-
डॉक्टरांचा सल्ला: डॉ. रचिता धुरत
थंडीचे दिवस संपले असून आता कडक उन्हाच्या झळा जाणवू लगल्या आहेत. तीव्र उन्हामुळे आपल्या शरीराला आणि आरोग्याला, तर त्रास होतोच; परंतु कडक उन्हाचा दुष्परिणाम त्वचेवरही बघायला मिळतो. जसेजसे ऊन तापत आहे, तसेतसे त्वचा संबंधीचे आजार बळकावत आहेत. त्यामुळे या काळात शरीराच्या आरोग्यासोबत त्वचेचीही काळजी घेणे आवश्यक ठरते. बरेचजण सुट्ट्या एन्जॉय करायला बाहेरगावी फिरायला जाता1त व त्यावेळी त्वचेची योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्वचेकडे दुर्लक्ष होऊन त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. आजच्या अंकात आपण उन्हाळ्यामध्ये होणारे विविध त्वचाविकार व त्यांचे उपचार या संबंधित महिती घेणार आहोत.
उन्हाळ्यातील त्वचेचे विकार :
ऋतुमानानुसार आपल्या त्वचेतही काही बदल होत असतात व काही नवीन आजार उद्भवतात, कधीकधी जुनेच त्वचाविकार वाढू लागतात.
१. घामोळ्या होणे (miliaria) – ही एक सर्वसाधारण समस्या आहे, ज्याचा त्रास लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत होतो. याचे मुख्य कारण म्हणजे घामग्रंथीमध्ये त्वचेवरील धूळ साचून तिथे जंतूचे प्रमाण वाढून अडथळा निर्माण होतो व त्यामुळे घाम शरीराबहेर न पडता त्वचेमध्येच साचून राहतो, त्यामुळे घामोळ्या होतात. उन्हाळ्यामध्ये सूर्याची किरणे तीव्र असतात म्हणून चेहरा, पाठ व छातीवर बारीक, लालसर पूरळ येऊन अतिशय खाज सुटते. कधीकधी यामध्ये जंतूसंसर्ग होऊन ते पिवळसर, किंवा पांढरे दिसू शकतात.
२. पेरिपोरायटीस (periporitis) – याच्यात चेहऱ्यावर मुख्यतः कपाळावर लाल रंगाचे मोठे फोड येतात व ते दुखू लागतात. हे उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे खाल्ल्यामुळे उमळले, असे म्हणतात; परंतु ही चुकीची समजूत आहे. चेहऱ्यावरील घामग्रंथीमध्ये अडथळा आल्यामुळे तिथे घाम साचून जंतूंचे संसर्ग झाल्यामुळे अशा प्रकारचे फोड येतात.
३. उन्हामुळे पित्त उमळणे – सोलर आर्टिकेरीया (solar urticaria) – यूव्ही किरणे (ultra-violet radiations)च्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊन शरीरावर लाल चट्टे येउन खूप खाज सुटू शकते, डोळ्यांभोवती किंवा ओठाभोवती सूजन येऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामध्ये काही लोकाची त्वचा अतिनिल किरणाना संवेदनशील असते.
४. फंगल इन्फेक्शन – भारत उष्णकटिबंधिय देश असल्यामुळे लोकांमध्ये घामाच्या धारा वाहतात व हाच घाम शरीरातील स्किन फोल्ड्समध्ये साचून गजकर्ण/फंगल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होतो. ज्यांना आधीपासून गजकर्ण आहे त्यांचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते.
५. पिम्पल्स – उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिम्पल्सचे प्रमाण वाढते, चेहरा खूप तेलकट होतो, घामामुळे त्वचेची छिद्र बुजून जातात व चेहरा चिपचिप दिसतो.
६. केस गळणे – उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरण अतितीव्र होतात. त्यामुळे डिहाइड्रेशन होऊन टाळूवरील केस कोरडे, शुष्क जाणवू लागतात व केसगळती सुरू होते. तसेच पोहणे एन्जाॅय करताना स्विमिंग पूलमधील पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण जास्त असल्याने केसांवर दुष्परिणाम दिसून येतो.
७. वांग – चेहऱ्यावरील वांग हे बऱ्याच महिलांमध्ये दिसून येते. अतिनिल किरणांमुळे त्याची तीव्रता वाढल्याचे जाणवते. त्यामुळे चेहरा खूप काळपट दिसायला लागतो.
८. सनबर्न (sunburn) – बरेचदा उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक समुद्रसपाटीपासून दूर अशा थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यास प्राधान्य देतात व इथे सनस्क्रीन जरुरी नाही, असा त्यांचा गैरसमज होतो. खरे तर उंच ठिकाणी सूर्याच्या किरणांची तीव्रता समुद्रपातळीपेक्षा जास्त असल्यामुळे त्वचा लाल होणे, सोलणे, भाजल्यासारखी होणे व दुखू लागणे, अशी लक्षणे दिसतात, त्यालाच सनबर्न असे म्हणतात. पुरुषांमध्ये कपाळावारील काळपटपणा (tanning) खूप सामान्य आहे.
९. सिस्टमिक लुपस एरीदेमेटोसस (systemic lupus erythematosus)- हा एक स्वंयप्रतिकारीत आजार आहे. ज्यामध्ये रुग्णाची त्वचा अतिनिल किरणांना खूप संवेदनशील होते व त्यामुळे रुग्णाला चेहऱ्यावर, हातावर लाल चट्टे येतात, केस गळतात, रुग्ण खूप अशक्त होतो, काही वेळेस इतर अवयवावर याचा परिणाम दिसून येतो.
१०. सोरायसिस (psoriasis) – हा त्वचा रोग त्वचा कोरडी पडल्यामुळे वाढतो व म्हणून हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्त बघायला मिळतो; परंतु काही रुग्णामध्ये उन्हाळ्यातील उष्णतेमुळेही याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
११. एक्तिनिक किलायटीस (actinic cheilitis) – हे उन्हाच्या तिव्रतेमुळे खालच्या ओठावर सहसा दिसून येते, यामध्ये ओठ फाटणे, ओठाला भेगा पडणे, ओठाची आग होणे, ओठावर चट्टा येणे अशी लक्षणे दिसून येतात.
उपचार/उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी :
१. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी (dehydration) होण्याची शक्यता असते म्हणून भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर भरपूर पाणी असणारी फळं जसं टोमॅटो, काकडी, द्राक्षे, खरबूज, टरबूज इ.चा समावेश नियमित ठेवावा. घामावाटे बरीचशी क्षार शरीरातून नष्ट होतात म्हणून क्षारयुक्त गोष्टींचे सेवन करावे, जसे, नारळपाणी, लिंबू सरबत, एलेक्ट्रल पावडरचे पाणी इ. प्रवासामध्ये पिण्याच्या पाण्याची बॉटल नेहमी सोबत असू द्यावी.
२. उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्यामुळे जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा. फिकट रंगाचे कपडे घालावे. पूर्ण बाह्याचे कपडे किंवा महिलांनी सनकोट, सुती स्टोल वापरावे. हवी असल्यास जवळ छत्री बाळगावी. कुठेही बाहेर पडणार असाल, तर स्कार्फ किंवा टोपीचा वापर करावा. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगल/सन ग्लासेस वापरावे.
३. दिवसा घराबाहेर निघण्याच्या ३० मिनिटांपूर्वी संपूर्ण चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर उघड्या भागावर चांगल्या दर्जाच्या सनस्क्रीनचा वापर करावा ज्यामध्ये सनस्क्रीनचे SPF (सन प्रोटक्शन फॅक्टर) तीस किंवा तीसपेक्षा जास्त असावे व आवश्यकतेनुसार दर ३-४ तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावावे. यामुळे सनबर्नचा त्रास होणार नाही व त्वचा काळी पडणार नाही. सनस्क्रिन लावताना भरपूर प्रमाणात लावावे. उदा. ३ मिलीलीटर (अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त) चेहऱ्यासाठी व गळ्यासाठी. ६ मिली लीटर प्रत्येक हात व पायासाठी.
४. सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेतील मॉइश्चर कमी होते व त्वचा कोरडी पडते अशा वेळी मॉइश्चराइझर लावून त्वचा मऊ ठेवावी. मॉइस्चराइजर खूप गाढ नसावे, नाहीतर चेहरा चिपचिप होऊन पिम्पल्स येऊ शकतात.
५. ज्या लोकाना फंगल इन्फेक्शनची बाधा झाली आहे, त्यांनी सैल कपडे वापरावे, त्वचा कोरडी ठेवावी, थंड पाण्याने दिवसात दोनदा आंघोळ करावी व तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार क्रीम्स व तोंडावाटे गोळ्या घेऊन योग्य उपचार करावा.
६. घामोळ्या होऊ नये म्हणून लहान मुलांनी घरगुती खेळ खेळावे. महिलांनी स्वयांपकांच्या वेळेत थोडे बदल करणे गरजेचे ठरते. स्वयंपकांची वेळ ऊन वाढण्याच्या आधीचीच ठेवावी (सकाळी १०च्या आधी). ज्यांना घामोळ्या झालेल्या आहेत त्यांनी सुती कपडे वापरावे, खूप खाज सुटत असल्यास त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ल्या घ्यावा.
७. उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होतो त्यांनीही तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरते.
८. उन्हाळ्यात पिम्पल्सचा त्रास वाढतो अशा वेळी मोठे झालेले पिम्पल हाताने फोडू नये, चेहऱ्यावर थोडावेळ बर्फ ठेवावा तसेच मेकअपचा वापर कमी करावा व तज्ज्ञाच्या सलल्यानुसार त्याचा उपचार करावा.
९. उन्हाळ्यात केस गळत असल्यास घराबाहेर जाताना केस नेहमी सुती कापडाने झाकावे, केस धुणे वाढवावे जेणेकरून केसातील घाम निघून टाळू स्वच्छ राहील.
१०. एक्तिनिक किलायटीस – ओठ कोरडे पडत असल्यास लिप बामचा किंवा लिप केअरचा वापर करावा. त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा जो पुढील उपचारासाठी फायदेशीर ठरतो.
सारांश : सूर्याकिरणांच्या सतत संपर्कामुळे आपल्या त्वचेला कायमचे नुकसान होऊ शकते म्हणून मुबलक प्रमाणात पाणी पिणे, नियमित सनस्क्रीनचा वापर करणे, शक्य असल्यास सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर न पडणे, व त्वचारोग तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेणे गरजेचे ठरते.