Sunday, August 24, 2025

गोरेगाव येथे होणार अद्ययावत सार्वजनिक शौचालये

गोरेगाव येथे होणार अद्ययावत सार्वजनिक शौचालये

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय

मुंबई (प्रतिनिधी) : गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ विविध अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग स्टेशन आणि पेय पदार्थांसह ‘एटीएम’ची देखील सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे शौचालयाच्या छतावर ‘सोलर पॅनल’ बसविण्यात येणार असून त्यापासून ऊर्जा निर्मिती देखील करण्यात येणार आहे.

गोरेगाव (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर १ हजार ४५३ फूट एवढ्या प्रशस्त जागेमध्ये सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या शौचालयाची उभारणी ही गोरेगाव (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणार आहे. त्यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीय यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये, महिला शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी समर्पित जागा अशा सुविधा असणार आहेत. याचबरोबर पिण्यासाठी शुद्ध पाणी, मोबाइल चार्गिंग स्टेशन, एटीएमची सुविधा देखील प्रस्तावित करण्यात आली असून या ठिकाणी चहा-कॉफीसह पेय पानाची देखील व्यवस्था असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सभोवतालच्या जागेवरती रंगीत फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. या प्रस्तावित शौचालयामध्ये पुरुषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप असणार आहे.

सौर ऊर्जा निर्मिती होण्याच्या दृष्टीने या शौचालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. या सोलर पॅनलमधून २० किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे.

मुख्य रस्ते व द्रुतगती महामार्गावर शौचालयाची सुविधा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाली, तर नागरिकांची गैरसोय होणार नाही. या उद्देशाने या सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत शौचालयाची दैनंदिन स्वच्छता व देखरेख करण्यात येणार आहे. कार्यादेश निघाल्यानंतर या शौचालयाचे बांधकाम पूर्ण होईल.

Comments
Add Comment