केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काढले वाभाडे
मुंबई: न्यायलयालाच्या निर्णयावर बोलणाऱ्या गल्लीतल्या उद्धव ठाकरेला संविधान माहित आहे का? या शब्दांत केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे त्यांच्या खास शैलीत वाभाडे काढले. त्यांच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर आलेल्या प्रतिक्रायांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषदत घेतल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषेवर टीकास्त्र सोडले. जाहीरित्या बोलू न शकणारे शब्द उद्धव ठाकरे यांनी वापरल्याबाबत नारायण राणे यांनी त्यांचा समाचार घेतला. सामनातील आजच्या मथळ्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत १६ आमदार अपात्र ठरणार असे म्हणत होते. त्यांनी सामनाची हेडलाईनही तशी केली. पण त्यांच्याकडे किती आमदार राहिले आहेत याची ते वाच्यता करतात का? कोणत्या जोरावर ते पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न बघत होते याची आकडेवारी ते सांगत नव्हते. मुळात शिवसेनाच आता गल्लीत मावेल इतकी राहीली आहे. त्यामुळे त्यांनी मातोश्रीपुरतेच उरलेल्या उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून आता आहेत ती माणसं टिकवावीत. ती तरी २०२४ पर्यंत थांबतात का हे पाहावे. आमच्यावर टीका करत बसू नये नाहीतर आम्ही जी टीका करू ती सहन करण्याची तयारी ठेवावी, असा इशारा दिला.
सत्तेच्या लोभापायी हिंदूत्व आणि नैतिकतेला तिलांजली देणाऱ्यांनी नैतिकतेची भाषा करु नये या शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना फटकारले. नारायण राणे म्हणाले की , सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आमचेच सरकार पुन्हा येणार अशी भविष्यवाणी करणा-यांना चांगलीच चपराक बसली आहे. शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल लागल्यामुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत व त्यांचे काही सहकारी नैतिकतेची भाषा करत सल्ले देत आहेत. मात्र २०१९ च्या निकालानंतर भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळाले. त्यावेळी फक्त मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या लालसेपायी ठाकरे यांनी हिंदुत्व व नैतिकतेला सोडचिठ्ठी देत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. भाजपाचा विश्वासघात करणाऱ्यांना नैतिकतेचे सल्ले देण्याचा अधिकारच नाही अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फैलावर घेतले.
उद्धव ठाकरे यांना संविधानाचा अजिबात अभ्यास नाही असं सांगताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद म्हणजे गणपती बसवतो तसे वाटते का की एकनाथ शिंदेना काढले आणि उद्धव ठाकरेंना बसवले. राज्यपालपद बरखास्त करणाऱ्याची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना संविधानाचा अभ्यासच नाही असेही नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर एकतरी खासदार निवडून आणावा असे आव्हानच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.
संजय राऊत म्हणजे ‘तेरा नाम जोकर’
नारायण राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख ‘तेरा नाम जोकर’ म्हणजेच ‘जोकर’ असा केला. ते म्हणाले, संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. संजय राऊत, अनिल परब हे यांचे लीडर. ते फक्त कलेक्टरची काम करतात आणि आपली पद टिकवतात, असे म्हणतं संजय राऊत यांचाही नारायण राणे यांनी समाचार घेतला.