Sunday, July 21, 2024
Homeक्रीडाIPL 2024हैदराबादला नमवत गुजरात ‘प्ले ऑफ’मध्ये

हैदराबादला नमवत गुजरात ‘प्ले ऑफ’मध्ये

गिल, शमी, मोहित ठरले विजयाचे शिल्पकार

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : शुभमन गिलचे शतक आणि मोहम्मद शमी, मोहित शर्मा यांच्या दमदार गोलंदाजीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरातला ३४ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातने प्ले ऑफ मध्ये दिमाखदार प्रवेश केला.

उत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या सनरायजर्स हैदराबादला मोहम्मद शमीने सुरुवातीलाच एकामागून एक धक्के दिले. २९ धावांवर त्यांचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. त्यातून बाहेर पडणे मग त्यांच्या संघाला जमलेच नाही. मग मोहित शर्माने धक्कातंत्र सुरू केले. त्याच्याही गळाला चांगले मासे लागले. हेनरिच क्लासेन गुजरातला एकटा भिडला. परंतु त्याचा लढत हैदराबादला विजय मिळवून देण्यात कमी होता. त्याला दुसऱ्या फलंदाजाची साथ लाभली नाही. परंतु हैदराबादच्या पराभवातील अंतर कमी करण्यात क्लासेनला यश आले. त्याने संघातर्फे सर्वाधिक ६४ धावा जमवल्या. तळात भुवनेश्वर कुमारने थोडाफार प्रतिकार केला. भुवनेश्वरने २७ धावा जमवल्या. परंतु तो अपुराच ठरला. हैदराबादने ९ फलंदाजांच्या बदल्यात १५४ धावांपर्यंतच मजल मारली. मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने हैदराबादचे कंबरडे मोडले. दोघांनीही प्रत्येकी ४ बळी मिळवले.

सलामीवीर वृद्धीमान साहा भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यामुळे धावांच्या आधी गुजरात टायटन्सच्या विकेटचे खाते उघडले. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने गुजरातला चांगल्या सुरुवातीपासून रोखले. गुजरातने डावाच्या पहिल्या षटकात ५ धावा जमवत १ विकेट गमावली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडगोळीने गुजरातचा डाव केवळ सावरलाच नाही, तर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. साई वगळता गिलला अन्य फलंदाजांने साथ दिली नसली, तरी गिलचा झंझावात थांबला नाही. त्याने ५८ चेंडूंत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०१ धावा फटकवल्या. साई सुदर्शनने ४७ धावांची भर घातली. या जोडीच्या बळावर गुजरातने २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात १८८ धावा जमवल्या. गिल आणि साई वगळता गुजरातच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या जमवता आली नाही. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीत एकाकी झुंज दिली. त्याने ४ षटकांत ३० धावा देत ५ फलंदाजांना पॅवेलियनचा रस्ता दाखवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -