Sunday, June 22, 2025

शालेय पोषण आहार चोरणा-या मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले

शालेय पोषण आहार चोरणा-या मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले

गंगापूर : शाळेतील गोरगरिबांच्या मुलांसाठी शासनाने शाळेत सुरु केलेल्या शालेय पोषण आहारावर चक्क शाळेतील मुख्याध्यापकच डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात समोर आला आहे. दरमहा लाख रुपये वेतन मिळत असूनही शाळेचा मुख्याध्यापक लाभार्थ्यांसाठी आलेला पोषण आहार चक्क गाडीच्या डिक्कीत चोरुन नेत होता. अनेकदा समज देऊन देखील मुख्याध्यापक काही सुधारण्यास तयार नसल्याने अखेर गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. इतकेच नाही तर त्याचा व्हिडीओ देखील बनवला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गंगापूर तालुक्यातील कनकोरी गावातील हा सर्व प्रकार असून, गावकऱ्यांनी या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


याबाबतीत गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक तडवी आणि त्यांचे साथीदार शिक्षक वाडीले हे रोजचे पोषण आहाराचे अन्न न शिजवता कायम पोषण आहाराचे सामान चोरताना आणि विकताना ग्रामस्थांना दिसायचे. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांना समज देऊन सुधारण्याची संधी दिली होती. तरी सुद्धा ते चालू प्रकार बंद करत नव्हते. म्हणून आम्ही त्यांना रंगेहाथ पकडून त्यांची व्हिडीओ शूटिंग करुन त्यांच्याकडून गुन्हा कबुली लिहून घेतला आहे. त्यांच्या चोरीचे सबळ पुरावे जमा केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप शिवनाथ पवार यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले आहे.


या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात काही गावकरी एका दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला अडवून, त्याच्या गाडीला लावलेल्या बॅगची पाहणी करताना पाहायला मिळत आहे. हा दुचाकीस्वार कनकोरी गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याच्या बॅगमध्ये गोडे तेलाच्या बाटल्या आढळून आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर शाळेतील पोषण आहार चोरुन नेत असल्याचा आरोप गावकरी संबंधित दुचाकीवर जाणाऱ्या व्यक्तीवर करत आहे. तसेच यापूर्वी देखील अनकेदा असे करु नका म्हणून समजावून सांगितले असल्याचे गावकरी व्हिडीओमध्ये बोलताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा