मुंबई (प्रतिनिधी) : नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजप विशेष मोहीम राबविणार आहे. हे अभियान एक विशेष संपर्क अभियान असेल, ज्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
३० मे रोजी मोठी रॅली काढण्यात येणार असून, या रॅलीत पंतप्रधान मोदी संपर्क अभियानाला सुरुवात करतील. मिळालेल्या माहितीनुसार, ही रॅली मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये होऊ शकते. जूनपासूनच भाजप पुढील निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करेल, असे समजते.
तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विशेष संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ३० मे पासून सुरू होणार असून, महिनाभर चालणार आहे. याअंतर्गत सर्व जिल्हे, मंडळे, सत्ताकेंद्रे आणि बूथवर विशेष कार्यक्रम आयोजित करून मोदी सरकारची धोरणे आणि उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. भाजपच्या ५१ वरिष्ठ नेत्यांचाही या प्रचारात समावेश करण्यात आला असून, ते देशभरात ५१ रॅली घेतील. याशिवाय ३९६ लोकसभा जागांवर रॅली काढण्याची योजना आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय अधिकाऱ्याची उपस्थिती आवश्यक आहे.
याशिवाय संपर्काच्या माध्यमातूनही पाठिंबा मिळविण्याची भाजपची योजना असून, याअंतर्गत देशातील एक लाख विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. या मोहिमेत पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष व पक्षाचे इतर ज्येष्ठ सदस्य सहभागी होणार आहेत. राज्यातील प्रभावशाली व्यक्ती, जसे की खेळाडू, कलाकार, उद्योगपती, शहीद आणि इतर प्रसिद्ध कुटुंबांशी संपर्क साधला जाईल.
२२ जूनपर्यंत इतर कार्यक्रम होतील. यामध्ये प्रत्येक लोकसभेच्या जागेवर पत्रकार परिषद घेणे, विचारवंतांची परिषद घेणे, सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांची बैठक, व्यावसायिकांची परिषद, विकास तीर्थ कार्यक्रमांचे आयोजन यांचा समावेश आहे. २३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० लाख बूथवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. याशिवाय २० ते ३० जून म्हणजेच १० दिवस घरोघरी संपर्क मोहीमही राबविण्यात येणार आहे.
देशभरात पत्रकार परिषदा घेण्याचे नियोजन आहे. ही पत्रकार परिषद २९ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पक्षनेते असे लोक राज्यांच्या राजधानीत पत्रकार परिषद घेतील. संध्याकाळी ते सर्व सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांशी संवाद साधतील आणि सरकारचे यश सांगतील. ही मोहीम ३० आणि ३१ मे रोजी होणार आहे.