
मुंबई (वृत्तसंस्था) : सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकाच्या (नाबाद १०३ धावा) बळावर मुंबई इंडियन्सने उभारलेला २१९ धावांचा डोंगर सर करता करता तगड्या गुजरातच्या नाकीनऊ आली. राशिद खानने नाबाद ७९ धावांची तुफानी फटकेबाजी केल्याने गुजरातला पराभवातील अंतर कमी करता आले. तत्पूर्वी गोलंदाजीतही राशिदने मुंबईच्या फलंदाजांना चकवले होते. पण सूर्या मात्र त्याच्या सापळ्यात अडकला नाही. मुंबईने २७ धावांनी सामना खिशात घालत प्ले ऑफ प्रवेशासाठीच्या रेसमधील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवातीपासून तारांबळ उडाली. अवघ्या ५५ धावांवर त्यांचा निम्मा संघ गारद झाला. डेविड मिलरने त्यातल्या त्यात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला फार यश आले नाही. मिलरने ४१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर राशिद खानने मुंबईच्या गोलंदाजांना तारे दाखवले. त्याने ३२ चेंडूंत नाबाद ७९ धावा फटकवत गुजरातला दारूण पराभवापासून दूर ठेवले. परंतु त्याची एकाकी झुंज गुजरातला विजय मिळवून देण्यात पुरेशी नव्हती. गुजरातला निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १९१ धावाच जमवता आल्या. त्यांनी २७ धावांनी हा सामना गमावला. राशिद खानने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर छाप सोडली. मुंबईच्या आकाश माधवलने ३, तर पियुष चावला, कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.
नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशान यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत पॉवरप्लेमध्ये चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडला. सहा षटकांत ६१ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन लागोपाठ बाद झाले. ईशान किशनने २० चेंडूंत ३१ धावांची योगदान दिले. या खेळीत एक षटकार आणि चार चौकाराचा समावेश होता. तर रोहित शर्माने १८ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र सूर्यकुमार नावाचे तुफान वानखेडेवर अवतरले आणि प्रेक्षकांना षटकार, चौकारांची मेजवानी मिळाली. सूर्याने अखेरच्या षटकावर षटकार लगावत शतक झळकावले.
त्याने ४९ चेंडूंत नाबाद १०३ धावा फटकवल्या. त्यात ११ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी होती. सूर्याने लगावलेले हे शतक यंदाच्या हंगामातील चौथे शतक ठरले. यंदाच्या हंगामात हॅरी ब्रुक्स, व्यंकटेश अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांनी वैयक्तिक शतके झळकावली आहेत. गुजरातच्या राशिद खानने गोलंदाजीत एकाकी झुंज दिली. त्याने ४ षटकांत ३० धावा देत ४ विकेट मिळवल्या. गुजरातचे अन्य गोलंदाज मात्र सूर्याच्या तावडीतून सुटले नाहीत.