आमदार नितेश राणे यांचे आव्हान
कणकवली (प्रतिनिधी) : संजय राऊत यांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते पुन्हा जेलमध्ये जातील, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथील प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब यांच्यामुळे ठाकरे गट संपला. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झाले हे महाराष्ट्राच्या जनतेला जरा सांगावे? नैतिकतेच्या गोष्टींवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत नैतिकतेची भाषा करताहेत. त्यांना विचारायचे आहे, अधिकृत शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा हे नाव कोर्टाने तात्पुरते दिले होते. उद्धव ठाकरेंना पक्षाचे वेगळे नाव आणि चिन्ह निवडावेच लागणार आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाइव्ह केले होत त्याची क्लिप जनतेने पहावी तसेच त्याची आठवण उद्धव ठाकरेंना करून देताना नितेश राणे म्हणाले की, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारपदाचा राजीनामा देतो, असे म्हटले होते. मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? तुमच्यात खरीच नैतिकता असेल, तर आमदारकीचाही राजीनामा द्या.
पुढे नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेची भाषा तुम्ही करता. मुळात नैतिकतेच्या गोष्टी उद्धव ठाकरेंना शोभत नाहीत. २०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी लाड पुरविले आणि २०१९ नंतर याच उद्धव ठाकरेंनी घात केला. त्यामुळे त्यांना नैतिकतेच्या गोष्टी शोभत नाहीत त्यांनी आमदारकीचा राजीनामाच द्यावा. संजय राऊत ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतांवर खासदार झाले त्या खासदारकीचा पहिला राजीनामा द्या. मग बघू तुमची नैतिकता..! तीन महिन्यांत हे सरकार कोसळणार, असे उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितले होते. मात्र आता मे महिना आहे. काय झालं? माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींमुळे उद्धव ठाकरे आमदार झाले आहेत, हे देखील त्यांनी विसरू नये, असे नितेश राणे म्हणाले.