Friday, June 13, 2025

काल कॉंग्रेस जिंकलं की पाकिस्तान?

काल कॉंग्रेस जिंकलं की पाकिस्तान?
कणकवली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी आपापली मतं मांडायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा कमबॅक करण्याचे भाजपने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

"काल जाहीर झालेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या सर्व आदरणीय नेत्यांनी मोठ्या मनाने स्विकारला, आत्मपरीक्षण करु असंही म्हटलं. देशाच्या माननीय पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हॅंडलद्वारे कॉंग्रेस पक्षाचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छाही दिल्या. एवढ्या मोठ्या मनाचे आमचे भाजपचे सर्व नेतेमंडळी आहेत. मात्र कर्नाटक निवडणुकीत भाजपचा विजय झाला असता तर लगेच संविधान, लोकशाही धोक्यामध्ये आहे अशी विधानांचं टेपरेकॉर्डर विरोधी पक्षांकडून लावलं गेलं असतं. पण भाजपच्या पराभवामुळे आता कोणीच संविधान, लोकशाही, ईव्हीएमचा विषय काढत नाही. हा विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने ओळखला पाहिजे", असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

काल कॉंग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकात 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे ऐकायला मिळाले, तसंच हिरवे झेंडे फडकवण्यात आले. यावर कॉंग्रेसचा विजय म्हणजे पाकिस्तानचा विजय समजायचा का असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. गेल्या नऊ वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणीच देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत केली नाही. कॉंग्रेस जिंकणं म्हणजे पाकिस्तान जिंकणं असं समीकरण आता स्पष्ट झालेलं आहे, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तान झिंदाबादच्या नार्‍यांवर, हिरवे झेंडे फडकवण्यावर संजय राऊत आणि उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना आनंद होत होता. मग आता यालाच आम्ही उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व समजायचं का? असा परखड सवाल नितेश राणेंनी केला. "असं असेल तर हा हिरवा झेंडा ज्या ठिकाणी आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे त्या मातोश्रीवर जाऊन लावा. पाकिस्तानच्या फायद्याचा तुम्हांला आनंद होत असेल तर तुमच्यावर आधी देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे", असा घणाघात नितेश राणेंनी केला.

पुढे नितेश राणे म्हणाले, "एका बाजूला संजय राऊतांना अपेक्षा आहे की राहुल नार्वेकरांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला न्याय द्यावा आणि दुसरीकडे तुम्हीच त्यांना धमक्या देत फिरताय. आमच्या भाजप नेत्यांना धमकी द्यायची हिंमत करु नका. ज्या नियमबाह्य सरकारच्या पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरताय ते बाजूला ठेवा मग ही महाराष्ट्राची जनता तुमचं तंगडं तोडल्याशिवाय राहणार नाही", असा पलटवार नितेश राणेंनी केला.

पुढे संजय राउतांवरचा पत्राचाळ प्रकरणातला आरोप निश्चित झाला आहे आणि तीन महिन्यांत तेच जेलमध्ये दिसतील असा आरोप नितेश राणेंनी केला. नाना पटोलेंच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल संजय राऊतांना माहित असूनही त्यांनी ही बाब लपवून ठेवली कारण त्यांचा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा होता, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >