Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखलिथियमचा दिलासा, ॲपलचा गलका

लिथियमचा दिलासा, ॲपलचा गलका

  • महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

देशात पुन्हा एकवार लिथियमचा मोठा साठा सापडल्याची बातमी नजीकच्या भविष्यकाळात देशाच्या अर्थकारणाची दिशा बदलणारी ठरू शकते. ही घटना अर्थकारणासाठी जादूची कांडी कशी ठरू शकते, हे अलीकडेच समोर आले. दरम्यान, ऑडी क्यू ३ या आलिशान कारचे उत्पादन संभाजीनगरमध्ये होणार असल्याची बातमी भाव खाऊन गेली. याच सुमारास आलिशान घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे स्पष्ट करणारा अहवाल समोर आला. मात्र ‘ॲपल’ बऱ्याच कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याची बातमी उद्योगजगतातले वास्तव दाखवून गेली.

जागतिक व्यापार आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांच्या दृष्टीने एक चांगली बातमी अलीकडेच समोर आली. भारतात आणखी एका राज्यात लिथियमचा साठा आढळला. काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा साठा आढळला होता. आता सापडलेला साठा काश्मीरमधील साठ्याच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेने दिली आहे. राजस्थानमध्ये हा लिथियमचा साठा आढळला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर भागात लिथियमचा साठा सापडला आहे. देशातील लिथियमची मागणी ८० टक्के पूर्ण होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा आढळला आहे. आतापर्यंत भारत लिथियमसाठी चीनवर अवलंबून होता. आता नव्याने साठा सापडल्याने लिथियमसाठी चीनवर असणारे अवलंबित्व कमी होणार आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या दाव्यानुसार राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर लिथियमचा साठा असेल, तर भारत चीनच्या वर्चस्वालादेखील धक्का देऊ शकतो. त्याशिवाय २०३० पर्यंत कारमधून होणारे ३० टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने मोठे यश मिळू शकेल. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात अलिकडेच लिथियम धातूचा साठा मिळाला होता. हा साठा जवळपास ५९ लाख टन इतका असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

लिथियम हा जगातील सगळ्यात हलका आणि मऊ धातू आहे. लिथियममुळे रासायनिक ऊर्जेचे रुपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यासारख्या उपकरणांसाठी बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम धातूचा वापर केला जातो. देशातील लिथियमची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. सध्या जगात लिथियमचे ४७ टक्के उत्पादन हे ऑस्ट्रेलियात होते, तर ३० टक्के उत्पादन चिलीमध्ये आणि १५ टक्के उत्पादन चीनमध्ये होते. आता जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानमध्ये लिथियमचा साठा सापडल्याने भारताचे लिथियमसाठीचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे. पऱ्यावरणपूरक आणि पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढले आहे. दुसरीकडे, देशात मोबाइल फोननिर्मितीचे कारखाने सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. चीनमध्ये उत्पादन करणाऱ्या मोबाइल फोन कंपन्यांनी भारतात यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता भारतात, लिथियमचा साठा आढळल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाइल बॅटरी निर्मिती उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

याच सुमारास आणखी एका लक्षवेधी बातमीने जाणकारांचे लक्ष वेधले. उद्योगक्षेत्रात ऑटो हब म्हणून औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान, यात आणखी भर पडणार असून बहुराष्ट्रीय ऑडी कंपनीच्या क्यू ३ आणि क्यू ३ स्पोर्टस बॅक या दोन मॉडेलचे उत्पादन आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. शहरातील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील स्कोडा ऑटो फोक्स वॅगन प्लांटमध्ये या मॉडेलच्या कारच्या उत्पादनाला सुरुवात झाली. त्यामुळे ही बाब छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसाठी भूषणावह असल्याचे मानले जात आहे.

लक्झरी कार उत्पादनामधील मोठे नाव असलेल्या ‘ऑडी’ने आपल्या ऑडी क्यू ३ आणि क्यू ३ स्पोर्टस बॅक या दोन नवीन मॉडेलचे उत्पादन छत्रपती संभाजीनगर येथून सुरू केले आहे. या दोन्ही लक्झरी कार भारतीय बाजारपेठेत लाँच झाल्यानंतर कंपनीने या मॉडेल्सचे स्थानिक उत्पादन छत्रपती संभाजीनगर येथून सुरू केले आहे. त्यामुळे या दोन मॉडेल्सचे उत्पादन आता मेड ‘इन इंडियाच’ नव्हे, तर ‘मेड इन छत्रपती संभाजीनगर’ असे असणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या ‘स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (एसएव्हीडब्ल्यूपीएल) येथून या नवीन दोन मॉडेल्सचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार स्कोडा कंपनीच्या प्रकल्पात याची सुरुवात केली. येथील स्कोडा कंपनीत फोक्सवॅगनच्या कार बांधल्या जातात. यासोबतच येथे ऑडीच्या काही मॉडेल्सची निर्मिती होणार आहे. आता एक लक्षवेधी वृत्त रिअल इस्टेट क्षेत्राकडून. गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होऊनही आलिशान घरांची मागणी जास्त आहे. जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान आलिशान घरांच्या विक्रीत १५१ टक्क्यांनी वाढ झाली. ‘रिअल इस्टेट कन्सल्टंट’च्या म्हणण्यानुसार, देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चांगल्या सुविधा असलेल्या मोठ्या अपार्टमेंटना मोठी मागणी आहे. ‘इंडिया मार्केट मॉनिटर’च्या अहवालानुसार, २०२३च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च या कालावधीत, मागील तिमाहीच्या तुलनेत सर्व विभागांमध्ये निवासी युनिट्सच्या विक्रीत १२ टक्के वाढ झाली आहे.

दिल्ली एनसीआरमध्ये २०२२ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत लक्झरी घरांच्या विक्रीत २१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त मुंबई, हैदराबाद, पुणे, कोलकाता येथेही लक्झरी निवासी युनिटची मागणी वाढली आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत महागड्या निवासी युनिट्सची विक्री अडीचपट वाढून चार हजार युनिट्सवर गेली आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चांगल्या सुविधांसह मोठ्या अपार्टमेंटना मागणी आहे. एका अहवालात म्हटले आहे की वर्षभरापूर्वी याच कालावधीत महागड्या निवासी युनिट्सची विक्री १,६०० युनिट्स इतकी होती. आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआरमधील प्रीमियम घरांची विक्री मार्च तिमाहीत १,९०० युनिट्स झाली. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा ६०० युनिट होता. मुंबईतील हाय-एंड अपार्टमेंटची विक्री ८०० युनिट्सवरून १,१५० युनिट्सपर्यंत वाढली आहे. येत्या तिमाहीतही ही गती कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे ‘सीबीआरई’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझिन यांनी सांगितले.

एकिकडे बरकतीच्या अशा बातम्या दिसत असताना काही चिंता वाढवणाऱ्या बातम्याही समोर येत आहेत. सध्या जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा फटका अनेक कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. फेसबुक, ट्विटर, ॲमेझॉन यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे या कंपन्यांमध्ये बरीच कर्मचारी कपात करण्यात आली आणि येत आहे. आता ॲपलदेखील कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याचे ‘ॲपल’चे ‘सीईओ’ टीम कुक यांनी सांगितले. ॲपलमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे. उत्पादन खर्चात कपातीसाठीही कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. टिम कुक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ‘आता होणारी कर्मचारी कपात ही काही नवी बाब नाही. शेवटचा उपाय म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे. तसेच कर्मचारी कपातीचा निर्णय अनेक कंपन्यामध्ये घेण्यात आला आहे. काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर इतर विभागांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करावेत’, असेदेखील टिम कुक यांनी म्हटले आहे.

‘ॲपल’चा मार्च तिमाही महसूल मागील आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित करण्यात आला. ‘ॲपल’ने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ९४.८ अब्ज डॉलर कमाई केली; परंतु तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणानुसार ही कमाई वार्षिक कमाईच्या तीन टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर मंदीचे सावट दिसून येत आहे. यंदाचे वर्ष हे मंदीचे असल्याचे अनेकांनी यापूर्वी सांगितले आहे. त्याचीच प्रचिती आता येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -