-
नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
‘कयामतपर्यंत वाट पाहणे’ म्हणजे त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करणे असते. जर ‘कयामततक’ भेट झाली नाही, तर आयुष्य आणि सगळी प्रतीक्षा व्यर्थ!
सिनेमा होता १९६७ सालचा ‘बहू बेगम.’ अशोक कुमार, मीनाकुमारी आणि प्रदीपकुमार यांच्या प्रमुख भूमिका. सोबत होते ललिता पवार, जॉनी वॉकर आणि हेलन. दिग्दर्शक एम. सादिक आणि गीतकार होते साहीर लुधियानवी. सिनेमाला संगीत दिले होते रोशन यांनी. ‘झीनत जहां बेगम’ (मीनाकुमारी) ही लखनऊच्या मिर्झा नवाब सुलतान यांची मुलगी. मात्र ते राज्य गेल्याने हवेलीचा काही भाग भाड्याने देऊन गरिबीत दिवस काढत असतात. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या मुलीसाठी श्रीमंत नवाब सिकंदर मिर्झा (अशोककुमार) यांचे स्थळ येते, तेव्हा ते फार खूश होतात.
झीनत मात्र युसूफ (प्रदीपकुमार) याच्या प्रेमात पडलेली असते. युसूफचे मामा त्याचे लग्न होईपर्यंत त्याच्या इस्टेटीचे विश्वस्त असतात. त्यामुळे मनातून युसूफचे लग्न होऊ नये, असे त्यांना वाटत असते. लग्न ठरते आणि झीनतला वाटत असते की, अब्बाजाननी ते युसूफशीच ठरवले आहे. लग्नाच्या वेळी ती जेव्हा सिकंदर मिर्झा यांना पाहते, तेव्हा तिला धक्काच बसतो आणि ती मैत्रिणीच्या मदतीने तिथून पळून युसूफच्या घरी येते. त्याचे मामा तिला सांगतात, तो अलाहाबादला निघून गेला आहे आणि त्याचे तिच्यावर प्रेम नसल्याने त्याला तिच्याशी लग्नही करायची इच्छाही नाही. झीनतला मोठा धक्का बसतो. हताश झालेली झीनत हवेलीत परत जाते आणि ठरलेला विवाह पार पडतो. मात्र तो इस्लामिक रूढीप्रमाणे मी “कुबूल कुबूल” असे तीनदा न म्हणताच म्हणजे “माझ्या अनुमतीशिवाय” पार पडला आहे, असे ती नवाबसाहेबांना सांगते. “मी केवळ तुमची प्रतिष्ठा अबाधित राहावी” म्हणून हवेलीत राहीन, मात्र आपल्या दोघांत “पती-पत्नी”चे नाते नसेल, असेही ती सांगते. सामाजिक प्रतिष्ठेला जपणारे उदार मनाचे नवाब तेही मान्य करतात.
जेव्हा युसूफ परत लखनऊला येतो, तेव्हा त्याला सत्य कळते. तो झीनतला भेटायला येतो. झीनत आपली हकीकत सांगून म्हणते, “मी नवाबसाहेबांना दिलेले वचन आता आयुष्यभर पाळणार आहे.” योगायोगाने हा संवाद नवाबसाहेबांच्या कानावर पडतो. ते अतिशय दु:खी झाले तरीही उदार मनाने एक निर्णय घेतात. झीनत आणि युसूफला विवाह करून अन्यत्र सुखाने संसार करायला सांगतात. अशी ही त्याग आणि दुर्दैवाच्या मालिकांची कहाणी म्हणजे “बहू बेगम”!
यात साहीर लुधियानवी यांचे एक अतिशय रोमँटिक गाणे होते. ‘कयामत’ म्हणजे जगाचा अंत. पण कयामत म्हणजे भारतीय कल्पनेतला ‘प्रलय’ नव्हे! कारण “प्रलयानंतर मी पुन्हा सृष्टीची आणि आत्म्यांची उत्पत्ती करतो” असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे. मध्यपूर्वेत तसे नाही. कयामतच्या दिवशी ईश्वराचा प्रेषित येऊन सर्वांचा न्याय करणार आणि मग पुण्यवान लोक स्वर्गात, तर पापीजन कायमचे नरकात जाणार! नंतर जग समाप्त! त्यामुळे प्रलयापेक्षा कयामत फार अंतिम आहे, भयानक आहे. या संकल्पनेमुळे एखाद्याची ‘कयामतपर्यंत वाट पाहणे’ म्हणजे त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करणे असते. जर ‘कयामततक’ भेट झाली नाही, तर आयुष्य आणि सगळी प्रतीक्षा व्यर्थ! कारण, मग कधीही भेट नाहीच. भारतीय संकल्पनेत निदान पुढच्या जन्मीची तरी आशा आहे.
रफीसाहेब आणि लतादीदींनी गायलेल्या त्या नितांत सुंदर गाण्याचे शब्द होते –
हम इंतजार करेंगे, तेरा कयामततक
खुदा करे कि कयामत हो, और तू आए…
जगाच्या अंतापर्यंतही भेट झाली नाही, तरी मी तुझ्या प्रेमावर संशय घेणार नाही, पण जीवलगा, तुझ्या वियोगाचे दु:ख तर होणारच ना? पण असे व्हावे की, मी याबद्दल तुझी तक्रार करत असावे आणि अचानक तूच समोर यावास –
न देंगे हम तुझे इलज़ाम बेवफ़ाईका
मगर गिला तो करेंगे तेरी जुदाईका
तेरे खिलाफ़ शिकायत हो और तू आए
खुदा करे के कयामत हो, और तू आए
हम इंतज़ार…
मी माझ्या परीने प्रेम निभावणारच. माझा जीव, ही तर आता तुझी अमानत! ती तुझ्या पायावर ठेवून मी प्राण सोडून देईन. तरीही जेव्हा मी जगातून जात असेन तेव्हा काहीतरी चमत्कार घडावा अन् तू
समोर यावेस –
ये ज़िंदगी तेरे कदमोंमें डाल जाएंगे
तुझीको तेरी अमानत सम्भाल जाएंगे
हमारा आलम-ए-रुखसत हो
और तू आए…
म्हणजे एकीकडे सगळे जीवन त्यागण्याची तयारी आहे. पण, दुसरीकडे भेटीच्या आशेची लुकलुकती ज्योत तेवतच आहे.
बुझी-बुझीसी नज़रमें तेरी तलाश लिये,
भटकते फिरते हैं हम आज अपनी
लाश लिये,
यही ज़ुनून, यही वहशत हो और तू आए…
मी तुझ्या शोधात फिरत आहे. मनात एक भयकारी जिद्द आहे. ती तशीच राहावी आणि तुझी भेट व्हावी! प्रिय व्यक्तीची प्रतीक्षा ही खरे तर एक परीक्षाच असते. भेट होत नाही तसतसा प्रेमाचा निखारा अजूनच पेटू लागतो. ही प्रतीक्षा अशीच सुरू राहावी आणि समोरून तू यावेस –
ये इंतज़ार भी एक इम्तिहां होता है
इसीसे इश्क़का शोला जवां होता है
ये इंतज़ार सलामत हो…
मी डोळ्यांत तुझ्या भेटीच्या आशेचे दिवे लागून वाट पाहत असावे. माझी प्रार्थना ईश्वराने ऐकावी आणि तू प्रकटावेस!
बिछाए शौक़से, ख़ुद बेवफ़ाकी राहोंमें,
खड़े हैं दीपकी हसरत लिए निगाहोंमें,
कबूल-ए-दिलकी इबादत हो,
और तू आए…
यावर प्रियकर म्हणतो, “तू ज्याला निवडलेस तो तर किती भाग्यवान! देव करो आणि आपल्या प्रेमाला परमेश्वराचे आशीर्वाद मिळोत. माझ्या नशिबाचा तारा तेजस्वीपणे तळपत असो आणि तू यावेस. मग देव करो प्रलय होत असला तरी आपली भेट व्हावी!
– वो ख़ुशनसीब है जिसको तू इंतख़ाब करे
ख़ुदा हमारी मोहब्बतको क़ामयाब करे
जवां सितारा-ए-क़िस्मत हो
जवां सितारा-ए-क़िस्मत हो और तू आए
जुन्या काळी प्रेमाची व्याख्याच वेगळी होती. प्रेमात स्वत:ला कुणाला तरी समर्पित करणे, “देऊन टाकणे”, जीवनभरच्या साथीची खात्री देणे आणि भारतीय संदर्भात तर ७ जन्माच्या साथीचे वचन देणे, अशी होती. तेव्हा कोणतीच नाती, प्रेमाचे संबंध, शपथा, आणाभाका हल्लीसारख्या “ब्रेकेबल” नव्हत्या. शेवटी जे लोकांच्या मनात तेच त्यांच्या साहित्यात, कलाकृतीत उतरते ना!
त्यामुळे त्या कायमच्या निघून गेलेल्या आश्वस्त “अच्छे दिनांची” आठवण करण्यासाठी तर हा नॉस्टॅल्जिया!