Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरत्नागिरी जिल्ह्यात जलपर्यटनाला मिळणार चालना

रत्नागिरी जिल्ह्यात जलपर्यटनाला मिळणार चालना

केरळच्या हाऊस बोटी रत्नागिरीतील खाड्यांमध्ये करणार जलविहार

बचत गटांच्या माध्यमातून राबविणार हाऊसबोट प्रकल्प

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी केरळच्या धर्तीवर जिल्ह्यांतील खाड्यांमध्ये हाऊसबोट प्रकल्प राबविला जाणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून काही बचतगट एकत्र आणून हाऊसबोटिंगच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे. त्या अानुषंगाने लवकरच एक पथक केरळचा दौरा करणार आहे.

जलपर्यटन हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. पर्यटकांना समुद्राच्या निळ्याशार पाण्याचे आणि समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन प्रवास करण्याचे आकर्षण आहे. म्हणूनच मुंबई, रायगडमध्ये, दाभोळ येथील फेरीबोटीला चांगला प्रतिसाद मिळतो. मोठमोठ्या आलिशान क्रूझ सुरू होणार आहेत. त्यातून मुंबई-गोवा जलप्रवास करता येणार आहे. कर्ला (ता. रत्नागिरी) येथे खाडीच्या पाण्यामध्ये बोटिंग सुरू आहे. दोन किंवा चार कुटुंबे एकत्र येऊन विरंगुळा म्हणून पाण्यातील सफरीचा आनंद लुटतात. त्यासाठी कॅटररची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाऊसबोटिंगचा आनंद लुटला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक खाड्या आहेत. या खाड्यांमध्ये हा केरळच्या धर्तीवर हाऊसबोटिंग सुरू करता येऊ शकतो, असा विचार सीईओ किर्ती किरण पुजार यांच्या मनात आले. त्यांनी यावर विचार करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कोट्यवधीचा निधी येतो. काही महिला बचतगट एकत्र आणून सुमारे अर्धा कोटी किंवा पाऊण कोटींची एखादी हाऊसबोट बांधून जलपर्यटनाला नवी उंची, दर्जा देण्याचा विचार करण्यात येत आहे.

याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा करून त्याला कसे अर्थसाहाय्य मिळेल, याबाबत चर्चा झाली आहे. त्या अानुषंगाने १२ जणांची एक टीम तयार करून केरळ दौरा केला करण्यात येणार आहे. या दौऱ्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील हाऊसबोटिंग प्रकल्पाला दिशा मिळणार आहे. केरळ राज्यात खाड्यांमधील हाऊसबोट प्रकल्पाद्वारे पर्यटन व्यवसाय अधिक विस्ताराला आहे. तशीच स्थिती येत्या काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होऊ शकते. केरळकडे आकर्षित होणारे पर्यटक रत्नागिरी जिल्ह्याकडे आकर्षित होऊ शकतील आणि केरळच्या पर्यटन व्यवसायाशी रत्नागिरी जिल्हादेखील या माध्यमातून निकोप स्पर्धा करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -