मुंबई ( प्रतिनिधी) : विक्रांत आचरेकर फाऊंडेशनच्या वतीने दि. १२, १३ आणि १४ मे दरम्यान दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंबा महोत्सवा’चा सांगता समारंभ मुंबईकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी माजी खासदार निलेश राणे, भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व आमदार सदा सरवणकर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन मार्गदर्शन केले.
शेवटच्या दिवशी उखाणे क्वीन, मँगो क्वीन, किचन क्वीन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभंग रिपोस्ट बॅन्डने उपस्थितांचे मनोरंजन केले. प्रसिद्ध शेफ वरुण इनामदार यांच्यासहीत टीव्ही मालिकेतील अनेक कलाकारांनीही उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली. महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आंबा व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचे फळ रास्त दरात उपलब्ध करून देणे, हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट होते. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरी कमी करण्याचा हा प्रयत्न होता. आंब्यासोबतच आंब्यापासून बनलेल्या पदार्थांची चवही या महोत्सवांदरम्यात ग्राहकांना चाखता आली. आंबा आणि आंब्यापासून बनलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स हे आंबा महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या दर्जेदार खाद्य पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी येथील फूड स्टॉल्सवर घेतला. याशिवाय कोकणातील भव्यदिव्य देखावे आणि त्या सभोवताली बनवलेले सेल्फी कॉर्नर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
भव्य आंब्याची पेटी ज्यामध्ये उभे राहून फोटो काढता येतो, शिवाय कोकण किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठेवलेली नाव, आंब्याच्या मोठ्या प्रतिकृती लहान-थोरांसाठी उत्तम फोटो काढायची संधी
मुंबईकरांना मिळाली.
यावेळी उत्तमोत्तम नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मराठी रॅप कलाकारांनी रॅपच्या अंदाजात पारंपरिक मराठी गीतांची उत्तम सांगड घातली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध स्पर्धांच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके जिंकत आंबा आणि आंब्याच्या उत्पादनांचा आस्वाद विक्रांत आचरेकर प्रस्तुत आंबा महोत्सवामध्ये मुंबईकरांनी घेतला.