सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा आहे, असं ते यावेळी म्हणाले.
“कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत म्हणून आज हे सगळं उभं राहिलं. आपण कुठच्या पदावर बसलेलो आहोत हे प्रत्येकाला समजलं पाहिजे”, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना जपून राहण्याचा सल्ला दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार विधीमंडळातल्या गटाला पक्ष म्हणून मान्यता नसून बाहेरच्या गटाला आहे. मग आता निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह ज्या गटाकडे दिलं गेलंय त्याचं काय होणार? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.