Tuesday, May 13, 2025

महामुंबई

आपल्या १४-१५ आमदारांना राजीनामा द्यायला सांगा

आपल्या १४-१५ आमदारांना राजीनामा द्यायला सांगा

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या १४-१५ आमदारांना उद्याच्या उद्या राजीनामा देण्यास सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिले.



सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कालपासून उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत नैतिकतेची भाषा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढली होती. त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपची मतेही पडली होती. त्यामुळे नैतिकता दाखवायची असेल, तर भाजपच्या मतांच्या मदतीने निवडून आलेल्या या चौदा-पंधरा आमदारांनी आपल्या पदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मग नैतिकतेच्या गोष्टी लोकांना सांगाव्या, असेही खासदार शिंदे म्हणाले.



सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने मांडलेल्या आठ विविध याचिकांपैकी सहा याचिका फेटाळलेल्या आहेत. राजकीय पक्ष निश्चित करण्यासाठी तसेच अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे अधिकार अध्यक्षांकडे असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चवताळलेल्या ठाकरे गटाने आता अध्यक्ष घटनाबाह्य आहेत, अशी भाषा बोलायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत असलेले आमदार आणि तसेच कार्यकर्ते टिकवण्यासाठी, त्यांची दिशाभूल करण्यासाठी आता यांनीही आवई उठवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे सरकार घटनाबाह्य नसून कायदेशीर आहे असेही स्पष्ट केलेले आहे. याआधी हे सरकार तीन महिन्यांत कोसळेल, असे सांगत कार्यकर्त्यांना थोपवून धरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. ते आता साध्य होत नाही, हे सरकार टिकणार आहे हे लक्षात आल्यानंतर आता त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारून आपली बाजू कशी योग्य होती, हे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment