Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पर्यटक घेणार कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद

पर्यटक घेणार कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद

पालिकेचा पुढाकार; बधवार पार्क, माहीम, वरळी कोळीवाड्यातून लवकरच सुरुवात

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पर्यटनामध्ये हमखास पर्यटनाचे ठिकाण म्हणजे शहरातील विविध ठिकाणचे कोळीवाडे. आता पर्यटनाच्या जोडीलाच स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वादही पर्यटकांना घेता येणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांनी बनविलेले रूचकर मासळी पदार्थ हे मुंबईकरांना ‘फूड ऑन व्हील’ योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळावा, या अनुषंगाने ‘फूड ऑन व्हील’च्या दोन गाड्या घेण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बधवार पार्क कोळीवाड्याच्या विकासासाठी महापालिकेने भर दिला आहे. कोळीवाड्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पा अंतर्गत मुंबई शहरातील बधवार पार्क, माहीम आणि वरळी कोळीवाडा सुशोभीकरणासाठी महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे. बधवार पार्क कोळीवाडा येथे स्थानिक कोळीवाड्यातील महिलांनी तयार केलेले मासळी अन्नपदार्थ (उदा. जवळा, बोंबील, कोळंबी आदी) भेट देणाऱ्या पर्यटकांना आस्वादासाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळेच पर्यटनासोबतच स्थानिक अन्नाचा आनंदही पर्यटकांना घेणे शक्य होईल. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था किंवा महिला बचतगटांना या ‘फूड ऑन व्हील’ची सुसज्ज अशी गाडी वापरासाठी देण्यात येणार आहे. कोळी महिलांसाठी अशा प्रकारची ‘फूड ऑन व्हील’ची गाडी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधी (डीपीडीसी) चा वापर करण्यात येणार आहे. पालिकेतर्फे कोळीवाड्यांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सौंदर्यीकरणाच्या कामाअंतर्गत बधवार पार्क येथील कोळीवाड्यातील जेट्टीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. तर फूड ऑन व्हीलच्या वाहनांसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून ३४ लाख ५१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘फूड ऑन व्हील’च्या दोन वाहनांची खरेदी करण्यासाठी २८ लाख १३ हजार रुपयांचा निधी गरजेचा आहे. या ठिकाणी पर्यटन वाढीच्या अनुषंगाने बोटीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

‘फूड ऑन व्हील’ व्हॅनमध्ये काय?

स्थानिक पातळीवर महिला बचतगट किंवा स्वयंसेवी संस्थांना ‘फूड ऑन व्हील’ची जबाबदारी देण्यात येईल. या व्हॅनमध्ये महिलांना अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठीचे कप्पे तयार करण्यात येणार आहेत. तसेच फुड स्टॉलच्या माध्यमातून सेवा सुविधा देण्याची या व्हॅनची रचना असेल.

Comments
Add Comment