मुंबई (वृत्तसंस्था) : सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीचा चटका मंगळवारी बंगळूरुला चांगलाच लागला. नेहल वधेरा आणि इशान किशन यांची फटकेबाजीही मुंबईच्या विजयात लक्षवेधी ठरली. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर ६ विकेट राखून सोपा विजय मिळवला.
मुंबईच्या रोहित शर्माने मंगळवारीही निराश केले. त्याला केवळ ७ धावा जमवता आल्या. इशान किशनने २१ चेंडूंत ४२ धावा करत मुंबईचे इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा ही जोडी चांगलीच जमली. या जोडगोळीने मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. तेथून केवळ इंडियन्सच्या विजयाची औपचारिकता शिल्लक होती. सूर्यकुमार यादव बंगळूरुच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३५ चेंडूंत ८३ धावा फटकवत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या धडाकेबाज खेळीत ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. नेहल वधेराने नाबाद ५२ धावांची खेळी खेळली. त्यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला. इंडियन्सने १६.३ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. बंगळूरुच्या विनींदू हसरंगा आणि विजयकुमार व्यश्यक यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवले. परंतु ते धावा रोखण्यात मात्र अपयशी ठरले.
ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने निर्धारित २० षटकांत १९९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्याशिवाय तळाला दिनेश कार्तिक यानेही फटकेबाजी केली. विराट कोहली आणि अनुज रावत झटपट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. फाफने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. मात्र नंतर त्याची फलंदाजी बहरली. तर मॅक्सेवलने पहिल्यापासूनच वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी ६२ चेंडूंत १२० धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान ६८ धावांचे होते. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने चार षटकार आणि आठ चौकार लगावले. फाफ डु प्लेसिसने ४१ चेंडूंत ६५ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. बंगळूरुने पहिल्या पॉवरप्लेमध्ये ५६ धावा करत २ विकेट गमावल्या होत्या. दिनेश कार्तिक याने अखेरीस वादळी फलंदाजी केली. कार्तिकने १८ चेंडूंत एक षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने ३० धावांचे योगदान दिले. मुंबईच्या जेसन बेहरेंडॉर्फने ३ विकेट मिळवल्या.