 
                            रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाटात दरड कोसळून मातीचे ढिग साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या घाटाला असलेल्या पर्यायी मार्गावरूनच वाहतूक सुरू आहे. चिरणी, आंबडस आणि पिरलोटे या परशुराम घाटाला पर्यायी मार्गांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. तर गुणदे आणि शेल्डी हाही एक दुसरा पर्यायी मार्ग आहे. मात्र, हा मार्ग काहीसा अरुंद आहे.
महामार्गाचे काम सुरु केल्यानंतर या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले होते. त्यामुळे पावसाळ्याच्या आधीच घाटातील काम पूर्ण करून दोन्ही लेनवर वाहने सुसाट जाण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र पावसाळ्यात या घाटावर दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडतात त्यामुळे हा घाट काही वर्ष अडचणीत सापडला आहे.
परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम पूर्ण करून तातडीने काँक्रिटीकरणाच्या कामालाही सुरुवात केली गेली. या घाटाचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी परशुराम घाट हा पावसाळ्याच्या दिवसात वाहतूक करण्यासाठी धोकादायक झाला आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
परशुराम घाट बंद असल्याने चिरणी आंबडसव्यतिरिक्त आणखी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. मुंबईकडून येताना महाड - लाटवण मार्गे दापोली आणि दापोली येथून दाभोळ - धपावे या फेरीबोटीने पलीकडे धोपावे येथून श्रृंगारतळी मार्गे थेट गुहागर आणि चिपळूण, रत्नागिरी येथे जाता येते. कशेडी येथील खवटी घाट टाळण्यासाठीदेखील या पर्यायी मार्गांचा वापर केला जाऊ शकतो.

 
     
    




