- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
अशोक समर्थ, उंच भारदस्त व्यक्तिमत्त्व, खर्ड्या आवाजात समोरच्याचा ठाव घेण्याची लकब, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. हिंदी व मराठी दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या तो काम करतोय. ‘बलोच’ या मराठी चित्रपटातील पठाणी लूक, नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आहे. शशिकांत पवार निर्मित व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या मराठी चित्रपटातील भूमिका टर्निंग पॉइंट ठरेल, असा विश्वास त्यांना आहे. त्या भूमिकेविषयी विचारले असता अशोक समर्थ म्हणाला की, रावरंभा या चित्रपटात माझी भूमिका प्रतापराव सरनोबतची आहे. छान, भावनिक मनाला स्पर्शून जाणारी भूमिका आहे. मला खूप आनंद झाला की, ही व्यक्तिरेखा साकारायची संधी मला मिळाली. अशा व्यक्तिरेखा साकारताना इतिहासाच्या पानात आपण हरवून जातो. आपण जरी त्या व्यक्तीची भूमिका साकारताना शूटिंग करीत असलो तरी त्या व्यक्तिरेखेने ते आयुष्य जगलेले असते. त्यांच्या आयुष्यात तो पराक्रम त्यांनी गाजवलेला असतो. त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या आयुष्यावर आज आपण सुखाने जगत आहोत. माणूस म्हणून माझं या व्यक्तिरेखेशी नाते जुळलेले असते. माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की, या लोकांकडे बलिदान देण्याची एवढी ऊर्जा आली कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात असं काय पेरून ठेवले आहे की, ते आपला जीव त्याग करायला तयार असायचे. प्रतापराव गुजर ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूप जाणीव ठेवावी लागली. कोणतीही ऐतिहासिक भूमिका साकारताना मी जाणिवा ठेवत असतो. गुगलवर संशोधन करून मी प्रतापराव गुजरचा मूळ पोशाख पाहिला, त्यांचा गेट अप पहिला. त्यांच्यासारखा गेट अप मिळाला म्हणून मी ती व्यक्तिरेखा साकारली. माझं पहिलं ऐतिहासिक नाटक होतं तेव्हा आमच्या वेशभूषाकार ऑस्कर अॅवॉर्ड विजेत्या भानू अथैया होत्या. त्यांनी तेव्हाच आम्हाला वेशभूषेचे महत्त्व व कलाकारांचे त्या प्रती असलेल्या जाणिवांचे महत्त्व पटवून दिले होते.
अभिनयाच्या वेडापायी मी गावातून पळून मुंबईला आलो होतो. सुरुवातीचे ७-८ वर्षे मला खूप संघर्ष करावा लागला. हातात काहीही काम नव्हतं. त्यानंतर माझ्या आयुष्यात एक नाटक टर्निंग पॉइंट बनून आलं, ते नाटक होतं, वामन केंद्रे दिग्दर्शित ‘रणांगण.’ या नाटकांमध्ये मी दोन भूमिका साकारल्या होत्या. एक भूमिका होती दत्ताजी शिंदे व दुसरी भूमिका होती अहमदशहा अब्दालीची. परिपक्व नट म्हणून घडण्याची जी प्रक्रिया सुरू होते, ती त्या नाटकापासून सुरू झाली. एखाद्या कलाकृतीमध्ये समृद्ध जीवनाचा प्रवास दिग्दर्शक ओतत असतो. कलाकाराने अभिनयाचा दर्जा सुधारायला हवा. ज्यावेळी तुम्ही एखादे नाटक करता त्याचवेळी अभिनयाचा दर्जा सुधारला जातो. अभिनय सुधारण्यासाठी, नट म्हणून घडण्यासाठी उत्तम साहित्याचा देखील त्यामध्ये वाटा असतो. रणांगणमध्ये आम्ही ज्यांनी ज्यांनी काम केले ते सारे नावारूपाला आले. त्या नाटकांमधून आमची जडण-घडण होत गेली. रणांगणनंतर मी त्या संस्थेची ५ ते ७ नाटके केली.
त्यानंतर माझ्या आयुष्यात आलेला टर्निंग पॉइंट म्हणजे मला मिळालेला पहिला हिंदी चित्रपट, त्या चित्रपटाचं नाव होतं ‘शबनम मौशी’ ‘रणांगण’नंतर मला ऐतिहासिक भूमिकेतून बाहेर पडायचं होतं, त्यासाठी मी ‘केस नं ९९’ हे नाटक करीत होतो. एकदा हे नाटक पाहायला हिंदीतील प्रसिद्ध लेखक आदेश पी. अर्जुन आले होते. त्यांनी या अगोदर खतरों के खिलाडी, बाजीगर, ऐतराज, दरार या चित्रपटाचे लेखन केले होते. त्यांनी या नाटकातील माझं काम पाहिलं, त्यांना ते खूप आवडलं. ये कुछ अलग ही बंदा है, असं कदाचित त्यांना वाटलं असेल. त्यांनी मला त्या चित्रपटामध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडलं. त्यामध्ये आशुतोष राणा, गोविंद नामदेव हे नामवंत कलावंत होते. त्यानंतर मला ‘एक चालीस की लास्ट लोकल’ हा चित्रपट मिळाला. त्यामध्ये माझी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका होती. त्यामध्ये अभय देओल, नेहा धुपिया हे कलाकार होते. त्यानंतर मला दिग्दर्शक राज कुमार संतोषींनी अजय देवगण, अक्षय कुमार यांच्यासोबत ‘इन्सान’ या चित्रपटामध्ये घेतलं.
त्यानंतर माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आला तो म्हणजे मला मिळालेला रोहित शेट्टीचा चित्रपट आणि तो चित्रपट होता ‘सिंघम.’ तो चित्रपट सुपर डूपर हिट ठरला. एका रात्रीत मला स्टारडम म्हणजे काय असते हे कळाले. ज्या दिवशी मुंबईला सिंघमच स्क्रिनिंग होतं, त्यावेळी मी दिग्दर्शक राजमौलीच्या एका तेलुगू चित्रपटाचे हैदराबादला शूटिंग करीत होतो. रात्री दोन वाजता माझे त्या चित्रपटाचे पॅक अप झाले होते. रात्री अडीच वाजता मला एक फोन आला. तो मी उचलला आणि पाहिला, तर तो फोन अभिनेता प्रकाश राज (सिंघममधील जयकांत शिकरे) यांचा होता. त्यांनी मला विचारले की, तू येथे स्क्रिनिंगला का नाहीस? मी त्यांना सांगितले की, मी एका तेलुगू चित्रपटाचे हैदराबादला शूटिंग करीत आहे. त्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि त्यांच्या पत्नीकडे फोन दिला. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मी तुमची एक चालीस की लास्ट लोकल या चित्रपटापासून फॅन आहे. सिंघम चित्रपटात तुम्ही मुख्य खलनायक नसलात तरी तुम्ही जे काम केलंत त्याला तोड नाही. तुम्ही इतरांना खाऊन टाकलं.’ या स्तुतीमुळे मी भारावून गेलो.
अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये माझी सकाळची सातची शिफ्ट होती. सकाळी मला उशिराच जाग आली, मी स्टुडिओत गेलो. माझ्या मोबाइलची बॅटरी डाऊन झाली होती. माझ्या आजीचे त्या दिवशी निधन झाले होते. सव्वातीनच्या सुमारास मोबाइल सुरू केला. त्यावेळी चारशे ते पाचशे मिस्ड कॉल होते. प्रत्येकाला फोन करणं शक्य नव्हतं. त्यातला त्यात परिचित व्यक्तीला मी फोन करून विचारले तेव्हा मला कळले की, रात्री स्क्रिनिंगला अमिताभ बच्चन आणि इतर मान्यवर आले होते आणि सगळे जण माझी चर्चा करीत होते. माझ्या मोबाइलवर आलेल्या मेसेजची संख्या देखील चारशेच्या घरात गेली होती. काही मेसेज वाचत गेल्यावर हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं की, सिंघमने देदीप्यमान यश प्राप्त केलेले आहे. प्रेक्षकांनी माझी देखील दखल घेतलेली आहे.
पुढे भविष्यातील टर्निंग पॉइंट म्हणाल, तर मी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट ‘जननी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये डॉ. मोहन आगाशे, कमलेश सावंत, विजय निकम हे कलावंत आहेत. या चित्रपटाला नेपाळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले आहे. रांची फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सध्या मी एका नवीन हिंदी चित्रपटाचे अयोध्या येथे शूटिंग करीत आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘छे नऊ पाँच’ म्हणजे ६ डिसेंबर, ९ नोव्हेंबर, ५ ऑगस्ट या तारखा बाबरी मस्जिदशी संबंधित आहेत. या चित्रपटामध्ये माझी रामचंद्रदास परमहंस या व्यक्तीची भूमिका आहे. या चित्रपटामध्ये अरुण गोविल, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी हे कलावंत आहेत.