नवी मुंबई (वार्ताहर) : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर पिकून तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे खवय्यांना आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेता येणार आहे.
यावर्षी लहरी हवामानाचा फटका बसल्याने, सर्वच ठिकाणांच्या आंब्याला मोठा फटका बसला होता. त्यामुळे बाजारात आंबा तुलनेने कमीच होता. त्यातही कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन १७ ते १८ टक्क्यांवर आले. या आंब्याचे दर एक हजार रुपये डझनच्या घरात गेले होते. हापूस कमी प्रमाणात असल्याने, त्याला पर्याय म्हणून हापूससारख्या दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्यांकडे ग्राहकांनी मोर्चा वळवला होता. त्याचपाठोपाठ इतर जातींच्या म्हणजेच बदामी, केसर, लालबाग, तोतापुरी या आंब्यांकडे ग्राहकांचा कल होता. त्यामुळे या आंब्यांच्या दरातही वाढ झाली होती. म्हणूनच एप्रिल आणि मे महिन्याची सुरुवात या आंब्याच्या मुख्य हंगामाच्या काळातही आंबा खरेदी करण्यास ग्राहक फारसे उत्सुक नव्हते. आता १० मेपासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
आताचे घाऊक दर पूर्वीचे दर
हापूस आंबा ५०० ते १००० रु. डझन १००० ते १२०० रु.
कर्नाटक आंबे ५० रु ते १०० रु. किलो ८० ते १५० रु.
बदामी ३० ते ८० रु. किलो ७० ते १२० रु.
लालबाग ३० ते ५० रु. किलो ५० ते १०० रु.
केसर – ५० ते १०० रु. किलो ८० ते १२० रु.
तोतापुरी – ३० ते ६० रु. किलो ५० ते ७० रु.