- समर्थ कृपा : विलास खानोलकर
लाकडे तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा ओझरता घाव घालताच आतून हरी ओम! हरी ओम! दत्तगुरू! असा आवाज येत, ते वारुळ मोडून बाहेर पडले व भगवान नृसिंहसरस्वती महाराजांची समाधी भंग पावली. लाकुडतोड्या महाप्रचंड घाबरला व म्हणाला, ‘महाराज महाराज माझी चूक झाली, मला माफ करा, माफ करा.’
श्री स्वामी समर्थाच्या अवताराविषयी व जन्माविषयी अनेक भक्तांमध्ये अनेक प्रकारचे कथासार सांगत असतात, जसे सर्व ताकदवान परमपित्या ईश्वराने दहा अवतार घेतले. तसेच साक्षात दत्तगुरू देव म्हणजेच नृसिंहसरस्वती व त्यांचाच पुढचा अवतार म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ होत. गुरुचरित्रात वर्णन केलेले नृसिंहसरस्वती म्हणजेच स्वामी समर्थ होत. श्रीशैल्यम यात्रेच्या निमित्ताने भगवान नृसिंह सरस्वती कर्दळी वनात योगसाधना करण्यासाठी गुप्त झाले. याच कर्दळी वनात अनेक वर्षे ते प्रगाढ समाधीत झाडाखाली सुप्रवस्थेत होते. याच काळात वाल्मिकी ऋषीप्रमाणेच महाभयंकर गाढ तपस्या केल्यामुळे, मुंग्यांनी त्यांच्या दिव्य शरीराभोवती आपले कवचरूपी एक प्रचंड वारुळच तयार केले. एकाच जागी, न हलता, न डोलता, एखाद्या हटयोग्याप्रमाणे, पाणीही प्राशन न करता. प्रणायामाच्या जोरावर समाधीस्त झाले. योगायोगाने काही कालांतराने तेथून एक गरीब बिचारा लाकुडतोड्या आपल्या मुला-बाळासाठी अन्न शिजविण्याकरिता लाकडे गोळा करण्यासाठी आला. त्याच्या साधेपणामुळे, जंगलातील अंधुक प्रकाशामुळे काहीही कल्पना आली नाही व लाकडे तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा ओझरता घाव घालताच आतून हरी ओम! हरी ओम! दत्तगुरू! दत्तगुरू! असा आवाज येत, ते वारुळ मोडून बाहेर पडले व भगवान नृसिंहसरस्वती महाराजांची समाधी भंग पावली. लाकुडतोड्या महाप्रचंड घाबरला व म्हणाला, “महाराज महाराज माझी चूक झाली, चूक झाली, मला माफ करा, माफ करा.” स्वामींनी डोळे उघडले, पण ते काही रागावले नाहीत. कुऱ्हाडीचा घाव बसल्यामुळे त्यांच्या उजव्या मांडीवर जखम झाली व रक्त भळभळ वाहू लागले. त्यांनी माफी मागणाऱ्या त्या गरीब लाकूडतोड्याला जवळ घेतले व सांगितले, “माझे स्वर्गातील ईश्वरी कार्य आता समाप्त झाले. आता या भूतलावरील अनाथ, गरीब लोकांचे, रंजल्या-गांजल्यांचे कार्य व भक्तांचे सर्व संकाटापासून मुक्ती देण्याचे कार्य सुरू झाले आहे. तरी हे भक्तवत्सला मी तुझ्यावर नाराज होत नाही, तर मी उलट तुला आशीर्वाद देतो की, ही माझी श्री शैल्यम पर्वतातील कर्दळी वनातील जागा हजारो वर्षे भक्त व सेवक दिवाबत्ती करून जागृत ठेवतील व तुझी व माझी आठवण काढतील. कारण तुच मला समाधीतून जागृत केले आहेस. हे एक प्रकारचे पुण्य कर्मच केलेस, म्हणून मला तुझा बिलकुल राग येत नाही. उलट तुझे पुढे कल्याणच होईल, असा मी वत्सा तुला पुन्हा पुन्हा आशीर्वाद देतो. जा तुझ्या पुढच्या चांगल्या कार्याला जा.”
अशा प्रकारे समाधी विसर्जित झाल्यावर श्री स्वामी आपल्या जागेवरून उठले. आपल्या योग सामर्थ्याने तेथीलच विभूती मंत्रसामर्थ्याने मंत्रवून त्या लाकूडतोड्याला दिली व ‘तुझे कल्याणच होईल’, असा आशीर्वाद दिला व तसेच पुन्हा मंत्रसामर्थ्याने दुसरी उदी आपल्या भळभळणाऱ्या जखमेवर लावली व लगेच जखम बरी झाली. पण अजूनही त्या काळातील शेकडो वर्षे कालावधीतील भक्त आठवण काढून सांगतात की, “स्वामींच्या उजव्या पायावरील जखमेची खूण अजूनही दिसत होती.” त्यानंतर स्वामींनी सर्व अंगावरची धूळ, वाळवी झटकली व ईश्वरी नाम घेत उभे राहिले. नंतर बाजूला असलेल्या नदीकिनारी हात, पाय, तोंड धुवून, देवाला सूर्याला अर्घ्य देऊन तरतरीत झाले. प्रसादरूपी फळे खाऊन नदीकिनाऱ्याने पुढे-पुढे जाऊ लागले. मजल-दरमजल करत निराळी तीर्थक्षेत्र पाहत पाहत इ. स. १८५६ ते १८५७ च्या दरम्यान अक्कलकोट येथे आले व मोठ्या वडाच्या सावलीत स्थानापन्न झाले. त्या काळातील भक्त सांगतात, “स्वामींची मूर्ती महाप्राचीन ऋषीमुनींप्रमाणे अत्यंत तेजस्वी होती.” अशा रीतीने स्वामी समर्थांचे पहिले दर्शन ज्या मानवाला झाले, तो खरोखर भाग्यवान म्हणायला हवा. त्याच्यासारख्या अनेक गरिबांवरची कृपा महाराजांनी कधी ढळू दिली नाही. म्हणूनच आज म्हणू,
श्री समर्थ श्री स्वामी समर्थ महाराsssज की जय।
स्वामींचा संदेश :
दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती
स्वामी समर्थांचा प्रभावी तारक मंत्र…
नि:शंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भवती प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकाही ना भिती तयाला।।२।।
उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा।।३।।
खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशील त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच या पंच प्राणाअमृत
हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी जे घेई हाती।।५।।
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे।