव्हीच्या म्हणण्यानुसार, रखाइनची राजधानी सितवेच्या उत्तरेला असलेल्या राथेडौंग टाउनशिपमधील एका गावात मठ कोसळून तेरा लोकांचा मृत्यू झाला आणि शेजारच्या गावात इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.
सितवे जवळील बु मा गावाचे प्रमुख कार्लो म्हणाले की, मृतांची संख्या वाढू शकते. १०० हून अधिक लोक आता बेपत्ता आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, मोचा चक्रीवादळामळं रविवारी वीज यंत्रणा ठप्प झाली. विजेचे खांब, मोबाईल फोन टॉवरही कोसळले आहेत. सितवे बंदरात बोटी उलटल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
सितवेजवळ विस्थापित रोहिंग्यांच्या दापिंग कॅम्पमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओहन तव चाई गावात एक आणि ओहन तव गी गावात सहा जण ठार झाले. मोचा हे एका दशकाहून अधिक काळ या प्रदेशात धडकणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ होते, ज्याने खेडी उध्वस्त केली, झाडे उन्मळून पडली आणि रखाईन राज्याच्या बहुतांश भागातील दळणवळण खंडित केले.