Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यघरातल्या माणसाला घरातच किंमत का नसते?

घरातल्या माणसाला घरातच किंमत का नसते?

  • फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

अनेकदा आपण ऐकतो की, बरेच लोक म्हणतात बाहेरच्या जगात, नोकरीच्या ठिकाणी, समाजात, व्यवसायात, मित्र मंडळींमध्ये माझा खूप नावलौकिक आहे, दबदबा आहे. मला खूप लोकं मानतात, माझे सल्ले घेतात, माझा आदर करतात, स्तुती करतात पण माझ्या घरात मात्र मला किंमत नाही. माझ्या घरातले लोक सतत माझ्याशी वाद घालतात, माझं ऐकत नाहीत, माझ्यावर टीका करतात, मला कमी लेखतात. माझं शिक्षण, माझा अनुभव, माझी पत, प्रतिष्ठा, माझी बुद्धिमत्ता, हुशारी याचं इतरत्र प्रचंड कौतुक होत असते पण घरातली लोकं मात्र मला, माझ्या कामाला, माझ्या पोझिशनला, माझ्या व्यक्तिमत्त्वाला कवडीचीही किंमत देत नाहीत. माझ्या मार्गदर्शनामुळे किती लोकांचं भलं झालं आहे, अनेक लोकांना मी चांगला मार्ग दाखवला आहे, अनेकांचं आयुष्य मी मार्गी लावलं आहे. पण घरात माझा सल्ला, माझे विचार कोणाला पटत नाहीत, ते माझी बदनामी करतात आणि मला अपमानित सुद्धा करतात. घरातली माझीच माणसं माझ्यातले गुण का ओळखू शकत नाहीत? मला घरात आदर का मिळत नाही? बाह्य जगात जर माझ्या शब्दाला वजन आहे, समाजात मला दर्जेदार स्थान आहे, तर घरातून मला अशी तुच्छ, दुय्यम वागणूक का मिळावी?

बहुतांश महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अगदी विद्यार्थीसुद्धा घरातल्यांना आपली कदर का नाही, या प्रश्नाने ग्रासलेले आढळतात. वास्तविक आपल्याच घरातले आपल्याशी चुकीचं किंवा अनपेक्षित का वागतात याला अनेक कारणे आहेत. त्यामुळे यात आपला काहीही दोष नाही, आपण स्वतःला यासाठी कमी समजण्याचं, वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. घरातील सदस्य आपल्याशी कोणत्या ना कोणत्या नात्यांनी बांधलेली असतात. नातं आलं की जास्त जवळीक आली, जास्त सहवास आला, जास्त संबंध आले, अपेक्षा आल्या. एकमेकांत होणारा सुसंवाद-विसंवाद, अर्थाचा अनर्थ, समज-गैरसमज, बोलण्याचे संदर्भ, वापरलेली उदाहरणं, घरगुती विषयांची व्याप्ती, हे सखोलपणे समजावून घेण्याची घरातील प्रत्येकाची बौद्धिक, मानसिक, वैचारिक पातळी नसते. आपल्या घराबाहेरील जगातील व्यक्ती आपण आपल्या इच्छेने, पारख करून, वैचारिक समानता, किमान जुळणारी बुद्धिमत्ता, हुशारी, मिळते-जुळते स्वभाव तसेच सवयी यावरून निवडलेल्या असतात. सहकारी, मित्र मंडळी, समाजातील इतर लोक आपल्याशी कुठेतरी काहीतरी पटत असते म्हणून आपल्याला जोडले जातात. घराबाहेर आपल्याला भेटणारी कोणतीही व्यक्ती ही आपल्या विचारांशी, आपल्या कल्पनांशी, आपल्या कामाच्या स्वरूपाशी मिळती-जुळती, त्याबाबत माहिती असलेली असते. घरातील लोक मात्र आपल्याला नैसर्गिकरीत्या लाभलेले असतात, त्यात कुठेही आपला किंवा त्यांचा चॉईस नसतो, घरातील लोक, नातेवाईक निवडण्यासाठी काही पर्याय नसतो.

घरातील लोकांना आपल्याला समजावून घेण्यात सगळ्यात मोठा अडसर असतो तो म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रता! त्यांची बौद्धिक कुवत! त्यांना बाहेरील जगाचा, समाजाचा, दुनियादारीचा अनुभव कितपत आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांची वैचारिक पात्रता किती आहे यावरून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडलेलं असते. काही ठिकाणी चांगले गुण, अनुभव, शिक्षण घरातील लोकांमध्ये असले तरी ते वेगळ्या स्वरूपातले किंवा वेगळ्या फिल्डमधले असतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचं खरं करण्याची सवय लागलेली असते. आपल्याला सगळं कळतं अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे ते इतरांचं काहीही ऐकून तसं वागण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. त्यांच्याकडे जेवढी आहे तेवढी हुशारी त्यांना पुरेशी असते. आपण सांगतोय, शिकवतोय, समजावतोय म्हणून काहीही कुठेही बदलण्याची त्यांची तयारी नसते. आपल्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे, आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट गांभीर्याने न घेणे ही त्यांची सवय बनून जाते. बहुतेक ठिकाणी घरातील लोकांची कमकुवत मानसिकता, बौद्धिक कमतरता, शिक्षणाचा आभाव, नकारात्मक दृष्टिकोन, एककल्ली विचारसरणी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वैफल्य, त्यांचे कटू अनुभव, इतरांचं ऐकून बनवलेली मतं, व्यापक विचारांचा अभाव यावरून त्यांची वागणूक ठरत असते. आपण आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाने कितीही मोठे असलो, प्रसिद्ध आणि यशस्वी असलो तरी घरातील लोकं आपल्याला नात्याच्या निकषावर, आपल्याशी असलेल्या त्यांच्या चांगल्या-वाईट संबंधावर तोलत असतात. आपण बाहेरील दुनियेत काय तीर मारतोय, काय भूमिका निभावतोय, काय आणि किती आव्हानात्मक जबाबदाऱ्या संभाळतोय यात त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो. घरात आपण त्यांच्या मन मर्जीनुसार, अपेक्षेनुसार वागलो नाही की त्यांच्यासाठी आपण वाईट ठरतो, चुकीचे ठरतो.

घरातल्या लोकांसाठी आपण फक्त घरातील एक सदस्य असतो.आपल्याबद्दल जास्त जाणून घ्यायची पण त्यांची इच्छा नसते, आपल्या विचारांची व्याप्ती त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असते. एखाद्याला समजून घेणं तर त्यांच्या ध्यानिमनी नसतं. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारावर असे लोक आपल्याबद्दल उलट-सुलट विचार आणि चर्चा करत राहतात. आपलं ज्ञान, आपली सोशल इमेज अथवा आपलं बाह्य वर्तुळ हे सगळं कितीही मोठं असलं, उत्कृष्ट असलं तरी त्याची पारख करण्याची एकतर घरात काहींची पात्रता नसते किंवा त्यांना ते समजून-उमजून पण आपल्याशी चुकीचे अथवा वाईट वागायचे असते. अशावेळी आपण घरातील सगळ्यांच्या सर्वसाधारण मानसिकतेचा, स्वभावाचा एक दोन वेळा अभ्यास केला, काही अनुभव घेतले की, स्वतःला अशा मनोवृत्तीमुळे त्रास करून घेणं सोडून द्यायचं असतं. घरातील लोकांना आपली किंमत नाही हे आपल्याला माहिती आहे. तर त्याकडे दुर्लक्ष करा. कोणी आपल्याला कितीही दुखावलं, अपमानित केलं, खच्चीकरण केलं, अबोला धरला, आपल्याला अपशब्द वापरले, अगदी आपली लायकी काढली, तरी मनाला लावून घेऊ नका. बाहेरील, समाजातील जे लोक खरंच आपल्याला ओळखतात, नावाजतात, आपल्याला दाद देतात, आपलं, आपल्या कामाचं, कलेचं, गुणांचं कौतुक करतात त्यांच्याकडून प्रोत्साहित होऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा.

आपल्या आणि आपल्या घरातील लोकांच्या शिक्षण, स्वभाव, गुण, हुशारी, बुद्धी, अनुभव, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं बालपण, त्यांचे इतर नातेवाईक, इतर मित्र मैत्रिणी, त्याच्यावर प्रभाव टाकणारे इतर लोक, त्यांची संगत, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांची जीवनशैली, त्यांचे छंद, कलागुण यात आणि आपल्यात असलेली प्रचंड मोठी तफावत या सर्व विरोधाभासाला कारणीभूत असते. घरातील लोकांना आपल्या कार्य कर्तृत्वाचा अभिमान नाही, कारण त्यांना तेवढी समजच नाही, आकलनशक्ती नाही हे लक्षात घ्यावे. ते थोडेफार पात्र असूनदेखील जर आपल्याला किंमत देत नसतील, तर हे समजावून घ्यावे की, त्यांना आपली स्तुती करण्यात, आपलं कौतुक करण्यात रस नाही. आपल्याच घरातील अनेक अशी मंडळी असू शकतात जे त्यांच्यातील अहंकारामुळे, दूषित दृष्टिकोनामुळे, आपल्या प्रति असलेल्या जळावू वृत्तीमुळे आपली दखल घेत नाहीत. आपल्याच जवळची लोकं अशी असू शकतात, ज्यांना आपली प्रगती, यश पाहवत नाहीये, त्यांना आपला मोठेपणा स्वीकारताना कमीपणा वाटतोय, त्यांना आपलं खच्चीकरण करून आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करायचं आहे. आपल्यात असलेले चांगले गुण, सकारात्मक गोष्टी पचवणे त्यांना जड जाते म्हणून ते शोधून शोधून आपल्यातील कमतरता, आपल्या उणिवा, आपल्या चुका काढून त्यावर चर्चा करण्यात, टीका करण्यात धन्यता मानतात. आपल्याबद्दल त्यांच्या मनात असुया, मत्सर, राग भरलेला असतो. म्हणून ते कळून न कळल्यासारखे वागत असतात. अशा लोकांकडून आपण अपेक्षा करत बसणे, त्यांचं मन आणि मत परिवर्तन करण्यात आपला वेळ वाया घालवणे निरर्थक असते. त्यामुळे आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय, आपली वागणूक अथवा स्वभाव अशा लोकांमुळे डळमळीत होऊ न देणे आणि बोलून, भांडून वाद घालून वेळ वाया घालवण्यापेक्षा करुन दाखवण्याची हिंमत ठेवणे हेच अशा मनोवृत्तींचा सामना करण्याचे औषध आहे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -