Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सबालपणीचा काळ सुखाचा

बालपणीचा काळ सुखाचा

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

बालपणीचा काळ सुखाचा
तुमच्या-आमच्या हक्काचा
मौजमजेचा-आनंदाचा
बालपणीचा काळ सुखाचा…
लहानपण असतंच आयुष्यातील आनंदाचं पर्व. त्या पर्वात ना कोणती जबाबदारी, ना भीती, ना कोणाची अडवणूक. मनाला येईल तसं वागण्याचा काळ आणि काही चूक झालीच तरी मोठी माणसं म्हणणार, अरे लहानच आहे झाली चूक! अशी लगेच माफी मिळाली की पुन्हा खेळण्यात दंग असं ते सुरम्य बालपण. त्या बालपणातील खरी मज्जा करण्याचा काळ म्हणजे मे महिन्याची सुट्टी. आपली हक्काची सुट्टी.

मला तर कधी एकदा शेवटचा पेपर संपतो आणि ती मे महिन्याची सुट्टी लागते असं व्हायचं. आम्ही तेव्हा चाळीत राहायचो. तेव्हा सगळ्यांची घरं लहानच होती पण मनं मात्र सर्वांची मोठी होती. मे महिना सुरू झाला की, आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र यायचो, मोठमोठे बेत करायचो. मे महिन्याची सकाळची सुरुवात अंगणात होत असे. आमच्या बैठ्या चाळीत बरीच घरं होती. आमच्या घरासमोर एक मोठं मैदान होतं आणि तिथे मोठ मोठी झाडंही होती. त्यावर पटापट कोण चढेल याची स्पर्धा लागायची. झाडावर चढता चढता खाली पडलो तरी आम्ही एकमेकांना सावरून घेत असू. पडलं, लागलं, खरचटलं की, आपण लवकर मोठे होऊ असं एकमेकांना समजावून पुन्हा दुसऱ्या खेळाला सुरुवात करत असू.

प्रत्येकाच्या घराचं दार सतत उघडं असायचं. त्यामुळे आम्हाला कधीही कोणत्याही घरात सहज प्रवेश मिळत असे. कधी माझ्या घरी तर कधी मैत्रिणीच्या घरी मस्त भातुकलीचा खेळ रंगायचा. ती छोटी छोटी भातुकलीची भांडी सजवण्यात आम्हाला भारीच मजा येई. ती छान रचून झाली की आम्ही जेवण बनवत असू. एकदा तर आम्ही घरातून गुपचूप पोहे घेतले आणि आमच्या भातुकलीच्या चुलीवर म्हणजे खोट्या खोट्या चुलीवर खरेखुरे पोहे बनवण्याचा घाट घातला. तो प्रयत्न अर्थातच असफल ठरला. कारण पोह्यात पाणी खूप जास्त झालं आणि खोट्या गॅसमुळे पोहे गरम झालेच नाहीत. पण त्याने आम्हाला काहीच फरक पडला नाही. तेच ओले पोहे आम्ही चवीचवीने खाल्ले.

आमच्या बागेतील झाडांची पानं म्हणजे आमची खोटी खोटी भाजी असायची. ती तोडून आम्ही नवीन नवीन पदार्थ बनवायचो. भातुकलीच्या खेळात बाहुली आणि बाहुल्याचं लग्न लावायचो, गाणी म्हणत वरातीत नाचतात तसे नाचायचोही.

प्रत्येक दिवशी नवा खेळ तयार असे. आमचा सगळ्यात आवडता खेळ कोणता असेल, तर तो म्हणजे मातीची भांडी बनवणं. अंगणात भरपूर लाल माती होती. पाणी टाकून तिला छान मळून आम्ही भातुकलीची भांडी बनवायचो. ती उन्हात छान सुकवून दर वेळी नवीन भातुकली खेळत असू. एकदा तर मी सुकलेली पानं, लाकूड वगैरे गोळा करून त्याची शेकोटी बनवली आणि वीटभट्टीत तापवतात ना तशी ती सुकलेली भांडी शेकोटीत टाकली. वाटलं जास्त टिकतील. पण कसचं काय, ती काळी ठिक्कर पडली. मग मी त्यांना रंग देऊन पुन्हा नवीन केली. चाळीत लाईट गेली की लपंडाव खेळण्याची मजा काही औरच असायची. पकडापकडी, डोंगराला आग लागली पळा पळा, आठ चल्लस, साखळी, तळ्यात मळ्यात, शाप की वरदान, लगोरी, टिपरी पाणी असे एक ना अनेक खेळ आम्ही खेळत असू. पत्त्याचा डाव मांडला की तो इतका रंगायचा की आम्ही दुपारचे जेवणही विसरून जात असू. रात्री गच्चीवर जाऊन आकाशातल्या चांदण्या मोजत मोजत हलकेच झोप केव्हा लागून जाई कळतही नसे.

खेळ खेळताना रुसवे-फुगवे, कट्टी बट्टी हे सगळं वारंवार व्हायचं. पण कितीही भांडलो तरी लगेच समेट होऊन आम्ही पुन्हा एकत्र खेळत असू. आमच्यात ना कोणी मोठा ना लहान, ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत असे. आमच्यात कमालीची एकी असायची. असं हे खेळकर, खोडकर बालपण खेळता खेळता आम्हाला बरंच काही शिकवून गेलं. ही पूंजी पुढे आम्हाला आयुष्यभरासाठी मोलाची ठरणार आहे, हे तेव्हा कदाचित कळलंही नसेल. पण आज तिचं महत्त्व जाणवतं आणि मन पुन्हा पुन्हा बालपणीच्या रम्य आठवणीत हरवून जातं. पुन्हा लहान होऊन बालपणीचा सुखाचा काळ अनुभवावा असं वाटतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -