
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली. यात नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची प्रचंड बहुमताने निवड झाली आहे. त्यांना ६० पैकी ५० मतं मिळाली आहेत. निवडणुकीत प्रामुख्याने प्रशांत दामलेंच्या 'रंगकर्मी' आणि प्रसाद कांबळींच्या 'आपलं पॅनल'मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी पत्रकार परिषद घेत अध्यपदाच्या निवडणूकीसंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की,"नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली आहे. कार्यवाहपदी अजित भुरे निवडून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे".
प्रशांत दामलेंच्या 'रंगकर्मी'च्या ११ जणांची नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीवर निवड झाली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी प्रचार सुरु होता आणि काही राजकीय नेत्यांनीदेखील यात सहभाग घेतला होता. अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणा-या प्रशांत दामले यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांचा तर प्रसाद कांबळी यांना भाजप आमदार आशिष शेलार यांचा पाठिंबा होता. त्यामुळे नाट्यवर्तुळासह राजकीय वर्तुळाचंही या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होतं. यात आता रंगकर्मीने बाजी मारली आहे.