कारंजा येथे लक्ष्मण घुडे नावाचा वाजसनिय शाखेचा विप्र राहात असे. हा विप्र घरचा धन-कनक संपन्न असा होता. या विप्रास पोटातील रोग झाला. अनेक उपाय केले, वैद्यांना दाखविले. पण उपयोग झाला नाही. सर्व खर्च व्यर्थ गेला. या लक्ष्मणाने समर्थांची कीर्ती ऐकली होती. म्हणून अतिशय त्वरेने लक्ष्मण सहपरिवार शेगाव येथे समर्थांना भेटण्यास आला. पोटाचे दुखणे एवढे होते की, व्यथेने त्याला चालतादेखील येत नव्हते. दोघा तिघांनी त्याला उचलून मठात आणले. व्याधीमुळे त्याला समर्थांना नमस्कारसुद्धा करता येत नव्हता. त्याच्या धर्मपत्नीने श्री महाराजांपुढे पदर पसरला व समर्थांना प्रार्थना करून म्हणाली, “समर्था मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना आपण हरण कराव्या.” त्यावेळी समर्थ आंबा खात होते. तोच आंबा महाराजांनी तिच्या अंगावर फेकला आणि म्हणाले, “जा. हा तुझ्या पतीला खायला घाल. त्याची व्याधी बरी होईल.”
या प्रसंगाचे वर्णन दासगणू महाराज सांगतात,
असो एक कारांज्याचा।
लक्ष्मण घुडे नावाचा।
विप्र वाजनिय शाखेचा।
धनकनक संपन्न असे।।२६।।
त्यासी रोग झाला पोटात।
उपाय केले अत्यंत।
परी गुण न आला किंचित।
खर्च सारा व्यर्थ गेला।।२७।।
त्याने समर्थांची कीर्ती।
करणोपकरणी ऐकली होती।
म्हणून सहपरिवारे सत्वरगती।
आला शेगांवाकारणे।।२८।।
रोगव्यथेने चालवेना।
श्रोते तया लक्ष्मणा।
दोघातिघांनी उचलून जाणा।
आणिले त्या मठात।।२९।।
करण्या नुसता नमस्कार।
असमर्थ होते शरीर।
त्याच्या कुटुंबाने पदर।
समर्थांपुढे पसरीला।।३०।।
आणि म्हणाली दयाघना।
मी आपली धर्मकन्या।
माझ्या पतीच्या यातना।
हरण कराव्या आपण।।३१।।
अमृताचे दर्शन।
होता का यावे मरण।
माझ्या कुंकवालागून।
टिकवा हीच विनंती।। ३२।।
त्या वेळी समर्थास्वारी।
आंबा खात होती खरी।
तोच फेकीला अंगावरी।
त्या लक्ष्मणकांतेच्या।। ३३।।
जा दे हा पतीस खाया।
व्याधी त्याची बरी व्हाया।
तू शोभसी त्यास जाया।
पती-भक्ती परायण।। ३४।।
एवढे बोलून महाराज शांतपणे चिलीम ओढू लागले.
भास्कर महाराज लक्ष्मणाच्या पत्नीला बोलले, “अहो बाई, आता इथे थांबू नका. तुमच्या पतीस लवकर करांज्याला घेऊन जा आणि समर्थांकडून जो आंब्याचा प्रसाद तुम्हाला प्राप्त झाला आहे, तो पतीला खायला घाल. याने तुझे काम होईल. लक्ष्मणाला गुण येईल आणि व्याधीतून आराम पडेल.” असे बोलणे ऐकून ती आपल्या पतीला घेऊन करांज्यास निघून गेली व तो समर्थांकडून प्रसाद म्हणून प्राप्त झालेला आंबा तिने पतीस खावयास दिला. हे जोडपे घरी आल्यावर आप्त मंडळी शेगावी काय घडले? त्याबद्दल विचारपूस करू लागली. तेव्हा तिने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. तसेच मी तो प्रसादाचा आंबा पतीस खावयास दिला, असे त्यांना सांगितले. हे तिचे बोलणे ज्यावेळी वैद्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना वाईट वाटले. ते लक्ष्मणाच्या पत्नीस म्हणाले, “अहो बाई, हे काय केलेत? आंबा हे पोटातील व्याधिकरिता कुपथ्य आहे. वेगवेगळ्या वैद्यकीय ग्रंथांमधून ही असेच सांगितले आहे.” इथे पाहा, दासगणू महाराज यांचे सर्व विषयांमधील ज्ञान किती होते. दासगणू रचनेत म्हणतात,
अहो बाई तुम्ही काय।
केलेत हे हाय हाय।
आंबा हेच कुपथ्य होय।
या पोटातील रोगाला।। ४४।।
माधवनिदानी हेच कथीले।
सुश्रूतांनीही वर्णिले।
निघंटाने कथन केले।
शारंगधर म्हणे ऐसेच।।४५।।
तो आंब्याचा प्रसाद लक्ष्मणाने भक्षण केल्यानंतर त्याची व्याधी एकदम बरी झाली. कधी कधी वैद्यकशास्त्रदेखील जिथे हात टेकते, तिथे देवसंतांची कृपाच उपयोगी पडते. (याबद्दल प्रस्तुत लेखकाच्या बाबतीत घडलेली कथा या लेखमालेत महाराजांचे आलेले अनुभवकथनातून येणारच आहे.)
असो. हा लक्ष्मण घुडे बरा झाल्यावर शेगाव येथे आला आणि त्याने महाराजांना स्वतःचे घरी येण्यास विनंती केली. त्याचा आग्रह पाहून महाराज त्याचे घरी कारंजा येथे आपल्या तीन भक्तांसह पोहोचले. लक्ष्मणाने घरी आलेल्या महाराजांची पूजा केली.
दक्षिणा निवेदन करताना महाराजांना असे म्हणाला की, “महाराज, ही अवघी संपत्ती आपली आहे. मी कोण देणार?” म्हणताना जरी लक्ष्मण असे म्हणाला, तरी एका ताटात काही रुपये ठेवले. हे पाहून महाराज लक्ष्मणाला बोलले की, “अरे तू म्हणत होतास की माझे काही नाही. सर्व संपत्ती आपली आहे. मग आता हे रुपये कुठून आणले? असे दांभिकपणाचे चाळे करू नकोस. तू आपले घर मला दिले आहेस. मग आता सर्व कुलुपे काढून फेकून दे. सगळी दार उघड.”
यावर लक्ष्मण काहीच बोलला नाही. पण समर्थांनी खजिन्याचे दार उघडण्याचा आग्रह धरला. अखेर भीत-भीत त्याने खजिन्याचे दार उघडले खरे. पण उंबरठ्यावर स्वतः जाऊन बसला आणि वरून म्हणाला, “महाराज यावे. वाटेल ते घेऊन जावे.” असे जरी म्हणाला तरी अंतकरणात वेगळेच भाव होते. हे त्याचे दांभिकपण समर्थांना कळून आले. महाराज त्याच्या घराला सोडून उपाशीच निघाले. दंभिकांच्या घरी संत कदापिही तृप्त होत नाहीत. इथे महाराजांना लक्ष्मणाच्या घराची किंवा धनदौलतीची गरज नव्हती. ते तर वैराग्याचे सागर होते. पण लक्ष्मण जे काही बोलला, त्यातील सत्यपणा महाराजांनी पाहिला. खोटेपणाचा राग आला, म्हणून तेथून उठून उपाशीच निघून आले.
महाराज जाता जाता त्याला बोलले, “माझे माझे म्हणतोस, भोग आता त्याची फळे. त्याला माझा उपाय नाही. अरे, मी तर तूझ्यावर कृपा करावयास आलो होतो. तुजजवळ जे आहे, ते दुप्पट करून द्यायला आलो. पण ते तुझ्या प्रारब्धात नाही. तेच पुढे सत्य झाले. थोड्या कालावधीतच लक्ष्मणाची सर्व संपत्ती नष्ट झाली. अध्यायाच्या समापनाच्या ओवीमध्ये संत दासगणू महाराज म्हणतात,
म्हणून श्रोते परमार्थात।
खोटेपणा न खपे किंचित।
याचसाठी हे चरित्र।
समर्थे घडवून आणिले।।६९।।
श्रीगजानन चिंतामणी।
त्या गार काय शोभा आणि।
वा सुवर्णालागूनी।
भूषवावे का कथिलाने।। १७०।।
या अध्यायातून हेच शिकावयाचे आहे की, परमार्थामध्ये खोटेपणा करू नये. संतांसमोर नेहमी विनम्र भावानेच वागावे.
क्रमशः
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…