Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘खुपते तिथे गुप्ते’चा पहिला भाग गाजवणार रुबाबदार, खुमासदार राज ठाकरे

‘खुपते तिथे गुप्ते’चा पहिला भाग गाजवणार रुबाबदार, खुमासदार राज ठाकरे

  • ऐकलंत का!: दीपक परब

छोट्या पडद्यावर सध्या स्पर्धा प्रचंड वाढली आहे.नवीन मालिका येतात आणि काही दिवसांतच त्यांचा निकाल लागतो. एखादी मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडली, तर त्या जागी लगेचच दुसऱ्या मालिकेला स्थान दिले जाते. काही मालिकांचा चांगला विषय असूनही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात त्या अपयशी ठरतात. अशा मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचा टीआरपी कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेच्या जागी आता जुनाच पण नव्या रंगात एक कथाबाह्य कार्यक्रम आलाय. हा शो आहे ‘खुपते तिथे गुप्ते’.

लोकप्रिय गायक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेला अवधूत गुप्तेच्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमांचं नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चे हे पर्व वेगळे असणार आहे. या पर्वाचे खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत.

‘खुप्ते तिथे गुप्ते’ची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. पायात लेदरची मोजडी, अंगावर खादीचा कुर्ता आणि वागण्यात रुबाब असा काहीसा लूक असलेला एक नेता प्रोमोमध्ये दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं…? या प्रश्नोत्तरांच्या खुर्चीत बसणारे पहिले वहिले व्यक्तिमत्त्व कोण?, असे म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. या व्हीडिओवर, राजकीय नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब, सगळ्यांचे फेव्हरेट राज साहेब, महाराष्ट्राचा बुलंद आवाज… राज ठाकरे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. या प्रोमोमध्ये राज ठाकरेंचा चेहरा दिसत नसला तरी देहयष्टीवरून चाहत्यांनी अचूक अंदाज वर्तवला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणाला गर्दी होत असते. त्यांची बोलण्याची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्यांच्या प्रत्येक भाषणात नावीण्य असते. त्यामुळे आता ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावणार असल्याने हा भाग पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा कार्यक्रम ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -