Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

नाशिक आरटीओ कार्यालयात दोन तास काम बंद आंदोलन

नाशिक आरटीओ कार्यालयात दोन तास काम बंद आंदोलन

आकृतिबंध प्रलंबित, पदोन्नत्ती रखडली


पंचवटी (प्रतिनिधी): राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी (ता. ८) रोजी सकाळ सत्रात दोन तास काम आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने या आंदोलनाचे नेतृत्व केले. परिणामी आरटीओ कार्यालयातील कामकाज दोन तास ठप्प झाले होते.


शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतिबंध तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आकृतिबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनास २०१६ मध्ये सादर केला होता. आकृतिबंध मंजुरीसाठी संघटनेने सलग सहा वर्षे लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाला. शासन निर्णय प्रसिद् होऊन सहा महिन्याहून अधिक काळ होऊनही आकृतिबंध कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे कर्मचारी नाराजी आहेत.


विभागातील पदोन्नतीचे सत्र नाहक प्रलंबित ठेवले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून सेवाविषयक उन्नतीपासून वंचित ठेवले जात आहे. तसेच मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आकृतीबंधाची तात्काळ अंमलबजावणी करणे, कळसकर समितीच्या अहवालानुसार कामकाज वाटप करणे, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती पदोन्नत्या वर्ग दोन सह लवकरात लवकर करणे या मागण्यासाठी राज्यस्तरीय दोन तास लेखणी बंद करून निदर्शने करण्यात आली. वर्ग-२ ची पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळेही कर्मचारी वर्गात संताप आहे. शासन / प्रशासनाने मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा तीव्र संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही " मोटार वाहन विभाग (आरटीओ) नाशिक कार्यालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर यांनी दिला.


भरत चौधरी, पंढरीनाथ आडके, योगेश आहेरराव, दिनेश झोपे, निलेश गवळी, तारकेश्वर भामरे, संतोष चव्हाण, विलास नागरे, शिरीन शहा, रूपाली ठाकरे यांचा निदर्शनात सहभाग होता.

Comments
Add Comment