Friday, May 9, 2025

विशेष लेख

‘उबाठा’ सेनेत कोल्डवॉर...

‘उबाठा’ सेनेत कोल्डवॉर...

  • ठाणे डॉट कॉम : अतुल जाधव


ठाणे शहर सध्या सत्तेच्या राजकारणात केंद्रबिंदू आहे. ठाण्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त असल्याने ठाणे शहरात काय घडते त्यावर सगळ्यांचे विशेष लक्ष असते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा देखील ठाणे शहराच्या राजकीय घडामोडींवर काय परिणाम झाला हे समजून घेणे महत्त्वाचे ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभय मिळाले असल्याने आणि सरकार वाचल्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे; परंतु निकालामुळे उबाठा सेनेत अनेक नेत्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षाना धुमारे मुळे आहेत. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाबद्दल काही निरीक्षणे नोंदवली असल्याने आगामी काळात सरकार अडचणीत येण्याची खात्री त्यांना वाटत आहे. त्यानिमित्ताने ऊबाठामधली खदखद बाहेर आली आहे.



शिवसेनेतील बंडाचे मुख्य केंद्र ठाणे शहर असल्याने ठाण्यावर सर्वांचे विशेष लक्ष केंद्रित झालेले आहे. निवडणुका नजीकच्या काळात शक्य नसल्या तरी उबाठा गटातील अनेक लोकांनी आताच देव पाण्यात बुडविले आहेत. त्यामध्ये आघाडीवर जिल्हा प्रमुख केदार दिघे यांचे नाव आघाडीवर आहे. ठाणे शहर मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. येथे ब्राह्मण चेहरा देण्यासाठी मविआकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, केदार दिघे यांनी या जागेवर दावा करण्यास सुरुवात केल्याने राजन विचारे आणि केदार दिघे यांच्यात कोल्ड वाॅर सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांत असलेल्या शीतयुद्धाचा परिणाम संघटनात्मक बांधणीवरही होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट निर्माण केल्यानंतर अनेक जुने- जाणते शिवसैनिक पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यामध्येही चिंतामणी कारखाणीस, मधुकर देशमुख, रेखा खोपकर ही नावे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे उबाठा यांच्या कार्यक्रमांना गर्दी जमा करताना इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते उधार घेण्याची वेळ संघटनेवर आली आहे. केदार दिघे यांच्या नावात दिघे असले तरी त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची वानवा आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले संजय घाडीगावकर हे कोपरी-पाचपाखाडीमध्ये शिंदे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून आधी ओळखले जात होते. मात्र, सध्या त्यांनाही बाजूला सारल्याचे बोलले आहे. मुंब्रा- कळवा भागातील माजी आ. सुभाष भोईर हे सुरुवातीला अधिक आक्रमक पद्धतीने काम करताना दिसत होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड काम केलेले सुभाष भोईर आता दिसत नसल्याने त्यांचे बिनसल्याची चर्चा आहे.



शिवसेनेतील बंडाळी आणि राज्यातील सत्ताबदलाचे केंद्रबिंदू असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे या गटांकडून आपली ताकद दाखविण्यासाठी विविध प्रकारे शक्तिप्रदर्शन करण्याची एक ही संधी सोडली जात नाही. या दोन्ही गटाचा वाद इतक्यापुरताच मर्यादित नसून त्यांच्यात हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. ही स्थिती कायम राहिली, तर आगामी पालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटातील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी घराघरात शिवसेना पोहोचविण्याचे काम केले. त्यामुळेच ‘आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा …शिवसेनेचा बालेकिल्ला’ अशा घोषणा जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून दिल्या जातात. ठाणे जिल्ह्यातूनच शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली आणि तीही जिल्ह्याचे केंद्र असलेल्या ठाणे महापालिकेतच. नंतर जिल्ह्यातील इतर पालिकांमध्ये शिवसेनेला सत्ता मिळविण्यात यश आले. ही सत्ता कायम ठेवण्यात आनंद दिघे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दिघे यांचे २१ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविली. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत सहा महिन्यांपूर्वी नवे सरकार स्थापन केले. शिंदे यांना ठाणेतून मोठे समर्थन प्राप्त होत आहे. खा. राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नसल्याने आज तरी उबाठा सेनेचे हेच दोन चेहरे सध्या ठाण्यात दिसत आहेत.



शिंदे आणि ठाकरे गटाकडून ताकद दाखविण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले जात आहे. हे चित्र दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी पहाट आणि दिघे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून दिसून आले. दिघे यांचे आम्हीच शिष्य असल्याचे दाखवण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात चढाओढ सुरू असते. दोन्ही गटात अनेकांना पक्ष प्रवेश देऊन पदांचे वाटप करण्याची स्पर्धा मध्यंतरी रंगली होती. राजन विचारेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघातील त्यांचे कट्टर विरोधक असलेले संजय घाडीगांवकर यांना पक्षात घेऊन उपजिल्हाप्रमुख पद दिले. किसननगर भागात घाडीगांवकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खा. विचारे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून रणकंदन घडले होते. आगामी काळात दोन्ही गटातील संघर्ष टोकाला जाणार अशी स्थिती असली तरी, उबाठामधील अंतर्गत वादामुळे संघर्ष करण्यासाठी सैनिक शिल्लक असतील का? हीच चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment