- नीलेश मोरे
खरं तर सामान्य माणसाला उद्योजक बनवणारं व्यासपीठ म्हणजे नुकताच षण्मुखानंद सभागृहामध्ये संपन्न झालेला ‘मी उद्योजक होणारच’ हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा समाजाला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच नवउद्योजक घडविण्यासाठी समाजातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी व नवउद्योजक हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, समृद्धीसाठी राज्यातील जास्तीत जास्त मराठा समाज शेती व नोकरीत न अडकता उद्योजक झाला पाहिजे, आरक्षणाच्या पलीकडे अर्थकारण हे वास्तविक जग आहे, हे समजून घेऊन मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, या आनुषंगाने मुंबई (माटुंगा) येथे षण्मुखानंद सभागृह येथे मी उद्योजक होणारच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आणि प्रचंड प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नवउद्योजकांना प्रेरणा देणारे मार्गदर्शनपर भाषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा आणि मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाची शान ठरली.
आजच्या नव्या पिढीने उद्योगक्षेत्राकडे वळण्यासाठी तसेच उद्योग-व्यवसायात पुढे यावे यासाठी आजच्या पिढीला महाराजांचा इतिहास सांगून उपयोग होणार नाही, तर तरुण पिढीला उद्योजक होण्याचा मार्ग दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनाही प्रेरणा दिली पाहिजे. आपला मराठा समाज सुखी-समाधानी आणि श्रीमंत झाला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तरुणांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. यासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे नारायण राणे यांनी आश्वासित केले. तर देशाच्या अर्थकारणात मुंबई ३४ टक्के योगदान देते. यामध्ये मराठ्यांचे योगदान हवे असून आपण अर्थव्यवस्थेचे मानकरी झाले पाहिजे. उद्योग-व्यवसाय वाढीसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जंगलाचा अभ्यास करण्यास सांगितला असून या जंगलामध्ये औषधी वनस्पती आढळल्या तरी त्यामधून उद्योग निर्माण करता येऊ शकतो. आपले तरुण शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा मार्ग अवलंबतात. तिथेच नोकरीही पत्करतात, मात्र आपण तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांना कोणत्या उद्योगात फायदा आहे, हे सांगितले गेले पाहिजे, यासाठी दिल्लीत आपला विभाग इन्स्टिट्यूट उभारण्यात येणार असून येथील तरुणांनी आपल्या आवडत्या उद्योजकांचा फोटो घरात लावला पाहिजे. त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजेत. तरुणांनी मुकेश अंबानी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे, असे प्रेरणादायी विचार केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मांडत नवउद्योजकांना उद्योगव्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहित केले.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते. म्हणून मराठा समाजातील तरुण शेती, नोकरी पुरते मर्यादित न राहता, उद्योजक म्हणजे नोकऱ्या देणारे हात
निर्माण झाले पाहिजेत, असे बाळासाहेब नेहमीच सांगत असत. दरम्यान मी उद्योजक होणारच या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. ते मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मराठा समाज खऱ्या अर्थाने समृद्ध झाला पाहिजे, तरुण स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्याची ओळख निर्माण झाली पाहिजे, असेही आजच्या पिढीला उद्योग व्यवसायात उद्युक्त करणारे विचार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठा महामंडळाचे अध्यक्ष अॅड. के. शशिकांत पवार यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, नरेंद्र पाटील, प्रसाद लाड, सुरेश हावरे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी उदय सामंत यांचे विचारही उद्योजकांना मार्गदर्शनपर ठरले. महाराष्ट्रातील उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, तर छोटे-छोटे व्यवसाय सुरू झाले पाहिजेत व उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य देण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी उद्योजकांना संबोधले. तसेच उद्योजक होण्यासाठी खडतर परिश्रम आणि त्यामध्ये आलेले अडथळे पार करत यशस्वी उद्योजक घडेपर्यंत काय करावे लागते याचा अनुभवही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
या समारंभात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नरेंद्र पाटील यांनी मांडलेल्या योजनेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सुरेश हावरे यांनी स्टार्टअप या विषयावर युवकांना केलेले मार्गदर्शन, तसेच सुरेश हावरे यांच्या (स्टार्टअप), राजेंद्र सावंत यांच्या (मेंटॉर) पुस्तकाचे प्रकाशन, तसेच निर्माते प्रकाश बाविस्कर यांच्या (मराठी पाऊल पडते पुढे) या चित्रपटाचे ट्रीझर प्रकाशित करण्यात आले.
या कार्यक्रमात गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील, निर्माण ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, तेजस ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संग्राम पाटील, कुंदन गुरव, प्रकाश बाविस्कर, प्रवीण गायकवाड, संजय यादवराव यांसह विविध मान्यवरांनी मार्गदर्शनाने मी उद्योजक होणार कार्यक्रम नवउद्योजकांसाठी उत्तम प्रेरणादायी ठरला.
(लेखक हे मी उद्योजक व्यासपीठचे संथापक अध्यक्ष आहेत )