Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यजनकल्याण समिती, मुंबई महानगर

जनकल्याण समिती, मुंबई महानगर

  • सेवाव्रती : शिबानी जोशी

जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांतामध्ये १९७२ म्हणजेच गेली पन्नास वर्षे समाजकार्यात कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, संस्कार, स्वावलंबन, कृषी, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रांमध्ये या संस्थेचे ९ मोठे, १७५५ मध्यम आणि छोटे सेवा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. अचानक भयंकर नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्वरित जनकल्याण समिती मदतकार्य करीत असते. ॥ परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥ भव्य-दिव्य साकार करण्यासाठी जनकल्याण समितीची स्थापना झाली. समाजात जितके दुखी, दरिद्री दिसतील, ते सर्व भगवान सर्व आहेत असं मानून त्यांची सेवा करण्याची संधी परमेश्वराने मला दिली आहे, असं मानणं आणि त्याच भावनेने त्यांची प्रत्यक्ष सेवा करण्यासाठी उद्युक्त होणे, हाच खरा धर्म आहे, असं परमपूज्य श्री गुरुजी यांनी एका भाषणात सांगितलं होतं. समितीचे काम पाहिलं की, या समिती या विचारांनी चालत असल्याचं प्रत्यंतर येते. कोणतेही सामाजिक काम करताना आर्थिक, शारीरिक मदतीची गरज असते; परंतु कोणतंही सरकारी अनुदान न घेता केवळ राष्ट्रीय विचारांच्या आणि सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांच्या मदतीने हे सर्व प्रकल्प नियमित सुरू आहेत. या भागात आपण प्रांतातील मुंबई क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणार आहोत. एकट्या मुंबई महानगर क्षेत्राचा विचार केला, तर मुंबई महानगरात साधारण १६८ सेवाकार्य प्रकल्प सुरू आहेत. यात किशोरी विकास प्रकल्प, माता बाल आरोग्य आहार प्रकल्प, संस्कार केंद्र, अभ्यासिका, आरोग्य चिकित्सा प्रकल्प, दिव्यांग मदत केंद्र, शिलाई प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, कौशल्य विकासवर्ग असे उपक्रम नियमित स्वरूपात राबवले जातात. मुंबईतल्या गिरगाव, विद्यानगरी, परळ, सहार, दादर, विक्रोळी, कुलाबा, गिरगाव, मुंबादेवी, मुंबई सेंट्रल, चिंचपोकळी, वरळी बीडीडी चाळ, माटुंगा, विक्रोली, कांजुरमार्ग, मुलुंड, शिवाजीनगर, भांडुप पश्चिमपासून दहिसरपर्यंत हे प्रकल्प राबवले जातात. मुंबईमधल्या जवळ जवळ ५० सेवा वस्त्यांमध्ये माता बाल आरोग्य आहार प्रकल्प सुरू आहेत. या सर्व वस्त्यांमध्ये मिळून २५०० बालक आणि मातांना पौष्टिक आहार पुरवला जातो. पौष्टिक आहारात चिक्की, दाणे, चणे, काळा खजूर, फळे यांचा समावेश असतो. हा आहार त्यांना दररोज पुरवला जातो. त्यांच्या आरोग्याची दर महिन्याला तपासणी केली जाते आणि त्यांच्यात झालेल्या बदलाची नोंदही ठेवली जाते. ही सर्व कार्य करण्यासाठी कार्यक्रम कार्यकर्त्यांना द्वैमासिक प्रशिक्षणही दिले जाते.

वस्ती परिवर्तन योजनेंतर्गत माता आरोग्य आहार प्रकल्प डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय पनवेल, कै. वामनराव ओक रक्तकेंद्र ठाणे येथे जनकल्याण समितीचे मोठे प्रकल्प आहेत, तर फिरती विज्ञान प्रयोगशाळा जी १६ जिल्ह्यांमध्ये ३८० शाळांमध्ये जाऊन वैज्ञानिक प्रयोग दाखवत असते. रुग्ण उपयोगी सामग्री सहायता केंद्र, आठ ठिकाणी ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी छात्रावास ज्यात एकूण १०९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. ग्राम आरोग्य रक्षक योजनेत २१ जिल्ह्यातील ९३७ आरोग्य रक्षक सेवा देतात, असे मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय मदत ॲप M-Health App (मुंबई), मोबाइल क्लिनिक, साप्ताहिक क्लिनिक, अन्नपूर्णा योजना सुरू आहेत. आरोग्य शिबिरांमध्ये डोळे, कॅल्शियम, हाडे, मॅमोग्राफी टेस्ट केल्या जातात. अगदी गेल्या एक वर्षाच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला तरी आपल्याला जनकल्याण समितीच्या कामांचा अंदाज येऊ शकेल.
२६ जानेवारी, १९ जून २०२२ला जागतिक योग दिन, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, दही हंडी, बालदिन अशा निमित्ताने शाळा-शाळांत चित्रकला स्पर्धा, कुमारिका पूजन, दीपोत्सव, भाऊबीज, कार्तिक पौर्णिमा, गुढी पाडवा, शिवराज्याभिषेक दिन, स्वा. सावरकर जयंती, श्रीराम नवमी, महाराणा प्रताप जयंती विविध प्रकारे साजरी केली जाते.

जनकल्याण समितीच्या वतीने प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. त्याचे विषय, आचार-विचार, विहार आणि संस्कार याच्याशी निगडित असतात. स्वच्छतेचे महत्त्व, शून्य ते सहा वर्षं वयोगटातील मुलांचे आरोग्य सर्वेक्षण, गर्भवती महिलांचे आरोग्य, स्वच्छता तसेच त्यांना पोषक आहाराचे महत्त्व, व्यक्ततत्त्व विकास असे असतात.

कुलाब्यापासून बोरिवली तथा मुलुंडपर्यंत पसरलेल्या मुंबई शहरात केवळ अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा नाहीत, तर एक माणूस म्हणून जगणं आणि सामाजिक भान राखणही गरजेचं असतं, त्यासाठी लहानपणापासूनच वस्तीतल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, म्हणून संस्कार वर्ग, किशोरी विकास वर्ग चालवले जातात. आपला देश आजही कृषी प्रधान देश समजला जातो. कृषी क्षेत्रात आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर शेतकऱ्यांना मदत करावी, म्हणून कृषी व पर्यावरण कृषी सामग्री केंद्र, सेंद्रिय (ऑर्गेनिक) कृषी मार्गदर्शन, प्लास्टिक संकलन केंद्र समितीतर्फे चालवले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा वारंवार उल्लेख केला आहे, हीच आत्मनिर्भरता प्रत्येक नागरिकाकडे आली पाहिजे, यासाठी त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू करावा म्हणून छोट्या व्यावसायिक, महिलांना मदत करण्यासाठी सहाय्य केले जाते. देशाच्या अगदी कोपऱ्यात पसरलेला संपूर्ण ईशान्य प्रांताकडे सामान्य भारतीयांचे दुर्लक्ष होते. तसेच विकासाची गंगा तिथे कमी पोहोचली. तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलांसाठी छात्रावास,आरोग्य सेवा पुरवण्याचे काम जनकल्याण समिती करत असते. नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी जनकल्याण समिती नेहमीच तत्परतेने मदत कार्याचा हात पुढे करत असते, हे लातूरचा भूकंप असो, चिपळूण व महाडमध्ये आलेली पूरस्थिती असो, कोल्हापूरची परिस्थिती, केरळ, केदारनाथ येथील जलप्रलय असो, तिथल्या नागरिकांनी नेहमीस अनुभवलं आहे. समितीचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण योजना सामाजिक कार्यकर्त्यांसाठी राबवली जाते. आपल्या आयुष्यातील एक मोठा काळ समाजसेवा करण्यासाठी व्यतित करतात, त्यांना एक प्रतीक म्हणून दर महिन्याला सहाय्यता राशी दिली जाते. अशाप्रकारची १५ कार्यकर्त्यांना सहाय्यता करण्यात आली आहे.

कला, क्रीडा, वाङ्मय, धर्म संस्कृती, पर्यावरण, महिला सबलीकरण आदी विविध क्षेत्रांत मोलाचे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिवर्षी दोन असा श्रीगुरूजी पुरस्कार अखिल भारतीय पातळीवर दिला जातो. प्रतिवर्षी दोन युवा कार्यकर्ते यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार दिला जातो. मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे. तसेच इथे हाताला काम मिळेल, या आशेने शेकडो लोक दररोज येत असतात. त्यांच्या हाताला काम मिळो आणि पोटाला अन्नही मिळते; परंतु संस्कार आणि सामाजिक भान देण्यासाठी हे सर्व उपक्रम मुंबईत राबवले जातात. कुलाबा ते बोरिवली आणि मुलुंडपर्यंत पसरलेल्या मुंबई शहरात आता या प्रकारचे ४५ प्रकल्पांची निवड झाली आहे. ३९ वस्त्यांमध्ये पोषक आहार, आरोग्य तपासणीचे काम प्रत्यक्ष सुरू आहे. इतर वस्त्यांमध्ये सर्वेक्षण चालू आहे. आगामी योजनांमध्ये जनकल्याण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षनिमित्त आणखी पन्नास वस्त्यांमध्ये सेवाकार्य सुरू करण्याचा संकल्प आहे. महिलांना स्वयंरोजगार तसेच प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

joshishibani@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -