Share
  • गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
आईचे महत्त्व आणि ममत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी आजचा ‘मदर्स डे’ साजरा केला जातो.

नदीत उतरताना मुलगा आपल्या आईला म्हणाला, “आई, माझा हात घट्ट धर!” आई म्हणाली, “तूच माझा हात धर !” परत मुलगा आईला “माझा हात तू धर” असे म्हणताच आई म्हणाली, “अरे तू माझा हात धरलास किंवा मी तुझा हात धरला दोन्ही एकच!” मुलगा म्हणाला, “नाही आई! मी जर तुझा हात धरला, नदीतील पाण्याचा प्रवाहात घाबरून माझा हात सुटण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास मी वाहून जाईन! पण तू माझा हात धरलास, तर पाण्याचा प्रवाहच काय कुठलेही संकट आले तरी तू माझा हात सोडणार नाहीस” याची मला खात्री आहे. नीला सत्यनारायण यांची ही छोटी गोष्ट!
आई ही प्रत्येकाच्या जीवनाचा आधारस्तंभ असते. आईमुळेच जगण्याला उमेद मिळते. ईश्वर प्रत्येक मुलाकडे जाऊ शकत नाही म्हणूनच आईला ईश्वराचे दुसरे रूप मानतात. आई या दोन अक्षरांत संपूर्ण कुटुंब सामावले असते. आईमुळे आपण या जगात आलो, जगाचा परिचय होत एका चांगल्या स्थानावर स्थिर होतो.

निसर्गसुलभ स्त्रीला मिळणारे मातृत्व; मातृदिन महत्त्वाचा कारण प्रत्येकाच्या जडणघडणीत आईची साथ, मेहनत, त्याग असतो. मुख्यतः काही वर्षांपूर्वी घरातल्या गृहिणीचे हे योगदान लक्षात घेतले जात नव्हते. आईचे महत्त्व आणि ममत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी आजचा मदर्स डे साजरा केला जातो. करिअरच्या आजच्या युगात अनेक महिला अगदी उच्चपदस्थसुद्धा, प्रोफेशन आणि मातृत्व याचा मेळ सुरेख साधतात. आपला क्वालिटी टाइम मुलांना देतात.

मुलांना घडविणाऱ्या काही माता – जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधींच्या मनांत सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकविला. भूदानाची कल्पना विनोबाजींना आईच्या शिकवणुकीतून मिळाली. यशोदा सदाशिव साने हिने प्रत्येक लहान लहान प्रसंगातून श्यामला दिलेली शिकवण ‘श्यामची आई’ पुस्तकात वाचा. आईसोबत घरातील आजी, आत्या, मावशी यांचाही मुलाच्या जडणघडणी वाटा असतो. सत्कार किंवा सन्मान स्वीकारताना आपल्या आईचा उल्लेख आवर्जून करणारे, प्रसंगी आईला स्टेजवर बोलावून ओळख करून देणारेही आहेत. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, यशस्वी सेनापती म्हणून सत्कार होताना तिथे आईला घेऊन जात असत.
मी लहानपणी श्री. ना. पेंडसेंच्या पुस्तकात वाचले होते, कोणाच्याही घरून निघताना घरातल्या स्त्रीला आवर्जून हाक द्या. तिच्याशी संवाद साधा. दाद द्या. ती दाद तिला ऊर्जा देऊन जाते.
आज काही घरांत आपल्या मुलाला घडविण्यासाठी बाबा आपली नोकरीची वेळ बदलत, जीवनशैली बदलतात. पुरुषामध्ये पुरुषार्थ असतोच. पण आईची मायाही ओतप्रोत असते. त्यामुळेच त्या पुरुषाला ‘माऊली’असे संबोधले जाते. संत ज्ञानेश्वरांना, विठ्ठलालाही ‘माऊली ’म्हणतात. त्यामागे कृतज्ञतेची एक भावना असावी.

प्रभू श्रीरामाने स्वर्गापेक्षा आपल्या जन्मभूमीस आई म्हटले आहे. आई ही देशाची शक्ती आणि स्फूर्तीचे स्रोत असते. मातृत्वाच्या भावनेचा व्यापक अर्थ लक्षात घ्या. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आणि सीमेवर संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाचा त्याग, त्यांच्या कुटुंबाच्या मातृत्वाच्या भावना किती उंच असतात. फाशी देण्याच्या अगोदर क्रांतिकारक राजगुरूंना भेटण्याची त्याच्या आईची परवानगी नाकारली गेली, हे जेव्हा राजगुरूंना कळाले, तेव्हा ते म्हणाले मी तर माझ्या विशाल भारतमातेचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला निघालो आहे. माझ्या जन्मदात्या आईला भेटण्याचा लोभ मला राहिलेला नाही.

आईपणाचे वैश्विक स्वरूप सर्वांशी प्रेमाने वागा, मायेने बोला. आज समाजात अनेकजण दुर्लक्षित मुलांचे पालकत्व निभावत आहेत. भारतीय डॉ. द्वारकानाथ कोटणीसांनी दुसऱ्या महायुद्धांत चार वर्षे चीन सैनिकांची देखभाल केली होती. आईपणाच्या गौरवापेक्षा आईच्या त्यागाच्या शिकवणीतील वेगवेगळ्या कंगोऱ्याचा, कुटुंबातील प्रेमाचा सन्मान; अशा व्याख्येत ‘मदर्स डे’ची व्यापकता असताना आज ते वैयाक्तिक, संकुचित होत आहे.

जागतिक मदर्स डे मागची कथा : २०व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत ॲन रिव्हिस जर्विस ही शांतता कार्यकर्ती होती. व्हर्जिनियातील स्थानिक महिलांना आपल्या मुलांची योग्य प्रकारे कशी काळजी घ्यावी तसेच सार्वजनिक आरोग्याचे निराकरण करण्यासाठी ‘मदर्स डे वर्क्स क्लब’मधून प्रशिक्षण देत होत्या. जागोजागी अनेक क्लब सुरू झाले. नंतरच्या अमेरिकेच्या सिव्हिल युद्धामध्ये दोन्ही बाजूच्या सैनिकांची ॲनने काळजी घेतली होती. युद्ध संपले तरी आपसात मैत्री वाढवी म्हणून मदर्स क्लबचे काम चालू होते. त्यांच्याबरोबर वूमन्स जर्नलची संपादक ज्युलिया वॉर्ड हावे होत्या. त्यांनी जागतिक शांततेसाठी मातृदिनाच्या घोषणा केली होती. आई ॲन जर्विसची मुलगी ॲनाने लग्न न करता आईचे कार्य पुढे चालू ठेवले. महिला मातांचा आरोग्य आणि शांततेसाठी लढा होता. आईच्या मृत्यूनंतर ॲनाला या सगळ्या मातांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जाणिवेने तिने व्हर्जिनियातील एका चर्चमध्ये मदर्स डे साजरा केला. १९१४ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांनी मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डेची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.

मदर्स डे : मातृत्वाच्या कार्याचा, भावनेचा, वृत्तीचा गौरव व्हावा. ॲनाच्या कल्पनेनुसार पांढरे कपडे घालून चर्चमध्ये काही सेवा करावी, एखाद्याच्या आईला भेटावे. एखाद्या आईच्या कर्तृत्वावर बोलावे; परंतु काही वर्षातच मदर्स डेला फुले, भेट कार्ड, भेटवस्तूचे झालेले व्यापारीकरण पाहता हे थांबावे यासाठी ॲना शेवटपर्यंत कोर्टात लढली. यश आले नाही. आजही आईला भेटवस्तूपेक्षा वेळ द्या. संवाद साधा. फिरायला घेऊन जा.

आई मुलाच्या नात्याचे प्रतीक कार्नेशनची पांढरी किंवा रंगीत फुले. या फुलाचे वैशिष्ट्य ही फुले कोमेजतात तरी तिच्या पाकळ्या गळून पडत नाहीत. आई कोणत्याही प्रसंगी आपल्या मुलांना दूर करीत नाही. असा आईचा आधाराचा हात अक्षय असतो. मुलानेही आईचा तो विश्वास जपावा. वि. स. खांडेकर म्हणतात, ‘जगात आई ही एकच देवता आहे जिच्याबद्दल कोणी नास्तिक नाही. न ऋण जन्मदेचे फिटे…

mbk1801@gmail.com

Recent Posts

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

2 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

9 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

47 minutes ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

1 hour ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

1 hour ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

3 hours ago