Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनिष्ठावंत कलावंत अशोक समेळ

निष्ठावंत कलावंत अशोक समेळ

  • विशेष: नंदकुमार पाटील

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता फार तर निर्माता अशी उज्ज्वल झेप घेईपर्यंत कलाकाराने आपली वयोमर्यादा ओलांडलेली असते. पण ज्येष्ठ रंगकर्मी म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ रंगधर्मी म्हणावे, अशी कामगिरी ‘अशोक समेळ’ यांनी त्याही पलीकडे जाऊन केली आहे. बहुरूपी, सब कुछ समेळ म्हणावे, असा त्यांचा मराठी आणि गुजराती रंगभूमीवर बोलबाला आहे. अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माते ते आहेतच. पण ते उत्तम क्रिकेटपटू होते, श्रवणीय संगीत त्यांनी दिले आहे. आवश्यक तिथे मर्मज्ञ काव्य लिहिले आहे. त्यांच्या लेखन, दिग्दर्शनातल्या ‘संन्यास ज्वालामुखी’ या नाटकाने दिवस-रात्र सलग अकरा प्रयोग करून ते विक्रमवीर असल्याचे ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‘मध्ये नोंद झाली आहे. ‘ऋग्वेद’ या त्यांच्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून ठाण्यात प्रायोगिक रंगभूमीचे बीज रुजवून त्याच्या कक्षा महाराष्ट्रात कशा रुंदावतील, हे त्यांनी पाहिलेले आहे. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे काही प्रयोग व्हावेत अशी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांची इच्छा होती. ती समेळ यांनी पूर्ण केली. ते आव्हान त्यांनी पेलले. ‘अवघा रंग एकची झाला’ या संगीत नाटकाला जुन्या-नव्या पिढीतल्या प्रेक्षकांना सामावून घेणारे रूप त्यांनी दिले. परिणामी भारताबरोबर अमेरिकेतल्या प्रेक्षकांनाही या नाटकाचा आनंद घेता आला. ‘होरपळ’ ही त्यांनी लिहिलेली श्रुतिका इटलीच्या आकाशवाणीवर प्रसारित झाली होती आणि आता अलीकडे वाचकप्रिय कादंबरीकार म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. मी अश्वत्थामा चिरंजीव, ते आभाळ भीष्माचं होतं, सप्तचिरंजीव-अश्वत्थामा, स्वगत ही त्यांच्या कादंबरीची नावे जरी आठवली तरी अशोक समेळ ‘सब कुछ हैं’ याची जाणीव होते‌. त्यांचा हा बहुआयामी, लौकिक पसारा समेळ हे निष्ठावंत, कलावंत आहेत, याची साक्ष देते‌. १२ मेला त्यांनी ८१व्या वर्षात पदार्पण केले आहे. वय वर्ष ६० म्हणजे अल्पविराम आणि ८१ म्हणजे कामाला पूर्णविराम, असा काहीसा अर्थ लावला जात असला तरी ८१ ही संख्या उलटी केली की, वयाच्या अठराव्या वर्षी ज्या पद्धतीने युवक आपल्या कामाचा सपाटा लावत असतो, तसे काहीसे समेळ यांचे आज कार्य आहे‌. सध्या झी मराठीवर दाखवल्या जाणाऱ्या ‘मी यशोदा, गोष्ट शामची आईची’ या मालिकेत ते दिसतात. ‘द्रौपदी : काल, आज आणि उद्या’ ही महाकादंबरी त्यांनी लिहायला घेतलेली आहे. अंतःकरणाने युवक असलेल्या समेळ यांच्याविषयी मला काही सांगायचे आहे.

अशोक समेळ हे मूळचे मुंबईकर. आता ठाण्यात ते वास्तव्य करीत असले तरी त्यांचा संचार कलाकार, नाट्य प्रशिक्षक, कादंबरीकार, वक्ते म्हणून ही संपूर्ण महाराष्ट्रात असतो. मुंबईत त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. ज्या वयात पाटी-पेन्सिल हाती घ्यायला हवी, त्या वयात ते क्रिकेटची बॅट घेऊन मिळवत होते. त्याचा परिणाम म्हणजे त्यांची गणती त्यावेळी ‘ढ’ मुलांमध्ये केली जात होती. युवा अवस्थेत क्रिकेटमध्ये सराईतपणा दाखवणारे अशोक खेळात चौक काम करतील, हे निश्चित झाले होते. पण सर्वांचा हा अंदाज फोल ठरवला. आई, बाबा, आजोबा, काका, आत्या कुटुंबातील सर्वच सदस्य घरात, दारात थेट रंगमंचावर कला सादर करून प्रेक्षकांना ताब्यात घेतात म्हणताना समेळ यांचा खेळाशी काही मेळ बसला नाही. उभारी देणारी उमेदवारी त्यांनी नाटकात सुरू केली. प्रथम स्पर्धा, नंतर सर्व क्षेत्र तपासून घेणे या कामाला त्यांनी क्रम दिला. हलकीफुलकी कामे करून आपण सच्चे रंगसेवक आहोत, हे त्यांनी प्रथम पटवून दिले. पणशिकरांनी ते हेरले. याचा अर्थ त्यांनी लागलीच संधी दिली, असे नाही. कितीतरी नाटकात आयत्यावेळी नाटक सोडणाऱ्या कलाकारांच्या भूमिका त्यांनी समेळ यांना करायला लावल्या होत्या. परिणामी पहिल्यापेक्षा दुसरा बरा अशी चर्चा थेट पणशिकर यांच्यापर्यंत पोहोचली आणि समेळ हे नाट्यसंपदेचे हक्काचे कलाकार झाले होते. जमेल ते काम करणारे समेळ आता चोखंदळ झाले होते. पुत्रकामेष्टी, डोंगर म्हातारा झाला, कुसुम मनोहर लेले, तू आहेस तरी कोण, शपथ तुला जिवलगा, परपुरुष, पिंजरा अशी अनेक नाट्यकृती आठवल्यानंतर समग्र समेळ नजरेसमोर यायला फारसा वेळ लागत नाही. कलाकार आहे म्हटल्यानंतर प्रत्येक मराठी कलाकारांना किमान तीन तरी भाषा येत असतात. पण समेळ यांना मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबर गुजराती भाषासुद्धा अवगत होती. या गुजराती भाषेचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. इतका घेतला की कोणा लेखकाला गुजराती रंगभूमीचा इतिहास लिहायचा झाला, तर समेळ यांचे नाव अग्रभागी लिहावे लागेल. एक नव्हे, दोन नव्हे, तर त्यांनी २७ नाटके ही गुजराती रंगभूमीवर सादर केली होती. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशी ‘लय भारी’ म्हणावी, अशी तिहेरी कामगिरी त्यांनी गुजराती रंगमंचावर केलेली आहे. समेळ छान मेळ बसवतात म्हणताना ‘सुगंधनू सरनामू’ या नाटकाच्या निर्मात्याने शंभर दिवसांत शंभर प्रयोग करण्याचा घाट घातला आणि तो गुजराती रंगमंचावर चमत्कार झाला. विक्रमी नाटक म्हणून त्याची चर्चा आजही कायम आहे. समेळ यांनी कचिडो, पुछ छे डिकरी, सुतारनू तातने अमे बंधाणे हातने ही गुजराती नाटकाची नावे जरी घेतली तरी त्यांच्याविषयी भरभरून बोलणारा प्रेशकवर्ग आजही गुजरातीत मोठा आहे.

अशोक समेळ हे भिडस्त, धीरोदत्त स्वभावाचे आहेत, असे म्हटल्यानंतर भुवया उंच करून बरेच कलाकार मंडळी सापडतील. कुठलीही गोष्ट समजून-उमजून सांगताना समोरच्या कलाकाराला ती कळली नाही, तर त्या कलाकाराने कानावर हात ठेवावेत, अशी पाचवी भाषा ते बोलत असतात. कलाकार घडला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. नाटक, चित्रपट, मालिका या तीनही क्षेत्रांत काम करण्यासाठी नव्या कलाकारांना समेळ यांचे हे शस्त्र पुरेसे ठरते. याची उकल यशाचा आनंद घेत असताना या कलाकारांना होत असते, हा भाग वेगळा. त्यामुळे चर्चेला सोबत घेऊन फिरणारा कलाकार अशी समेळ यांची नाट्यक्षेत्रात ओळख आहे; परंतु ते मित्रप्रेमी आणि माणूसप्रेमीही आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, संशोधक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे समेळ यांच्याविषयी भरभरून बोलत असतात. त्याला कारण म्हणजे ते समेळ यांचे वर्गमित्र आहेत. शिक्षकांनी अवघड प्रश्न विचारला की, समेळ केवळ अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात म्हणून त्यांना अनुत्तरीत झाल्याचे त्यांनी पाहिलेले आहे आणि तेच समेळ नाटकाच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात, याचेही दर्शन त्यांना झालेले आहे. याचे त्यांना अप्रूप वाटत आलेले आहे. त्याचे उत्तर म्हणजे समेळ हे माझे मित्र आहेत, हे ते जाहीरपणे सांगत असतात. हे झाले लोकांच्या प्रेमाचे, पण समेळ स्वतः कोणा व्यक्तीला श्रद्धास्थानी ठेवतात, तेव्हा त्याच्यासाठी कायपण करण्याची त्यांची तयारी असते. अर्थात हे करीत असताना तडजोड करणे त्यांना माहीत नाही. ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक काशिनाथ घाणेकर, रमेश भाटकर, श्रेयस तळपदे या दिग्गजांच्या अभिनयाने सजलेले नाटक आहे. समेळ यांनी गुणी मुलगा संग्राम समेळ याला लाल्याची मुख्य भूमिका देऊन या नाटकाचे एकावन्न प्रयोग त्यांनी केवळ पणशीकरांच्या इच्छे खातर केले होते. मुलगाही जिगरबाज निघाला. कोणी प्रेक्षक तुलना करणार नाही, असा त्यांनी लाल्या यात साकार केला होता. अर्थातच दिग्दर्शक म्हणून समेळ यांचीही कसब होती, हे वेगळे सांगायला नको. संग्रामलाच घेऊन त्यांनी ‘संन्यस्थ ज्वालामुखी’ या प्रायोगिक नाटकाचे ठरल्याप्रमाणे शंभर प्रयोग केले होते. चेहऱ्यावर फक्त रंग लावून चालत नाही, तर अंगात रगही असायला हवी, हे समेळ यांनी आपल्या कृतीतून पटवून दिले होते. समेळ यांनी मोठ्या कष्टाने नाट्यसामग्री गोळा केली होती. एका रात्री ती आगीत भस्मसात झाली. नेपथ्य, लाइट, कपडे सारे काही बेचिराख झाले. आपल्या अभिनयाने रंगमंचावर लख्ख प्रकाशात दिसणारे या महाभयंकर प्रकाराने समेळ यांना अंधार काय असतो, हे दिवसाढवळ्या कळायला लागले होते. ‘झगडत राहा, आजमावत राहा’ हा त्यांचा मूलमंत्र असल्यामुळे जिथे पैशाचा ओघ तिथे अशोक, असे त्यांनी करायचे ठरले. काही चित्रपटाचे, कितीतरी मालिकांचे लेखन त्यांनी कल्पक बुद्धीने याच कालावधीत केले होते. या पडत्या काळात दोन हजारांहून अधिक भागाचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता नाट्यपेक्षकांपुरतीच मर्यादित न राहता घराघरांत या मालिकांमुळे पोहोचली आहे. अल्बम, तिसरा डोळा, आई, हे बंध रेशमाचे, सखे सोबती, सांजभूल, श्रीमंताची लेक या आणि अशा अनेक मालिकांची नावे घेता येतील. चित्रपटाच्या बाबतीतही हेच सांगता येईल. हौशी, स्वप्न बाळगून असलेल्या नवकलाकारांना त्यांनी घडवले. त्याचबरोबर नाट्य निर्मितीतले काही पैसे बाजूला ठेवून नाट्य व्यवस्थापकचा मुलगा प्रताप सावंत यांना वर्षाला एक भरीव रक्कम देऊन समेळ यांनी विधायक काम केले आहे. सतत गुंतून राहणे हे बहुतेक त्यांच्या प्रदीर्घ सेवेचे रहस्य म्हणावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -