
रोहितची पलटण विजयी मार्गावर परतण्यासाठी आतुर
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ : ७.३० वाजता
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे संघ आज आमनेसामने येणार आहेत. वानखेडेच्या मैदानावर या मोसमातील पहिल्याच सामन्यात बंगळूरुविरुद्धच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याच्या इराद्यानेच रोहितची पलटण मैदानात उतरेल. गेल्या सामन्यात मुंबईला चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर बंगळूरुला दिल्ली कॅपिटल्सकडून ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठीचा लढा अधिक कठीण होत असताना, दोन्ही संघांसाठी सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
आयपीएल २०२३ मधील मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने या हंगामातील १० पैकी पाच सामने जिंकले आहेत, तर तेवढ्याच सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. कर्णधार रोहित शर्माचा अलिकडचा फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. त्याचवेळी, इशान किशन आणि ग्रीनही सातत्य राखून धावा करण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडने आपल्या फलंदाजीने छाप पाडली आहे. एकीकडे रोहित शर्माचा फॉर्म, दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरीही यंदाच्या मोसमात काही विशेष राहिलेली नाही. जोफ्रा आर्चरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, तर युवा गोलंदाज अर्शद खानही छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. मात्र फिरकी विभागात पीयूष चावलाने महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या आहेत.
गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. बंगळूरुच्या गोलंदाजांनी गत सामन्यातील कामगिरीने चांगलीच निराशा केली. मोहम्मद सिराजने २ षटकांत एकही विकेट न घेता २८ धावा दिल्या होत्या. त्याच वेळी हर्षल पटेलही चांगलाच महागात पडला.
तथापि, यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीच्या फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. कर्णधार फाफ डुप्लेसी आणि विराट कोहली यांनी सातत्याने धावा केल्या आहेत, तर ग्लेन मॅक्सवेलही छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा संघ मुंबईविरुद्ध वरचढ ठरला होता आणि रोहितच्या पलटणला ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आज होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा संघ पराभवाचा बदला घेऊन बंगळूरुचा हिशेब चुकता करेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.