कोकणातील बंद घरांचे अश्रू...!

  542


  • माझे कोकण : संतोष वायंगणकर


मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर भागात चाकरी करणाऱ्यांचा प्रदेश म्हणजे आपलं कोकण! पुणे, मुंबईत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील असंख्य कोकणवासीयांनी शहराचा रस्ता धरला. चाळीस वर्षांपूर्वी कोकणात सर्वसाधारणपणे एसएससी झालेला तरुण रोजगारासाठी मुंबईत जायचा. जी काही छोटी-मोठी नोकरी मिळेल ती करायची. सणासुदीला गावच्या ओढीने गावी यायचा. खिशात फार पैसे नसले तरी गावाची, घरची ओढ आई-वडिलांवरच जीवापाड असणारं प्रेम हे गावी यायला लावायचे. कोकणातल्या गावी कशाला थांबायचे, असा प्रश्न त्यावेळच्या तरुणांना पडायचा आणि मग यासाठीच गावची प्रचंड ओढ असणारा तरुण मुंबई गाठायचा.


मुंबईत राहून त्याचा जीवन संघर्ष सुरूच होता. तेव्हाही मुंबईत राहायची सोय नसायची; परंतु आजची गर्दी तेव्हा नव्हती. गावातल्या एखाद्याने जरी खोली घेतली तरीही त्यात दाटीवाटीने राहायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचा. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत विकासाचे स्वप्न घेऊन विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कोकणात ‘राजकीय एन्ट्री’ झाली.


गेल्या तीस वर्षांत विविध विकास प्रकल्प आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न नारायण राणे यांनी केला. त्यात १९९७ साली पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून पर्यटनाला या जिल्ह्यात प्रचंड वाव निर्माण केला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून, तर रत्नागिरी जिल्हा फलोद्यान आणि ठाणे, रायगड हे औद्योगिकतेत विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. त्यासाठी त्यांनी टाटा कन्सल्टीकडून खास सर्वे करून घेतला. त्यांनी त्याबाबतचा अहवालही दिला; परंतु त्याची प्रत्यक्ष कार्यवाहीच्या काळात सत्तेत बदल घडला. कोकण विकासाचे एक नवं स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरण्यासाठी असंख्य अडचणी निर्माण झाल्या.


नव्याने काही प्रकल्प किंवा कशाचेही नियोजन सुरू झाले की, त्याला ‘राजकीय विरोध’ हे एक नवं समीकरणच पुढे आले. सकारात्मक मानसिकता नसलेल्या कोकणात विरोध करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. विरोध का होतो, कोण कशासाठी करतोय, हे डोळसपणे पाहणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. यामुळेच कोकणात काही उभं राहू शकले नाही. जेवढी कारणीभूत राजकीय नेते, पुढारी आहेत तितकीच जबाबदारी आपलीही आहे. अमूक नेत्याने काय केले? म्हणून जेव्हा विचारणा होते तेव्हा आपणही आपली जबाबदारी पार पाडली आहे का? हा प्रश्न स्वत:लाही विचारायला शिकलं पाहिजे.


कोकणात कोणताही प्रकल्प आणायचा विषय आला की, प्रकल्पासंबंधी जाणून घेण्यापूर्वी पुड्या सोडणाऱ्यांवर विश्वास ठेवून विरोध करणारे आपोआपच तयार होतात. कोकणात येणाऱ्या कोण-कोणत्या प्रकल्पांना विरोध कोणी केला आणि समर्थन कोणी केले, हे देखील पाहिले पाहिजे. आजवरचा विरोध हा राजकीय विरोध राहिला आहे. हे बारकाईने पाहिल्यास लक्षात येऊ शकेल. ताज, ओबेरॉय यांसारखे पंचतारांकित हॉटेल प्रकल्प, एन्रॉन, जैतापूर अणुऊर्जा, रिफायनरी प्रकल्प या व अशा सर्वच प्रकल्पांना विरोध होत राहिला. कोकणातही बेकार असणाऱ्या तरुणांना नोकरीची कोणतीही संधी नाही. कोकणात कोणतीही संधी नाही म्हणून आजही पुणे, मुंबईत नवी पिढी धावतेय. चाळीस वर्षांपूर्वी पुणे, मुंबईत गेलेल्यांनी जो जीवन संघर्ष केला तोच संघर्ष आजच्या पिढीच्या नशिबी आहे. याकडे राजकारण म्हणून जे कोणी पाहत असतील त्यांनी सामाजिक भान आणि जाणिवेतून याकडे पाहावे. कोकणात पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणारी आजही मानसिकता नाही. फुटभराच्या जागेवरून वर्षानुवर्षे वादविवाद करत न्यायालयात दिवस घालवणारे आजही दिसतात. आज कोकणातील गावोगावचे इंजिनीअर झालेले तरुण केवळ नाईलाजाने मुंबई, पुण्यात जात आहेत. यामुळेच कोकणातील बंद घरांची संख्या ही फार मोठी आहे. एक तर वृद्ध असलेले एखाद्या घरात जोडपं दिसतं तर गावातील असंख्य घरही बंदच आहेत. फक्त गणेशोत्सवाचे पाच दिवस किंवा मे महिन्यात आठ-पंधरा दिवस एवढ्यापुरताच गावात वावर राहातो. बाकी इतर वेळी अनेक घरांना कुलूपच असतात. पूर्वीची नांदती असणारी ही बंद घरांचे हुंदके कोणी तरी कधीतरी समजून घेतली पाहिजे. राहात्या घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊनच आपण जीवन जगत असतो; परंतु आज कोकणात रोजगाराची काही संधी नाही. केवळ याचसाठी कोकण सोडणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. या विषयांचे राजकारण करणाऱ्यांचे राजकारण चालू राहिलं; परंतु या अशा आडमुठ्या धोरणांनी, राजकारणांनी जी बंद घरं आहेत ती कायमची उघडली जाणार नाहीत. गाव, शहर ही उद्योग व्यवसायानेच प्रगतीकडे झेपाऊ शकतात.


राजकीय पक्षीय राजकारण कसंही चालू राहिलं तरीही कोकणातील सर्वसामान्य जनतेने फार गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. फक्त आपण विरोध का करतो. एवढं समजून तरी घ्या आणि मग विरोध करायचा की नाही हे ठरवा. या अशाच होत असलेल्या विरोधामुळे कोकणात कोणताही प्रकल्प येणं अवघड आहे. विरोधातली वर्षे वाया घालवण्यापेक्षा इतर भागात कोणताही प्रकल्प उभा राहील तशी मानसिकता उद्या उद्योगक्षेत्राची झाली, तर आपण आश्चर्य वाटून घेऊ नये. कोकणातील बंद घरांची संख्या वाढवायची की, ही बंद असलेली घरं नेहमी हसती-खेळती ठेवायची हे आपणच ठरवावयाचे आहे.


Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने