
शेवगाव : नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराचा प्रकार घडला. दोन गटांमध्ये वादावादी होऊन दगडफेक करण्यात आली. या घटनेत चार पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतलं आहे , तर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल १४ मे ला रात्री ८ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर अचानक एका गटाने दगडफेक सुरु केली. तर याअगोदर धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली होती, असं दुस-या गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे काल या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणता आली.
याआधी १३ मे ला सकाळी ९:३० - ९:४५ च्या सुमारास नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही इतर धर्मीयांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला विनंती केल्यानंतर पोलीस प्रशासन व तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्याने जमावाने प्रवेश मिळण्याकरता जबरदस्ती केली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा तणाव निवळला. दरम्यान देवस्थान ट्रस्टने जमावावर कायदेशीर कारवाई करण्याचं पत्र पोलिसांना पाठवलं आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.
अकोला शहरातही हरिहरपेठेत शनिवारी १३ मे ला रात्री दोन गटांत मोठा राडा झाला. समाजमाध्यमावरील एक पोस्ट या वादाचं कारण असल्याची माहिती मिळाली आहे. जाळपोळ, मारहाण, दगडफेक यांनी हरिहरपेठ पेटलं होतं. या घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.