याेगींची जादू यूपीत कायम

Share

कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल लागले आहेत. त्यानुसार काँग्रेस १३६  जागा जिंकून स्पष्ट बहुमत घेऊन जिंकली आहे आणि भाजपचा दारुण नसला तरीही मोठा पराभव झाला आहे. पण त्याचवेळी उत्तर प्रदेशात भाजपला नगरपालिका निवडणुकीत प्रचंड विजय मिळाला आहे. यूपीमध्ये भाजपने १७ पैकी १७ पालिका जिंकून शहरी भागात भाजप किती मजबूत आहे, हे दाखवून दिले आहे. यूपीमध्ये भाजपने इतके मोठे यश मिळवले ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जबरदस्त कामामुळे. तेथे बुलडोझर बाबा योगी यांचा करिष्मा आहे. तेथे योगी यांच्या नेतृत्वात भाजपने प्रचंड यश मिळवले आहे. यूपीमध्ये भाजपला पालिकेमध्ये प्रचंड विजय मिळाला तो यासाठी महत्त्वाचा आहे, कारण हाच विजय पुढील विजयाचा पाया असतो. भाजपला कर्नाटकात पराभव झाल्याचे दुःख काही प्रमाणात निश्चित विसरता येईल. यूपी हे सर्वात मोठे राज्य आहे आणि देशाच्या पंतप्रधानपदाचा रस्ता यूपीतून जातो हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कर्नाटकात पराभव झाला तरी यूपीतील विजय भाजपला दिलासा देऊन जाणारा आहे. लोकसभेत भाजपला अनुकूल निकाल लागणार, याचे हे सुचिन्ह आहे.

काँग्रेसला यूपीमध्ये पालिका निवडणुकीत शून्य जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस होती तेथेच आहे. कर्नाटकमधील भाजपच्या पराभवावर सर्व विश्लेषक आणि भाजपविरोधी पक्ष लक्ष केंद्रित करून वाट्टेल ते आणि सोयीचे निष्कर्ष काढत बसतील. आता कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाबद्दल. या  विजयाचे विश्लेषण करताना अनेक जण भाजप कसा चुकला हे सांगतील, तर कथित पुरोगामी आता भाजपच्या नाशाची सुरुवात झाली आहे, असे अकलेचे तारे तोडतील. पण खरी बाब ही आहे की, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी म्हणजे सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी तळागाळापर्यंत जाऊन अथकपणे काम केले. राहुल किंवा इतर कोणत्याही नेत्याचे या विजयात कसलेही योगदान नाही. भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी विशेष घटलेली नाही. म्हणजे ३५.५ टक्केच आहे. हिमाचल प्रदेशप्रमाणे कर्नाटकमध्येही मतदार आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपला सत्ता देत असतात. भाजपच्या राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार, हिजाब विवाद, बजरंग बली घोषणा यामुळे पराभव झाल्याचे कुतर्क बरेच भाजपविरोधी स्वयंघोषित विद्वान संपादक आणि पत्रकार वगैरे लावत आहेत. राज्यातील मुद्दे आणि केंद्रातील मुद्दे वेगळे असतात. पण कथित पुरोगामी स्वयंप्रज्ञ बुद्धिवंत मंडळींचा सोयीस्कर दावा असा असतो की, जेव्हा काँग्रेस किंवा यांचे लाडके पक्ष राज्यात जिंकतात तेव्हा ते निकाल देशपातळीवरील प्रतिनिधित्व करत असतात. पण भाजप एखाद्या राज्यात जिंकतो तेव्हा देशाचे आणि राज्याचे मुद्दे वेगळे असतात, असे यांचे ढोंगीपणाचे तत्त्वज्ञान असते. महाविकास आघाडीचे घटक पक्षही भाजपचा पराभव झाला म्हणून फुकट हलगी वाजवून, नाचून गेले.

राष्ट्रवादी पक्षाने कर्नाटकात पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याच्या उद्देष्याने ७ उमेदवार दिले होते. त्यांचे काय झाले हे खुद्द पवार यांनाही माहीत नसेल. महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री, तर जणू काँग्रेसचा विजय म्हणजे आपलाच विजय झाला असे समजून नाचत होते. पण इतरांच्या घरात बारसे असेल तर शेजारी पेढे कशाला वाटतील, इतकेही तारतम्य काही पक्षांना नाही. कर्नाटकपेक्षा मोठे आणि महत्त्वाचे राज्य असलेल्या यूपीमध्ये भाजपला जबरदस्त विजय मिळाला, याकडे ही मंडळी मुद्दाम दुर्लक्ष करतील. पंतप्रधान मोदी यांच्यावर नको तितके अवलंबून असणे भाजपला कर्नाटकात नडले. स्थानिक नेते काहीच करत नव्हते, असे तेथील लोकच सांगतात. इंदिरा गांधी यांच्या काळातही त्यांची एक सभा झाली की, काँग्रेसचा दगडही निवडून यायचा. कार्यकर्ते फक्त सतरंजीवर बसून टाळ्या वाजवायचे. तीच स्थिती आज भाजपची आहे, हे मान्य करायला हवे. कर्नाटकात काँग्रेसने मुस्लीम कार्ड खेळले आणि बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्यामुळे मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाली, असाही एक दावा करण्यात येत आहे. यात तथ्य आहे. पण हे जातीपातीचे किंवा धार्मिकतेचे राजकारण नसते. कर्नाटकचा निकाल हा पश्चिम बंगाल पॅटर्न आहे.

तेथेही ममता बॅनर्जी यांना मुस्लिमांची एकगठ्ठा मते पडली. पण लव्ह जिहादवर टीका केली की, एकदम कट्टर धार्मिक आणि जातीयवादी पक्ष. भाजपनेही ‘सबका साथ सबका विकास’ असले भोंदू तत्त्वज्ञान स्वीकारू नये. भाजपने आत्मपरीक्षण करू असे सांगितले आहे. ते तर करावे लागेलच. काँग्रेसने निवडणुकीत वारेमाप आश्वासने दिली आहेत. पण ती पूर्ण करण्यासाठी निधी कुठून आणणार, याचा काहीही खुलासा केलेला नाहीच. भाजप विजयी झाला की, विरोधी पक्ष इव्हीएम यंत्राच्या नावाने शिमगा करत असतो. या निकालानंतर एकही आवाज उठला नाही. हाच विरोधकप्रणीत पुरोगाम्यांचा ढोंगीपणा. यापुढे देशात भाजप आणि काँग्रेस हे दोनच राष्ट्रीय पक्ष राहण्याची शक्यता बळावली आहे. हे सुचिन्ह आहे. जनता दल धर्मनिरपेक्ष हा पक्ष या निवडणुकीत जवळपास नाहीसाच झाला. प्रादेशिक संकुचित पक्षांना यापुढे राजकारणात स्थान उरणार नाही.

ते हळूहळू अस्तंगत होतील. पण आपली काय वाताहत झाली आहे, हे न पाहता भाजपच्या पराभवातच ज्यांना भयानक आनंद होतो, त्या विकृत पक्षांना निकाल संजीवनी वाटू शकतो. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचेही स्थान धोक्यात आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

13 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

46 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago