Tuesday, April 29, 2025

पालघर

कोंडिवडे पूल झालाय धोकादायक; नवीन पूल बांधण्याची गरज

कोंडिवडे पूल झालाय धोकादायक; नवीन पूल बांधण्याची गरज

कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील कोंडिवडे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाची सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली नाही. या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याची गरज असून, त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे.

तालुक्यातील चिंचवली-उकरूळ-कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडिवडे या राज्यमार्ग रस्त्यावर कोंडिवडे गावाच्या अलीकडे ३० फूट उंचीचा लहान पूल आहे. हा पूल अनेक वर्षे शासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून दुरुस्त करण्यात आला नाही. या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी खर्च केला जात आहे. खांडपे आणि कोंदिवडे गावाच्या मध्ये हा पूल आहे. २५ फूट लांबीचा हा पूल बांधून ४० वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, पुलाची बांधणी केल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग या पुलाची दुरुस्ती केलेली नाही, त्यामुळे पूल धोकादायक बनला असून या पुलाच्या कठड्याला एखादे वाहन जरी धडकले तरी ते वाहन खाली कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. हा पूल अपघातग्रस्त होऊन बंद पडल्यास वाहतुकीसाठी कोंदिवडे, चोची, कोंढाणे तसेच मुंढेवाडी या गावांमधील वाहनचालकांना अडचणी निर्माण होणार आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी चाचपणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment