छत्रपती संभाजी नगर: पाच वर्षांपूर्वी बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात ठेवत, महिलेने पतीच्या मदतीने बहिणीच्या चिमुकल्यासोबत अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातून हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. मात्र, तिचा पती फरार झाला आहे.
या बाबत चिमुकल्याच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्या अंबरहिल परिसरात आपल्या पतीसह राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. पण सर्व काही सुरळीत सुरु असताना, २५ एप्रिलला दोघांमध्ये भांडण झाले. त्या रागातून त्या त्यांच्या दोन वर्षाच्या मुलासह आपली बहिण आणि मेहुणा यांच्या घरी आल्या.
बहिणीकडे आल्यावर त्या काम पाहण्यासाठी तिच्यासोबत गेल्या. इथे त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मेहुण्यासोबत घरीच होता. काहीवेळाने त्यांची बहिण त्यांच्या आधी काही बहाण्याने घरी आली. घरी आल्यावर तिने आपल्या पतीच्या मदतीने बहिणीच्या दोन वर्षाच्या मुलाची कैचीने सुन्ता केली. यामुळे होणाऱ्या त्रासामुळे मुलगा जोराने किंचाळत रडत होता. पण निर्दयी पती-पत्नीला काहीच फरक पडला नाही. दरम्यान एक तासाने त्याही घरी पोहचल्या. तेव्हा तिचा मुलगा रडत होता. तिने जवळ घेऊन त्याला समजावले. मात्र, तो रडायचा थांबत नव्हता. तर त्याच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत दिसून आली. तेव्हा फातेमा व शमशेर यांनी तिला मुलाची सुन्ता केल्याचे सांगितले. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला, तर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा मोबाइलही हिसकावून घेतला. मात्र काही दिवसांनी त्या मुलासह पतीकडे आल्या व सर्व हकिकत पतीला सांगितली. त्यानंतर ७ मे रोजी या प्रकरणी जिन्सी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करीत त्यांच्या बहिणीला अटक केली. न्यायालयाने तिला ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर बहिणीचा पती हा रेकॉर्डवरील आरोपी असून, सध्या तो फरार झाला आहे.