-
क्राइम: अॅड. रिया करंजकर
एखाद्या बिल्डरला जमीन विकताना कुठले पेपर बिल्डरकडे व कुठले पेपर आपल्याकडे असावेत? याचे पूर्ण ज्ञान सहजमीनमालकांना असले पाहिजे. नाही तर फसवणूक होऊ शकते.
ग्रामीण व शहरी यांचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे निसर्ग लोप पावत चाललेला आहे व सर्वत्र सिमेंटचे जंगल दिसत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी काही लोक आपल्या जमिनी बिल्डरला देत आहेत. एवढेच नाही, तर राहत्या घराची जमीनही बिल्डर लोकांना देऊन गावपणाचं सौंदर्य शहरीकरणात करत आहेत.
सुधीर, सुरेंद्र, नरेश व नमिता अशी चार भावंडे. चौघांची लग्न होऊन आपापल्या संसारात रममाण होती. वसई-विरारमधील हे लोक गाववाले असल्यामुळे पुष्कळ अशी जमीन वडिलोपार्जित त्यांना मिळालेली होती. वसई-विरारचे शहरीकरण झपाट्याने होत असल्यामुळे जमिनीचे भावही गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे यांच्याही जमिनीकडे बिल्डरने टोलेजंग बिल्डिंग बांधण्याचा प्रस्ताव या भावंडांच्या समोर ठेवला. चारही भावंडांना जमिनीची रक्कम व नवीन बनणाऱ्या बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी प्रशस्त फ्लॅट तसेच एक्स्ट्रा फ्लॅट त्यांना बिल्डरकडून मिळणार होता.
चारही भावंडांनी सही करून तिथे बिल्डिंग बांधण्याची परमिशन बिल्डरला दिली आणि एका वर्षामध्ये तिथे टोलेजंग बिल्डिंग उभी राहिली. ठरल्याप्रमाणे भावंडांना राहण्यासाठी फ्लॅट व एक्स्ट्रा फ्लॅट बिल्डरने दिला. त्या बिल्डिंगमध्ये चारही भावंडे आपापल्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आली. बिल्डरचे फ्लॅट पटापट विकले गेले. बिल्डरने ती जमीन विकत घेण्यासाठी जो काही खर्च केलेला होता नि बिल्डिंग बांधण्यासाठी जो काही खर्च केलेला होता, त्याच्या डबल त्याला फ्लॅट विकल्यावर रक्कम वसूल झालेली होती. त्यामुळे त्याने आपले फ्लॅट विकले गेलेत, आपल्याला नफा मिळाला हा विचार करून बांधलेल्या बिल्डिंगमध्ये लक्ष देण्याचे सोडून दिले, कारण जमीनमालक आहेत ते त्या बिल्डिंगमध्ये रहात आहेत. ते ज्यांना फ्लॅट विकले त्यांचे प्रश्न सोडवतील, असा त्याने विचार केला. आपल्याला आपला फायदा मिळालाय ना. जमीनमालक व फ्लॅटधारक हे आपापसात बघून घेतील. म्हणून बिल्डरने अक्षरशः ज्यांना फ्लॅट विकले होते, त्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला.
बिल्डरने कोणत्याही प्रकारची फ्लॅटधारकांची कमिटी तयार केली नाही. त्यांच्या मेंटेनन्सबद्दल कोणतेही रूल्स रेगुलेशनचा वापर केला नाही. फ्लॅटधारकांना रूम विकून तो मोकळा झालेला होता. याचाच फायदा जमीनमालकांपैकी असलेला मोठा भाऊ सुधीर याने उचलला. “माझी जमीन आहे. माझ्या जमिनीवर मी बिल्डरला बिल्डिंग बांधायला सांगितली”, अशी तो दादागिरी करू लागला. शिवाय ज्या ठिकाणी बिल्डिंग बांधली होती, त्याच्या मेन एंटरन्सला त्याने ‘या जमिनीचा मी मालक आहे’ असा बोर्डही लावून मोकळा झाला. बिल्डर इथे लक्ष घालत नाही, हे त्याला कळून चुकलं होतं. म्हणून तो फ्लॅटधारकांवरही दादागिरी करू लागलेला होता. एवढेच नाही, तर त्याची भावंडे त्या बिल्डिंगमध्ये राहत होती व त्यांना जो एक्स्ट्रा फ्लॅट बिल्डरने दिलेला होता, तो आपल्या ताब्यात कसा मिळेल, यासाठी तो प्रयत्न करू लागला होता. ‘ही माझ्या मालकीची जागा आहे, त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा फ्लॅटही माझे आहेत’, असे तो आपल्या भावंडांवर दादागिरी करू लागला होता आणि त्यांनाही तिथून रूम सोडून बाहेर जाण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. एवढेच नाही, तर त्यांनी घर सोडून जावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती.
आपल्याच भावंडांचे गेल्या एक महिन्यापासून पाणी बंद केलेलं आहे. कारण या बिल्डिंगमध्ये सोसायटी कमिटी बिल्डरने फॉर्म केली नसल्यामुळे म्हणून तेथील रहिवासी लोकांना अनेक प्रकारे त्रास हा जमीनमालक देत आहे. एवढेच नाही, तर या दादाने रजिस्टर ऑफिसला फाइल केले आहे की, ‘याचा मालक मी आहे. माझ्याशिवाय जमिनीचा आणि बिल्डिंगचा मालक कोणीही नाही’ आणि आता त्याच्याविरुद्ध त्याची तीन भावंडे आणि बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी असे युद्ध चालू झालेले आहे. कारण त्या जमिनीचा हा दादा एकटाच मालक नाही, तर त्याची तीनही भावंडे समान मालक आहेत. त्यांनी बिल्डरला जमीन विकून पैसे घेतलेले होते, त्यामुळे त्यांचा हक्क तिथे संपलेला होता. पण इथे बिल्डरकडे एसीओसी नसल्यामुळे अनेक अडचणी रूमधारकांना निर्माण झालेले होते आणि बिल्डिंगमध्ये एसीओसी नाहीये याची जाणीव दादाला असल्यामुळे तो आपल्या भावंडास, रहिवाशांना त्रास द्यायला सुरुवात करू लागला होता.
बाकीची तीन भावंडे कायदेशीर मालक आहेतच. पण बिल्डिंगमध्ये रहिवासी आहेत. त्यांना आता वाली कोणच राहिलेले नाहीये. कारण बिल्डरकडून रूम घेतले तो आता लक्ष देत नाहीये. भलताच ‘मी मालक आहे’ म्हणून या रहिवाशांवर दादागिरी करत आहे आणि बाकीचे रहिवासी या तीन भावंडांना येऊन विनाकारण त्रास देत आहेत म्हणून या भावंडांमधील लढाई आता रजिस्ट्रारकडे चालू आहे. बिल्डरकडून रूम घेताना अपुरे कागदपत्र बघून घेतले, तर भविष्यात अनेक प्रसंगांना अडचणींना सामोरे जावं लागतं. आताच जे डेव्हलपमेंट होत आहे, ते मुंबई शहरातील गावांमधल्या जमिनीवर होत आहे आणि गावातल्या जमिनी म्हणजे त्यांना मालक आहेत. त्यामुळे जमीनमालकाचे बिल्डरचे व फ्लॅटधारकाचे राइट्स काय आहेत? कोणते कोणते कागदपत्र आपल्याजवळ हवेत? याचाही अभ्यास फ्लॅटधारकाने रूम विकत घेताना केला पाहिजे. एखाद्या बिल्डरला आपण जमीन विकत देताना कुठले पेपर बिल्डरकडे व कुठले पेपर आपल्याकडे असावेत? याचे पूर्ण ज्ञान सहजमीनमालकांना असले पाहिजे. नाही तर सुधीरसारखे दादा मोक्याचा फायदा घेऊन दादागिरी करायला तयारच असतात.
(सत्य घटनेवर आधारित)