Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘या’ नंबरवरचे व्हॉट्सअ‍ॅप कॉल उचलाल, तर फसाल...

‘या’ नंबरवरचे व्हॉट्सअ‍ॅप कॉल उचलाल, तर फसाल…

  • गोलमाल : महेश पांचाळ

‘मी केनियातून बोलतोय. आपल्याला ऑनलाइन पार्टटाईम व्यवसाय करता येईल. एक व्हीडिओ आपल्याला शेअर केला आहे. तो लिंक करा. तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील’ जयेश मिरचंदानी (नाव बदललेले) या तरुणाशी झालेला हा व्हॉट्सअ‍ॅप कॉलवरील संवाद. सुरुवातीला +८४… क्रमाकांने व्हॉट्सअ‍ॅप केला होता. समोरील व्यक्ती अनोळखी होती. तरीही बँकेच्या खात्यावर सुरुवातीला दीड हजार रुपये जमा झाल्यानंतर जयेश खूश झाला होता. त्यानंतर त्याला आलेल्या व्हीडिओवर तो क्लिंक करत सर्व लिंक पाहत होता. हे करताना त्याचा मोबाइलमधील सर्व डेटा आणि बँकेचा सर्व तपशील त्या परदेशी पाहुण्याकडे कधी गेला याची जयेशला कल्पना आली नाही. ज्यावेळी आपल्या बँक खात्यातील एक लाख २० हजार रुपये कुणी काढले असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. त्यावेळी त्याचे डोळे उघडले आणि आपण अनोळखी व्यक्तीसोबत व्हॉट्सअ‍ॅप कॉलवरून जो संवाद साधला त्याच व्यक्तींनी घात केला असावा, असा संशय जयेशला आला. जयेशच्या बाबतीत घडलेला हा एक प्रकार नसून सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यात आता व्हॉट्सअ‍ॅप कॉल स्कॅम प्रकार सुरू झाला आहे. या नव्या फसवणुकीसंदर्भात नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

आजच्या दैनंदिन जीवनामध्ये नागरिक एकमेकांसोबत संवाद साधण्याकरिता व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नागरिकांना फसवणूक करण्याचे फंडे शोधून काढले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने व सध्या सुरू असणारा प्रकार +८४ +६२, +६०, +९२ अशा नंबरने सुरुवात असलेल्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून (मलेशिया, केनया, व्हिएतनाम, इथिओपिया) कॉल करून फसवणूक होत असल्याचे प्रकार पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत. अशा प्रकारांमध्ये कॉल आपण उचलल्यास कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला बोलते ठेवून लिंक, फोटोझ, व्हीडिओ क्लिक करून रेटिंग अथवा काही पैसे मिळतील, असे आमिष दाखविले जात आहेत; परंतु अशा लिंक, फोटोझ, व्हीडिओच्या मागे व्हायरस असण्याची दाट शक्यता असते. त्या माध्यमातून आपल्या मोबाइलमधील डेटा शेअर होऊन आपली फसवणूक होऊ शकते, याची नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. तसेच अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकीबाबत सतर्क राहावे. तसेच अशा प्रकारे कोणत्याही इसमाची फसवणूक झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी करण्यात आले आहे.

सायबर गुन्हे विभागाकडे आलेली काही प्रकरणे बँका, ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्मशी संबंधित आहेत, जेथे फसवणूक करणारे गुन्हेगार हे बँक / प्लॅटफॉर्म अधिकारी म्हणून, पीडिताला OTP, KYC अपडेट्स शेअर करण्यास पटवून देतात आणि काही वेळा पाठवतात. बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. “लोकांनी याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे की कोणतीही बँक किंवा संस्था ही बँक तपशील किंवा पिन नंबरची मागणी मोबाइल नंबरवरून करण्यास अधिकृत नाही. दुर्दैवाने, सुशिक्षित लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहेत आणि लाखो रुपये गमावत आहेत. त्यात आता परदेशातील विशिष्ट क्रमाकांवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून फसवणूक केली जात आहे,’’ अशी माहिती सायबर गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत देतात.

काय आहेत सायबर गुन्हे विभागाच्या नागरिकांना सूचना :
१. + ८४, + ६२, +६० + ९२ अशा क्रमांकाने सुरुवात असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरचे कॉल/व्हीडिओ कॉल रिसीव्ह करू नये अथवा चॅटिंग करू नये.

२. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर Two Step Veification सेटिंग Enable करून ठेवा.

३. अनोळखी व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेल्या लिंक, फोटो, व्हीडिओजवर क्लिक करू नका.

४. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपला सिक्युरिटी कोडची मागणी केल्यास तो कोणासही देऊ नका.

५. बँकेच्या कार्ड तपशील, पिन, ओटीपी पासवर्ड इत्यादी वैयक्तिक किया आर्थिक माहिती कोणासोबत शेअर करू नका.

६. कोणतीही बँक, सीम मोबाइल कंपनी, गॅस वितरण एजन्सी, इलेक्ट्रीसिटी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्राहकांची माहिती मागत नाहीत.

तात्पर्य : व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर आलेल्या अनोळखी व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू नका. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हे कळण्याच्या आधी आपली फसवणूक होऊ शकते. सायबर पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार + ८४, + ६२, +६० + ९२ या क्रमांकावरून आलेले व्हॉट्सअ‍ॅप नंबरचे कॉल/व्हीडिओ कॉल रिसीव्ह करू नये. या प्रकरणातील आरोपींचे धागेदोरे अद्याप सापडले नाहीत. त्यामुळे सायबर विभागाचा हा सल्ला आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहे.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -