मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि त्यांना प्रदूषणमुक्त प्रवास करता यावा यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या कामाने चांगलाच वेग धरला आहे. एकूण साडेदहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर किमान साडेआठ किलोमीटर लांबीच्या सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जाणार आहे. आतापर्यंत सात किलोमीटर लांबीच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या भिंतीमुळेच सागरी किनारा मार्गाच्या संरक्षणाबरोबरच मुंबईला भेडसावणारा पुराचा धोका टळणार आहे, असा दावा महापालिकेने केला. मुंबईत येत्या २३ ते २५ मे या कालावधीत होणाऱ्या ‘जी-२०’च्या आपत्ती जोखीम निवारण बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून या प्रकल्पांतर्गत केलेल्या आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
सागरी किनारा मार्ग हा मरिन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी-लिंक असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. प्रकल्पाच्या एकूण जागेपैकी सुमारे १३.६० टक्के क्षेत्रफळ म्हणजे १५ लाख ६० हजार ७७० चौरस फूट (१४.५० हेक्टर) सागरी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वांद्रे-वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्गाची जोड देताना या मार्गावर प्रियदर्शनी पार्कपासून ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या समुद्राच्या दिशेकडील भागापर्यंत साडेआठ किलोमीटर लांबीची अभेद्य अशा सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जात आहे.
सध्या सात ते सव्वासात किलोमीटरपर्यंत या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. ही भिंत साधारण सहा ते नऊ मीटर उंच आहे. भिंत बांधण्यासाठी ‘आर्मर रॉक’ म्हणजेच बसाल्ट प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. असे एक ते चार टनांच्या या दगडांचे दोन थर रचण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांपासून सागरी किनाऱ्याचा बचाव होण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय पुराचे पाणीही आत येऊ शकणार नाही.ही भिंत बांधताना पुराची सर्वोच्च पातळीही लक्षात घेण्यात आली आहे.
प्रदूषणमुक्त प्रवास
मुंबई सागरी किनारा मार्गामुळे वाहनांचा वेग वाढेल, इंधनाचा वापर कमी होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनामध्येही घट होईल. मरिन ड्राईव्ह ते वरळी या दरम्यानच्या प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत होणार आहे. या पट्ट्यात पर्यावरणाचे संरक्षण आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी उद्याने असतील.