मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सचे नाव बदलून त्याला हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेना विभाग क्रमांक ५ येथील पदाधिकारी कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे तीन मागण्या केल्या होत्या. मुंबईच्या सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा त्या मागण्या होत्या. यातील सागरी महामार्गाची मागणी पूर्ण करण्यात आली असून दोन मागण्या प्रतिक्षेत आहेत.
यानंतर आता बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सला बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स असं नाव देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सदर निवेदन लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन मान्यवरांकडून देण्यात आले आहे.