Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीज्ञानदेव देती ‘अमृत गुटी’

ज्ञानदेव देती ‘अमृत गुटी’

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

श्री ज्ञानदेवांची लिहिण्याची पद्धत / शैली इतकी बहारदार आहे की, त्यातील गंमत जाणवून आपल्याला ते लेखन पुन्हा पुन्हा वाचावे असे वाटते.

याचा अनुभव देणारी अठराव्या अध्यायातील ही ओवी पाहा…
ना येणेसीं मुख वांकडें ।
करूनि ठाकाल कानवडे।
तरी कानींही घेतां पडे।
तेचि लेख॥ ओवी क्र. १६९३
या ओवीचा अर्थ – (किंवा) गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर कुशीवर वळाल, तर ती अक्षरे कानात पडली तरी त्यांचेही फल तेच येईल.

आता ज्ञानेश्वरांना माहीत आहे की, काही गोष्टी माणसांसाठी खूप चांगल्या, महत्त्वाच्या असतात; परंतु माणसांना त्याचं महत्त्व वाटत नाही. म्हणून आपणहून त्या गोष्टी मिळवाव्या, यासाठी माणसं प्रयत्न करत नाहीत. अशा वेळी त्या चांगल्या गोष्टी अनिच्छेने त्यांच्या आयुष्यात आल्या तरी त्याचा परिणाम चांगलाच होणार. जशी की भगवद्गीता हा ज्ञानाचा महासागर; परंतु लोकांना त्याचं मोल कळलं नाही, तर ते त्याकडे लक्ष देणार नाहीत. अशा वेळी अनिच्छेने ही गीता त्यांच्याकडे आली तर? ही अनिच्छा ज्ञानदेव कशी नाट्यमय पद्धतीने दाखवतात पाहा! तर तोंड वाकडे करून कुशीवर वळाल!
ही क्रिया ज्ञानदेवांच्या वर्णनाने आपल्यासमोर साकार होते, मनात मुरते, हसून मुरकुंडी वळते. आपल्याला आठवते, एखादी वस्तू नको, तर आपण तोंड वाकडे करून कुशीवर वळतो. तीच क्रिया ज्ञानदेवांनी अचूक टिपली! पण ज्ञानदेवांमधला गुरू पुढे सांगतो की, असं जरी झालं (अनिच्छेने कानांवर गीतेची अक्षरे पडली) तरी त्याचे फल तेच म्हणजे चांगले येईल.

 

या एका दाखल्यातून ज्ञानदेव किती गोष्टी साधतात? एकीकडे माणसाच्या स्वभावाचं चित्रण करतात, पुन्हा ते विनोदी, गमतीदार पद्धतीने मांडतात. म्हणून माणसांना ते खटकत नाही, उलट मनाला पटतं, भिडतं आणि पुन्हा यातून ते भगवद्गीतेची शक्तीही दाखवून देतात.

भगवद्गीतेचे हे सामर्थ्य आधीच्या दाखल्यांतून ते मनावर ठसवतात. कसं?
ते म्हणतात, ‘परिसाचे सामर्थ्य’ असे आहे की, तो लोखंडाचे एके बाजूस लागला असता सर्व लोखंड आपोआप सुवर्णमय होते. (ओवी क्र. १६९१) त्याप्रमाणे गीतापाठरूपी वाटीतील एका श्लोकाचे पद मुखाला लावाल न लावाल तोच ब्रह्मत्वाची पुष्टी अंगात येईल.
तैसी पाठाची ते वाटी।
श्लोकपाद लावा ना जंव वोठी।
तंव ब्रह्मतेची पुष्टि।
येईल आंगा॥ ओवी क्र. १६९२

भगवद्गीता ही इतकी शक्तिशाली आहे की, त्यातील केवळ एका श्लोकाने तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकाल, हे सांगण्यासाठी योजलेला हा दाखला किती गोड, सरस आहे. एखादं बारीक बाळ वाटीतील सत्त्व घेऊन पुष्ट व्हावं, त्याप्रमाणे ते चित्र मनात उभं करतात. फक्त इथे हे बाळ म्हणजे ‘अज्ञानी माणूस’ आहे. पण गीतेच्या एका श्लोकाच्या सेवनानेदेखील तो ‘ज्ञानाने पुष्ट’ होईल हा विश्वास ज्ञानदेव श्रोत्यांना देतात. त्यातही अर्थपूर्णता खूप आहे. सेवन ही क्रिया नंतर येते. एखादा पदार्थ प्रथम मुखाच्या जवळ येतो. मग मुखाला लागतो नि मग त्याचं सेवन होतं आणि त्यानंतर त्याचा परिणाम मिळतो. पण गीतेच्या बाबतीत सेवनाच्या आधीच केवळ मुखाला लागण्याने (केवळ कानांवर पडण्याने) देखील त्यातील शक्ती, ताकद मिळते. अशा अर्थपूर्ण दाखल्यांतून ज्ञानदेव आपल्याला जणू ‘अमृताची गुटी’ देतात, हे त्यांचे आपल्यावर अनंत उपकार!

([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -