पुणे : खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकवासला, डोणजे, गोर्हे गाव येथे आलेल्या ९ मुलींपैंकी ७ मुली पाण्यात उतरल्या होत्या. परंतु ७ पैकी ५ मुलींना स्थानिकांनी सुखरुप वाचविले आणि इतर २ मुलींचा मृतदेह पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी पाण्याबाहेर काढला आहे. शासकीय रुग्णवाहिका १०८ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सर्व मुली बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
लग्नासाठी पाहुण्या आलेल्या नऊ मुली गोरे बुद्रुक येथील कलमाडी फार्मच्या मागील बाजूस पोहण्यासाठी गेल्या. त्यातील सात मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यामध्ये उतरल्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बूडत होत्या. त्यावेळी तेथे दशक्रियाविधीसाठी आलेल्या लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. यामध्ये त्यांना ७ मुलींना वाचविण्यात यश आले. तर दोन मुली बुडाल्या.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी शोध घेऊन या मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.