मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे तीन मागण्या केल्या होत्या. राज्यात सुरु असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या कामांना तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी ती मागणी होती. या मागणीत प्रस्तावित तीन महामार्गांना देवेंद्र फडणवीस यांनी महान व्यक्तिमत्त्वांची नावे सुचवली होती.
मुंबईची लाईफलाईन ठरणा-या सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली. तशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी काल १४ मे ला गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात केली.
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज… https://t.co/QvApZi6JSZ pic.twitter.com/XGCtCpcblg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2023
याच पत्रात फडणवीसांनी आणखी दोन मागण्या केल्या होत्या. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा त्या मागण्या होत्या. या दोन मागण्या पूर्ण होणार का यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.