पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाने वाकड परिसरात एका उच्चभ्रू हॉटेलवर छापा टाकून दोन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी काही दलाल अवैधरित्या अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एका उच्चभ्रू हॉटेलवर छापा टाकून या मुलींची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दलालाने वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यास सांगितल्या. या ठिकाणी काही बनावट ग्राहक ठेवून दोन्ही मुलींना त्या ठिकाणी बोलावले. सदर ठिकाणी पोलिसांनी अचानक छापा टाकून दोन मुलींना ताब्यात घेवून विचारपूस केली. त्यावेळी दलाल हा जवळच आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून दोन पिडीत महिला व एक दलाल यांना ताब्यात घेतले.
आरोपीवर वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पिडीत मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे. एक पिडीत मुलगी भोजपुरी अभिनेत्री व एक पिडीत मुलगी ही मॉडेलिंग करत असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.